३. कासी

कासी किंवा काशी यांची राजधानी वाराणसी होती. तेथल्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असत,  असे जातक अट्ठकथेवरून दिसून येते. त्यांच्या राज्यपद्धतीसंबंधाने फारशी माहिती सापडत नाही. तथापि काशीचे राजे (महाजन) फारच उदारधी होते. त्यांच्या राज्यात कलाकौशल्याचा उत्तम विकास झाला होता. बुद्धसमकाली देखील उत्कृष्ट पदार्थांना `कासिक’ म्हणत असत. कासिक वस्त्र, कासिक चंदन इत्यादि शब्द त्रिपिटक वाङ्मयात पुष्कळ ठिकाणी आढळतात. वाराणसीतील अश्वसेन राजाच्या वामा राणीच्या उदरी पार्श्वनाथ-जैनांचा तेविसावा तीर्थंकर जन्मला. त्याने आपल्या उपदेशाला सुरवात गोतम बुद्धाच्या जन्मापूर्वी सरासरी २४३ व्या वर्षी केली असावी. म्हणजे काशीचे महाजन केवळ कलाकौशल्यातच नव्हे, तर धार्मिक विचारात देखील अग्रणी होते, असे म्हणावे लागते, परंतु बुद्धसमकाली या देशाचे स्वातंत्र्य पार नष्ट होऊन कोसल देशात त्याचा समावेश झाला होता. `अंगमगधा’ च्या समासाप्रमाणेच `कासीकोसला’ हा देखील  शब्द प्रचारात आला होता.

४. कोसला

कोसल देशाची राजधानी श्रावस्ती. ही अचिरवती (सध्या राप्ती) नदीच्या काठी होती; आणि तेथे पसेनदि (प्रसेनजित्) राजा राज्य करीत असे. तो वैदिक धर्माचा पूर्ण अनुयायी असून मोठमोठाले यज्ञ करीत होता, असे कोसलसुत्तातील एका सुत्तावरून दिसून येते. तथापि त्याच्या राज्यात श्रमणांचा मान ठेवला जात असे. अनाथपिंडिका (याचे खरे नाव सुदत्त होते. अनाथांना तो जेवण (पिण्ड) देत असे, म्हणून त्याला अनाथपिण्डिक म्हणत.) नावाने प्रसिद्धीस आलेल्या एका मोठ्या श्रेष्ठीने बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी श्रावस्ती येथे जेतवन नावाचा विहार बांधला. विशाखा नावाच्या प्रसिद्ध उपासिकेने देखील पूर्वाराम नावाचा एक मोठा प्रासाद भिक्षूंसाठी बांधून दिला. या दोन्ही ठिकाणी बुद्ध भगवान भिक्षुसंघासह मधून मधून राहत असे. त्याचे पुष्कळ चातुर्मास येथेच गेले असावेत का की, बुद्धाने सर्वात जास्त उपदेश अनाथपिंडिकाच्या आश्रमात केल्याचा दाखला त्रिपिटक वाङ्मयात सापडतो. पसेनदि राजा जरी यज्ञयागांचा भोक्ता होता, तरी मधूनमधून तो बुद्धाच्या दर्शनासाठी अनाथपिंडिकाच्या आश्रमात जात असे. त्याला अनेकदा बुद्धाने केलेल्या उपदेशाचा संग्रह कोसलसुत्तांत सापडतो. (या संयुत्ताच्या पहिल्याच सुत्तात पसेनदि बुद्धाचा उपासक झाल्याची कथा आहे; पण नवव्या सुत्तात पसेनदीच्या महायज्ञाचे वर्णन येते. तेव्हा पसेनदि राजा खरा बुद्धोपासक झाला होता, असे म्हणता येत नाही.

ललितविस्तरातील या राजवंशाच्या वर्णनावरून असे दिसून येते की, ते राजे मातंगाच्या हीन जातीतून उदयाला आले. धम्मपद- अट्ठकथेत सापडणार्‍या विडूडभाच्या (विदुर्दभाच्या) गोष्टीवरून देखील ललितविस्तरातील विधानाला बळकटी येते.

पसेनदि राजा बुद्धाला फार मानीत होता. त्याच्या शाक्यकुळातून एखाद्या राजकन्येशी लग्न करण्याचा पसेनदीने बेत केला. पण शाक्य राजे कोसलराजकुलाला नीच मानीत असल्यामुळे त्यांना आपली कन्या कोसलराजाला देणे योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसलराजाचीच सत्ता चालत असल्यामुळे त्याची मागणी नाकबूल करता येईना. त्यांनी अशी युक्ति योजिली की, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तिया हिला महानामाने आपली स्वत:ची कन्या म्हणून कोसल राजाला द्यावी. कोसल राजाच्या अमात्यांना ही कन्या पसंत पडली. महानाम तिच्याबरोबर बसून जेवल्यामुळे ती त्याची मुलगी अशी त्यांची खात्री झाली; आणि ठरल्याप्रमाणे वासभखत्तियेचा शुभमुहूर्तावर कोसल राजाशी विवाह झाला. राजाने तिला पट्टराणी केले. तिचा मुलगा विडूड्भ सोळा वर्षाँचा झाल्यावर आपल्या आजोळी शाक्यांकडे गेला. शाक्यांनी आपल्या संस्थागारात (नगरमंदिरात) त्याचा योग्य सन्मान केला पण तो निघून गेल्यावर त्याचे आसन धुण्यात आले; आणि आपण दासीपुत्र आहो, ही गोष्ट विडूड्भाच्या कानी गेली. वयात आल्यावर विडूड्भाने जबरदस्तीने कोसल देशाचे राज्य बळकावले व वृद्ध पसेनदीला श्रावस्तीतून हाकून दिले. पसेनदि आपला भाचा अजातशत्रू याच्या आश्रयाला जाण्यासाठी अज्ञात वेषाने राजगृहाला जात असता अत्यंत कष्ट पावून राजगृहाबाहेरच्या एका धर्मशाळेत निवर्तले.

बापाच्या निधनानंतर विडूड्भाने शाक्यांवर स्वारी करण्याचा बेत केला. भगवान बुद्धाने त्याला उपदेश करून त्याचा हा बेत दोनदा रहित करविला. परंतु तिसर्‍या वेळी मध्यस्थी करण्याला बुद्धाला सवड न  मिळाल्यामुळे विडूड्भाने आपला बेत पार पाडला. त्याने शाक्यावर स्वारी करून त्यांची दाणादाण केली. जे शरण आले किंवा पळून गेले त्यांना सोडून इतरांची बायकामुलांसकट कत्तल केली व त्यांच्या रक्ताने आपले आसन धुवावयास लावले.

शाक्यांच्या नि:पात करून विडूड्भ श्रावस्तीला येऊन अचिरवतीच्या काठी आपल्या सैन्याचा तळ देऊन राहिला. आसपासच्या प्रदेशात अकालमेघाचा भयंकर वर्षाव होऊन अचिरवतीला महापूर आला, आणि सैन्यातील काही लोकांसह विडूड्भ त्या पुरात सापडून वाहून गेला.

मगध देशाप्रमाणेच कोसल देशात देखील एकसत्ताक राज्यपद्धति बळकट होत चालली होती. हे विडूड्भाच्या कथेवरून स्पष्ट होते. त्याने आपल्या लोकप्रिय बापाची गादी बळकावली असताही कोसलांनी त्याविरुद्ध एक ब्र देखील काढला नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल