आत्मवादांचे परिणाम

ह्या सर्व आत्मवादाचे परिणाम बहुतांशी दोन होत असत. एक चैनीत सुख मानणे, आणि दुसरा तपश्चर्या करून शरीर कष्टविणे. पूरण कस्सपाच्या मताप्रमाणे जर आत्मा कोणाला मारीत नाही, किंवा मारवीत नाही, तर आपल्या चैनीसाठी इतरांची हत्या करण्यास हरकत कोणती? जैनांच्या मताप्रमाणे तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्माने बद्ध झालेली असे म्हटले तर ह्या कर्मापासून सुटण्याला खडतर तपश्चर्या केली पाहिजे असे तत्त्वज्ञान उत्पन्न होणे साहजिक आहे. आत्मा अशाश्वत आहे. तो मेल्यानंतर राहत नाही, असे गृहीत धरले, तर जिवंत असेपर्यंत मौजमजा करून काल कंठावा, किंवा ह्या भोगांची शाश्वती तरी काय असे म्हणून तपश्चर्या करावी, अशी दोन्ही प्रकारची मते निष्पन्न होऊ शकतील.

आत्मवादाचा त्याग


परंतु बुद्ध भगवंताला चैनीचा आणि तपश्चर्येचा असे दोन्ही मार्ग त्याज्य वाटले.

का की, त्यापासून मनुष्यजातीचे दु:ख कमी होत नाही. परस्परांशी भांडणार्‍या जनतेला दोन्ही अंतांपासून शांतीचा मार्ग सापडणे शक्य नाही. ह्या अंताना कारणीभूत आत्मावाद आहे अशी बोधिसत्वाची खात्री झाली. आणि तो सारा बाजूला सारून त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. आत्मा शाश्वत असो किंवा अशाश्वत असो, या जगात दु:ख हेच आहे आणि ते मनुष्यजातीच्या तृष्णेचे फळ होय. आर्य अष्टांगिक मार्गाच्या द्वारे या तृष्णेचा क्षय केला तरच मनुष्याला आणि मनुष्यजातीला शांतिसमाधान मिळेल. हा नवा मार्ग आत्मवाद सोडून दिल्याशिवाय लक्षात येण्याजोगा नव्हता. म्हणून बुद्ध भगवंताने पञ्चवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्यांच्या मागोमाग अनात्मवाद उपदेशिल्याचा दाखला खन्धसंयुत्तात सापडतो.* (*हेच सुत महावग्गातही आहे.)

भगवान वाराणसी येथे ऋषिपत्तनात मृगदावात राहत होता. तेथे भगवान पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, जड शरीर अनात्मा आहे, शरीर जर आत्मा असते तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि माझे शरीर असे होऊ द्या, व याप्रमाणे न होऊ द्या, असे म्हणता आले असते, पण ज्याअर्थी शरीर अनात्मा आहे, त्या अर्थी ते उपद्रवकारक होते, आणि ते याप्रमाणे होऊ द्या, आणि ह्याप्रमाणे होऊ नये, असे म्हणता येत नाही.

“भिक्षु हो, वेदना अनात्मा आहे. ती जर आत्मा असती तर उपद्रवकारक झाली नसती, आणि म्हणता आले असते की, माझे वेदना याप्रमाणे व्हावी आणि याप्रमाणे होऊ नये. पण ज्या अर्थी वेदना अनात्मा आहे, त्या अर्थी ती उपद्रवकारक होते आणि ती अशी व्हावी आणि अशी न व्हावी असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अनात्मा आहे. जर विज्ञान आत्मा असते, तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि म्हणता आले असते की, माझे विज्ञान याप्रमाणे व्हावे व याप्रमाणे होऊ नये. पण ज्या र्थी विज्ञान अनात्मा आहे, त्याअर्थी विज्ञान उपद्रवकारक होते आणि म्हणता येत नाही की, माझे विज्ञान असे व्हावे आणि असे होऊ नये.”

“भिक्षु हो जड शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान नित्य आहेत की अनित्य आहेत?”
“भदन्त ती अनित्य आहेत,” असे भिक्षूंनी उत्तर दिले.
भ.— जे अनित्य आहे ते दु:खकारक की सुखकारक?
भि.— भन्ते, ते दु:खकारक आहे.
भ.— आणि जे दु:खकारक, विपरिणाम पावणारे, ते माझे आहे. ते मी आहे. ती माझा आत्मा आहे, असे समजणे योग्य होईल काय?
भि.— नाही, भदन्त.
भ.— म्हणून, भिक्षुहो, जो काही जड पदार्थ अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरातील किंवा शरीराबाहेरचा स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचा किंवा जवळचा तो सर्व माझा नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही, असे यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जामावे. त्याचप्रमाणे कोणतीही वेदना, कोणतीही संज्ञा, संस्कार जे काही विज्ञान अतीत, सतात, प्रख्युत्पन्न, आपल्या शरीरातील किंवा शरीराबाहेरचे स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचे किंवा जवळचे ते सर्व माझे नवहे, तो माझा आत्मा नव्हे, असे ययार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावे. भिक्षु हो, याप्रमाणे जाणणारा विज्ञान कार्यश्रावक जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, याविषयी विरक्त होतो आणि विरागामुळे विरक्त होतो.

आत्म्याचे पाच विभाग

आत्मा शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, एसा प्रश्न केला असता त्याचे सरळ उत्तर दिल्याने घोटाळा होण्याचा संभव होता, म्हणून बुद्ध भगवंताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचे पृथक्करण या पंचस्कन्धात केले आहे, जड़ पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे पाच विभाग करता येतात आणि ते विभाग पाडल्याबरोबर स्पष्ट दिसते की, आत्मा शाश्वत किंवा आशाश्वत नाही. का की, हे पाचहि स्कन्ध सदोदित बदलणारे म्हणजे अनित्य आहेत, दु:खकारक आहेत आणि म्हणूनच ते माझे किंवा तो माझा आत्मा असे म्हणणे योग्य होणार नाही. हाच बुद्धाचा अनात्मवाद होय. आणि तो शाश्वतवाद व अशाश्वतवाद या दोन टोकांना जात नाही. भगवान कात्यायनगोत्र भिक्षूला उद्देशून म्हणतो, “हे कात्यायन, जनता बहुतकरून अस्तिता आणि नास्तिता य दोन अन्तांना जाते. हे दोन्ही अन्त सोडून तथागत मध्यममार्गाने धर्मोपदेश करतो.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel