एकसत्ताक राज्यात पुरोहिताचे काम वंशपरंपरेने किंवा ब्राह्मणसमुदायाच्या संमतीने ब्राह्मणालाच मिळत असे. मुख्य प्रधानादिकांची कामे देखील ब्राह्मणांनाच मिळत. अर्थात् ब्राह्मण एकसत्ताक राज्यपद्धतीचे मोठे भोक्ते झाले. ब्राह्मणी ग्रंथांत गणसत्ताक राजांचा नामनिर्देश देखील नाही, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. यावरून असे दिसते की, ब्राह्मणांना गणसत्ताक राज्यपद्धति मुळीच पसंत नव्हती. शाक्यांसारखे गणराजे ब्राह्मणांना मान देत नाहीत, असा अवष्ठ ब्राह्मणाने त्यांच्यावर आरोप केल्याचा अंबट्ठसुत्तांत उल्लेख आहे. (चण्डो भो गोतम सक्यजाति.... इब्मा सन्ता इब्मा समाना न ब्राह्मणे रुंगकरोन्ति, न ब्राह्मणे मानेन्ति, इत्यादि।। (दीघनिकाय अम्बट्ठसुत्त). गणराज्यात यज्ञयागांना मुळीच उत्तेजन मिळत नव्हते, आणि एकसत्ताक राज्यांत तर महाराजे यज्ञयाग चालविण्यासाठी ब्राह्मणांना वंशपरंपरेने इनामे देत. एका बिंबिसाराच्या राज्यात सोणदण्ड, कूटदन्त वगैरे ब्राह्मणांना, त्याचप्रमाणे कोसल देशात पोक्खरसाति (पौष्करसादि), तारुक्ख (तारुक्ष) वगैरे ब्राह्मणांना मोठमोठाली इनामे होती, असे सुत्तपिटकातील त्यांच्या वर्णनावरून दिसून येते. तेव्हा ‘परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ’ या न्यायाने ब्राह्मणजातीचे आणि एकतंत्री राज्यपद्धतीचे परस्परांच्या साहाय्याने वर्चस्व वृद्धिंगत होणे साहजिक झाले.

बुद्धसमकाली ब्राह्मणांपेक्षा श्रमणांचे (परिव्राजकांचे) महत्त्व अधिकाधिक वाढत चालले होते, हे पुढील प्रकरणावरून स्पष्ट दिसून येईल. या श्रमणांचा गणसत्ताक राज्याविषयी आदर होता. कारण अशा राज्यांतून यज्ञयागांना कोणी विचारीत नसे. तथापि अध्यात्मचिंतनात गुंतून गेल्यामुळे राजकीय बाबतीत विचार करून या गणसत्ताक राज्यांची सुधारणा कशी करता येईल, ह्याचा मार्ग शोधून काढण्याला त्यांना अवकाशच नव्हता. जे काही चालले आहे ते अपरिहार्य असावे, अशी त्यांची समजूत झाली होती असे दिसते.

गणराजासंबंधाने बुद्धाचा आदर स्पष्ट दिसतो. वज्जींना त्याने उन्नतीचे सात नियम घालून दिल्याचा उल्लेख वर आलाच आहे. परंतु त्याने देखील या जुन्या राज्यघटनेतून नवीन सुव्यवस्थित घटना कशी तयार करता येईल यासंबंधाने आपले विचार प्रकट केल्याचे दिसून येत नाही. गणराजांपैकी एखाद्या राजाने जर जुलूम केला, तर इतर राजांनी एकवट होऊन त्याला आळा घालावा? किंवा या सर्वच गणराजांना लोकांनी वेळोवेळी निवडून देऊन त्यांच्यावर आपला दाब ठेवावा? इत्यादि विचार बौद्धवाङमयात कोठेच सापडत नाहीत.

बुद्धाच्या अनुयायांनी तर गणसत्ताक राज्यांची कल्पना निखालस सोडून दिली. दीघनिकायात नमुनेदार राज्यपद्धति दर्शविणारी चक्कवत्तिसुत्त आणि महासुदस्सनसुत्त अशी दोन सुत्ते आहेत. त्यात चक्रवर्ती राजांचे महत्त्व अतिशयोक्तिपूर्वक वर्णिले आहे. ब्राह्मणांच्या सम्राटामध्ये आणि या चक्रवर्तीमध्ये फरक एवढाच की, पहिला सामान्य जनतेची काळजी न करता पुष्कळ यज्ञयाग करून ब्राह्मणांची तेवढी काळजी घेतो, आणि दुसरा सर्व जनतेला न्यायाने वागवून सुखी करण्यात दक्ष असतो. राज्यात शांतता स्थापित झाल्याबरोबर तो लोकांना उपदेश करतो की,

पाणी न हन्तब्बो, अदिन्नं नादातब्बं, कामेसु मिच्छा न चरितब्बा, मुसा न भासितब्बा, मज्जं न पातब्बं।

‘प्राण्यांची हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये. दारू पिऊ नये.’

म्हणजे बौद्ध गृहस्थांचे जे पाच शीलनियम आहेत, त्यांचे पालन करण्यास हे चक्रवर्ती राजे उपदेश करीत असत. एवंच ब्राह्मणांच्या दृष्टीने काय, किंवा बुद्धाच्या अनुयायांच्या दृष्टीने काय, एकसत्ताक राज्यपद्धतीच चांगली ठरली. तत्त्वाचा फरक नसून तपशिलाचा तेवढा फरक राहिला.

परंतु खुद्द गौतम बोधिसत्त्वावर गणसत्ताक राज्यपद्धतीचा चांगला परिणाम झाला होता. संघांची रचना बुद्धाने गणसत्ताक राज्यांच्या राज्यपद्धतीवरूनच केली असली पाहिजे. यास्तव या गणसत्ताक राज्यांची मिळणारी अल्पस्वल्प माहिती विशेष महत्त्वाची वाटते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel