बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण कोणते?

त्यानंतरचा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे बोधिसत्त्व आपल्या प्रासादातून उद्यानभूमीकडे जातो हा होय. शुद्धोदन महाराजाने त्याच्या वाटेत कोणी म्हातारा, व्याधित किंवा मृत मनुष्य येऊ नये असा बंदोबस्त केला असताही देवता एक निर्मित म्हातारा त्याच्या निदर्शनाला आणतात. आणि बोधिसत्त्व विरक्त होऊन परत आपल्या प्रासादात जातो. दुसर्‍या खेपेला व्याधित, तिसर्‍या खेपेला मृत आणि चौथ्या खेपेला देवता त्याला एक परिव्राजक दाखवितात. त्यामुळे तो पूर्ण विरक्त होऊन व गृहत्याग करून तत्त्वबोधाचा मार्ग शोधून काढण्याला प्रवृत्त होतो. ह्या प्रसंगाची रसभरित वर्णने ललितविस्तरादिक ग्रंथात सापडतात. ती सर्वथैव ग्राह्य नाहीत असे म्हणावे लागते. जर बोधिसत्त्व बापाबरोबर किंवा एकटाच शेतावर जाऊन काम करीत होता आणि आहार कालामाच्या आश्रमात जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकत होता, तर त्याने म्हातारा, व्याधित आणि मृत मनुष्य पाहिला नाही हे संभवेल कसे?

शेवटच्या दिवशी बोधिसत्त्व उद्यानात गेला असता, “देवतांनी एक उत्तम परिव्राजक निर्माण करून त्याच्या निदर्शनाला आणला. तेव्हा बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न केला, हा कोण आहे बरे? जरी त्यावेळी— बोधिसत्त्व बुद्ध झाला नसल्या कारणाने– परिव्राजक किंवा परिव्राजकाचे गुण सारथ्याला माहीत नव्हते तरी देवतांच्या प्रभावाने तो म्हणाला, ‘हा परिव्राजक आहे,’ आणि त्याने प्रव्रज्येचे गुण वर्णिले, असे जातकअट्ठकताराचे म्हणणे. पण जर कपिलवस्तूमध्ये आणि शाक्यांच्या शेजारच्या राज्यात परिव्राजकांचे आश्रम होते तर बोधिसत्त्वाला किंवा त्याच्या सारथ्याला परिव्राजकाची मुळीच माहिती नसावी हे आश्चर्य नव्हे काय?

अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातात (सुत्त नं. १९५) वप्प शाक्याची गोष्ट आली आहे. तो निग्रंथ (जैन) श्रावक होता. एकदा त्याचा व महाभोग्गल्लानाचा संवाद चालला असता बुद्ध भगवान तेथे आला आणि त्याने वप्पाला उपदेश केला. तेव्हा वप्प म्हणाला.  “निर्ग्रंथाच्या (जैन साधूंच्या) उपासनेपासून मला काही फायदा झाला नाही. आता मी भगवंतांचा उपासक होतो.” अट्ठकथाकार वप्प हा भगवंताचा चुलता होता असे म्हणतो. हे म्हणणे महादुक्खक्खन्धसुत्ताच्या अट्ठकथेशी जुळत नाही. काहीही असो, वप्प नावाचा एक वयोवृद्ध शाक्य जैन होता यात शंका नाही. म्हणजे बोधिसत्त्वाच्या जन्मापूर्वीच शाक्य देशात जैन धर्माचा प्रसार झाला होता. तेव्हा बोधिसत्त्वाला परिव्राजकाची महिती नव्हती हे मुळीच संभवत नाही.

मग ह्या सर्व अदभुत गोष्टी बोधिसत्त्वाच्या चरित्रात आल्या कोठून? महापदासुदुत्तातून* वृद्ध मनुष्याला पाहिल्यावर बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न कसा केला, यासंबंधी जातकअट्ठकथाकार म्हणतो, “महापदाने आगतनयेन पुच्छित्वा” (महापदानसुत्तात आलेल्या कथेला अनुसरून प्रश्न विचारून) म्हणजे या सर्व अदभुत कथा महापदानसुत्तावरून घेतल्या आहेत. असे म्हणावे लागते. तर मग बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण काय झाले असावे? याचे उत्तर अत्तदण्डुत्ता स्वत: वृद्ध भगवानच देत आहे.

अत्तदण्डा भयं जातं, जनं पस्सय मेधकं।
संवेगं कित्तयिस्समि यथा संविजितं मया ।।१।।
फन्दमान जं दिस्वा मच्छे अप्पोरके यथा ।
अञ्ञमञ्ञेहि व्यारुद्ध दिस्वा मं भयमविसि ।।२।।
समन्तमसरो लोको, दिसा सव्वा समेरिता।
इच्छं भवनमतनो नाद्दसासि अनोसितं।
ओसाने त्वेव व्यारुद्धे दिस्वा मे अरती अहू ।।३।।
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*अपदान (सं. अवदान) म्हणजे सच्चरित्र. थोराच्या सच्चरित्राचा ज्या सुत्तात संग्रह आहे ते महापदानुसुत्त. यात पूर्वयुगीन सहा व ह्या युगातील गोतमबुद्ध मिळून सात बुद्धाची चरित्रे आरंभी संक्षेपाने देऊन मग विपस्सीबुद्धाचे चरित्र विस्ताराने वर्णिले आहे. तो एक नमुना असून त्याचप्रमाणे इतर बुद्धाची चरित्रे वर्णावी, असे अट्ठकथाकार म्हणतात. ह्या वर्णनातील बहुतेक भाग हे सुत्त रचण्यापूर्वी किंवा नंतर गोतमबुद्धाच्या चरित्रात दाखल करण्यात आले आणि ते खुद्द त्रिपिटकात भिन्न भिन्न स्थळी सापडतात. उद्यानदर्शनाचा भाग मात्र त्रिपिटकात नाही.  जातकअट्ठकथाकाराने उचलला. त्यापूर्वी ललितविस्तरात व बुद्धचरितकाव्यात ह्या कथेचा समावेश करण्यात आला.

गोतम बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधण्यात आले आहे. ही गोष्ट मी ऐतिहासिक समजत होतो. परंतु ती देखील काल्पनिक असावी. कारण शुद्धोदनासारखा स्वत: अंगमेहनत करणारा लहानसा जमीनदार आपल्या मुलासाठी तीन प्रासाद बांधील हे संभवत नाही.

‘दीघनिकाय’ भाग दुसरा, भाषांतकार परलोकवासी चिंतामण वैजनाथ राजवडे, (प्रकाशक, ग्रंथसंपादक व प्रकाश मंडळी नं. ३८०, ठाकूरद्वार रोड मुंबई नं. २) या ग्रंथाच्या आरंभीत महापदानसुत्ताचे मराठी भाषांतर आले आहे. ते जिज्ञासु वाचकांनी अवश्य वाचावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel