प्रकरण पहिले

आर्यांचा जय
उषोदेवीची सूक्ते

ऋग्वेदात जी उषा देवीची सूक्ते आढळतात, त्यांच्या अनुरोधाने लो. टिळक यांनी आपल्या The Arctic Home in the Vedas  या पुस्तकात आर्य उत्तर ध्रुवाकडे राहत होते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. `सद्शीरद्य सदृशीरिदु श्वो दीर्घं सचन्ते वरुणस्य धाम।’ ऋ. १/१२३/८ (आज आणि उद्या ह्या सारख्याच आहेत त्या दीर्घकाळपर्यंत वरुणाच्या गृहात जातात.)* (*The Arctic Home in the Vedas’ पृष्ठ १०३ पाहा.) लोकमान्यांच्या मते ही आणि अशा तर्‍हेच्या दुसर्‍या ऋचा उत्तर ध्रुवाकडील उष:कालाला उद्देशून लिहिलेल्या आहेत; दीर्घकाळपर्यंत उषा वरुणगृहांत जातात, म्हणजे तिकडे सहा महिनेपर्यंत अंधार असतो, असा अर्थ असला पाहिजे.

परंतु याच सूक्ताच्या बाराव्या ऋचेत `अश्वावतीर्गोमतीर्विश्ववारा’ ही उषा देवीची विशेषणे सापडतात. `ज्यांच्याकडे पुष्कळ घोडे आणि गाई आहेत, आणि ज्या सर्वांना पूज्य आहेत’ असा त्यांचा अर्थ (येथे उषा बहुवचनान्त आहे). उत्तर ध्रुवाकडे सध्या घोडे आणि गाई नाहीतच; आणि ते प्राणी हजारो वर्षांपूर्वी तिकडे होते यालाही काहीच आधार सापडलेला नाही. ह्या एकाच सूक्तात नव्हे, तर उषोदेवीच्या इतर सूक्तातून देखील ती घोडे आणि गाई देणारी, गाईंची जन्मदात्री, इत्यादि विशेषणे भरपूर सापडतात. यावरून ह्या ऋचा किंवा ही सूक्ते उत्तर ध्रुवाकडे रचली नाहीत हे सिद्ध होते.

इश्तर


तर मग दीर्घकालपर्यंत उषा पाताळात जातात याचा अर्थ कसा करावा? बाबिलोनियन लोकात फार प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या इश्तर देवतेच्या दंतकथा लक्षात घेतल्या म्हणजे याचा अर्थ सहज जाणता येतो. तम्मुज किंवा दमुत्सि (वैदिक दमूनस्) या देवावर इश्तरचे प्रेम जडते. पण तो एकाएकी मरण पावतो. त्याला जिवंत करण्यासाठी अमृत आणण्याच्या हेतूने इश्तर पाताळात प्रवेश करते. तेथील राणी अल्लतु ही इश्तरची बहीण. तरी ती इश्तरचा भयंकर छळ करते; क्रमश: तिचे सर्व दागिने काढून घ्यावयास लावून तिला रोगी बनवते आणि कैदेत टाकते. चार किंवा सहा महिने अशा रीतीने दु:ख आणि कैद भोगल्यावर अल्लतूकडून इश्तरला अमृत मिळते; आणि ती पुन्हा पृथ्वीवर येते. Lewis Spence : Myths and Legends of Babylonia and Assyria, (१९२६), pp. १२५-१३१. इश्तरच्या दुसर्‍या अनेक दंतकथा आहेत, पण त्यांत ही दंतकथा प्रमुख दिसते. हिचे वर्णन सर्व बाबिलोनियन वाङ्मयात आढळते. ऋग्वेदातील वरच्या सारख्या ऋचांचा संबंध या दंतकथेशी आहे यात संशय बाळगण्याचे कारण नाही.

इश्तर पाताळातून वर येते;  तेव्हा तिचा त्या ऋतूंत उत्सव मानण्यात येत होता; तांबड्या बैलांच्या गाडीतून तिची रथयात्रा काढीत असत. घोड्यांचा शोध लागल्यानंतर तिचा रथ घोडे ओढीत. `एषा गोभिररुणभिर्युजाना’ ऋ. ५।८०।३ (ही उषा, जिच्या रथाला तांबडे बैल लावले आहेत.) `वितद्ययुररुणयुग्भिरश्वै:’ ऋ. ६।६५।२ (अरुणवर्ण घोड्यांच्या रथातून उषा देवी आल्या.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel