सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा असे निर्वाणमार्गांत समाविष्ट झालेल्या व्यक्तींचे चार भेद आहेत. पहिल्या तीन संयोजनांचा क्षय झाला म्हणजे मनुष्य सोतापन्न (स्त्रोतआपन्न) होतो. सोतापन्न असतांच जर त्याला मृत्यु आला, तर तो देवलोकीं आणि मनुष्यलोकीं फार झालें तर सात खेपा जन्म घेतो. सातव्या जन्मीं त्याला मोक्ष मिळालाच पाहिजे. पहिल्या तीन संयोजनांचा नाश करून कामराग, द्वेष आणि मोह हे दुर्बळ झालें ह्मणजे मनुष्य सकदागामी (सकृदागामी) होतो. अशा स्थितींत त्याचा अंत झाला तर तो एक वेळच इहलोकीं जन्म घेतो व मोक्ष मिळवितो. पहिल्या पांच संयोजनांचा नाश झाला ह्मणजे मनुष्य अनागामी होतो. अनागामीला मरण आलें असतां तो इहलोकीं जन्म घेत नाहीं. ब्रह्मलोकादि देवलोकांत त्याचा जन्म होतो व तो तेथूनच मोक्ष मिळवितो. सर्व संयोजनाच्या नाशानें मनुष्य अरहा (अर्हत्) होतो. अरहाला पुनर्जन्म नाहीं. जीवन्मुक्त ह्मणतात. तो तोच. बुद्ध आणि अरहा यांमध्ये थोडासा फरक आहे. बुद्धाला निर्वाणाचा साक्षात्कार स्वप्रयत्नानें होतो; परंतु अर्हताला तो दुसर्‍याचा उपदेश श्रवण करून होतो. एवढाच कायतो फरक बाकी दोघांनाहि निर्वाणाचा साक्षात्कार ह्याच जन्मीं घडतो.

निर्वाणः- निर्वाणासंबंधानें पाश्चात्य पंडितांचे अनेक तर्क आहेत. कोणी ह्मणतो निर्वाण ह्मणजे अभावमात्र (Annihilation) दुसरें काहीं नाहीं. दुसरा कोणी ह्मणतो हें काहीं ठीक नाहीं. बौद्धांची एवढी मोठी संख्या आहे; ते सारे अभावालाच भजतील हें संभवनीय नाहीं. बुद्ध भगवान् अक्रियावादी (Annihilationist) आहेत असा आरोप त्यांचे विरोधी त्यांजवर त्यांच्या हयातींतच आणीत असत. ह्यासंबंधीं एकदा वज्जींचा सेनापति सिंह यानें त्यांस प्रश्न विचारला असतां ते ह्मणालेः- “सिंहा हा आरोप एक अर्थीं खरा आहे. सर्व पापविचारांची (अकुशल संस्कारांची) अक्रिया मला पसंत आहे. त्यांची अक्रिया करण्याविषयीं मी उपदेश करितों. ह्मणून मला अक्रियावादी ह्मटलें असतां चालेल. उलटपक्षीं मी क्रियावादी(Realist) आहें असेंहि कोणी ह्मणूं शकेल. कारण पुण्यविचारांची (कुशल संस्कारांची) क्रिया मला पसंत आहे. त्यांची क्रिया करावी, त्यांना पूर्णत्वाला न्यावें, असा मी उपदेश करितों; ह्मणून मला क्रियावादी ह्मटलें तरी हरकत १नाहीं.” ह्या संवादावरून बुद्धांनीं अभावमात्र प्राप्त करून घेण्याचा उपदेश केला नाहीं हें स्पष्ट होत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ हा संवाद महावग्ग ग्रंथांत आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जम्बुखादक नांवाच्या परिव्राजकानें सारिपुत्राला निर्वाण हें काय आहे असा प्रश्न केला, तेव्हां सारिपुत्र त्याला म्हणालाः-

“यो खो आवुसो रागक्खयो दोसक्खयो मोहक्खयो इदं वुच्चति निब्बाणं.” लोभ, द्वेष आणि मोह यांचा जो क्षय त्याला निर्वाण १म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- जम्बुखादक संयुत्त, संयुत्तनिकाय.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्याचा अर्थ असा कीं, लोभ द्वेष आणि मोह हे तीन मनाचे अकुशल धर्म (संस्कार) नष्ट झाले ह्मणजे निर्वाणाचा साक्षात्कार होतो. लांकडाचा गाभा कोणता? असा जर प्रश्न केला तर त्याला वरची साल काढा. नंतर मऊ भाग तासून टाका. ह्मणजे जो बाकी राहील तोच गाभा, हेंच उत्तर देणें होईल. सारिपुत्तानें जम्बुखादकाला अशाच प्रकारचें उत्तर दिलें आहे. अनेक नांवांनीं निर्वाणाचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांचें विस्तृत वर्णन कोठेंच आढळत नाहीं. जसें एकाद्या गांवाचें वर्णन देतां येईल तसें तें निर्वाणाचें देतां येणें शक्य नाहीं. ज्यांच्या अंतःकरणांतून लोभ, द्वेष, मोह, समूळ नष्ट झाले ह्मणजे ज्यांच्या वासनेचा क्षय झाला अशा महर्षींलाच निर्वाणाचा साक्षात्कार होतो. तें काय आहे हें तेच जाणूं शकतात.

पदमच्चुतमच्चन्तं असंखतमनुत्तरं ।
निब्बाणमिति भासन्त्रि वानमुत्ता महेसयो ।।


ज्यांच्या वासनेचा क्षय झाला आहे असे महर्षि निर्वाण हें अच्युतपद आहे, त्याला अंत नाहीं, तें अत्यंत परिशुद्ध (असंस्कृत) आहे आणि तें लोकोत्तर आहे, असें म्हणतात.

(अभिधम्मट्ठसंग्रह)

अर्हत्पद प्राप्त झाल्याबरोबर निर्वाणाचा साक्षात्कार होतो. तथापि सर्व दु:खाचा नि:शेषत: नाश होत नाहीं. लोभद्वेषमोहजन्य मानसिक पीडा तेव्हांच नाहींशी होते; परंतु शारीरिक दु:ख आयुष्य संपेपर्यंत राहतें. बुद्धाला ३६ व्या वर्षींच निर्वाणपदाचा साक्षात्कार झाला होता, त्या वेळीं त्यांचें लोभद्वेषादिजन्य मानसिकदु:ख नष्ट झाले; परंतु शीतोष्णरोगादिजन्य शारीरिक दु:ख पूर्णपणें नष्ट झालें नाहीं. देहावसानीं तेंहि दु:ख नष्ट झालें. अर्हतांच्या मरणाला परिनिर्वाण म्हणतात. कारण मरणानें त्यांच्या शारीरिक दु:खाचाहि अंत होतो. परिनिर्वाणानंतर अर्हत् कोणत्या स्थितींत असतो, याचें वर्णन कोठे आढळत नाहीं. ती स्थिती अनिर्वचनीयच आहे. बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण म्हणतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel