प्रकरण बारावे

दिनचर्या
प्रसन्न मुखकान्ति


गोतमाच्या बोधिसत्त्वावस्थेतील, म्हणजे त्याच्या गृहवासातील आणि तपस्याकालातील चर्येचा विचार चवथ्या व पाचव्या प्रकरणात करण्यात आलाच आहे. आता ह्या प्रकरणात बुद्धत्वप्राप्तीपासून परिनिर्वाणापर्यंत त्याच्या दिनचर्येचे दिग्दर्शन करण्याचे योजिले आहे.

तत्त्वबोध झाल्यानंतर बुद्ध भगवंताने बोधिवृक्षाखालीच आपला पुढील जीवन्रम आखला तपश्चर्या तर त्याने सोडून दिलीच होती; आणि पुन्हा कामोपभोगांकडे वळण्याची त्याला वासना राहिली नाही. तेव्हा शरीराच्छादनापुरते वस्त्र व क्षुधाशमनापुरते अन्न ग्रहण करून अवशेष आयुष्य बहुजनहितार्थ लावण्याचा त्याने बेत केला. ह्या निश्चयाचा बुद्धाच्या मुखकान्तीवर कसा परिणाम झाला, याचे वर्णन मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्तात आणि विनयाच्या महावग्गात आढळते. बुद्ध भगवान पंचवर्गीयांना उपदेश करण्याच्या उद्देशाने गयेहून वाराणसीला चालला असता वाटेत त्याला उपक नावाचा आजीवक पंथातील श्रमण भेटला आणि म्हणाला, ‘‘आयुष्मान् गोतमा, तुझा चेहरा प्रसन्न आणि अंगकान्ति तेजस्वी दिसत आहे. तू कोणत्या आचार्याचा शिष्य आहेस?’’

भ॰-
माझा धर्ममार्ग मी स्वत:च शोधून काढला आहे.

उपक- पण तू अरहन्त झाला आहेस काय? तुला जिन म्हणता येईल काय?

भ॰- हे उपका, मी सर्व पापकारक वृत्तींना जिंकले आहे, म्हणून जिन आहे.
उपकाला दिसलेली बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती, असे समजण्यास हरकत नाही.

साधारण दिनचर्या

बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळी ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजूबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावात भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रात शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करुन थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात. धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.

रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामात भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामात आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून सावधगिरीने निजत असे.

सिंहशय्या

बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात. अंगुक्करनिकायातील चतुक्कनिपातात (सुत्त २४४) चार प्रकारच्या शय्या वर्णिल्या आहेत. (१) प्रेतशय्या, ही उताणा निजणार्या माणसांची. (२) कामभोगिशय्या, कामोपभोगांत सुख मानणारे लोक बहुधा डाव्या कुशीवर झोपतात, म्हणून अशा शय्येला कामोपभोगिशय्या म्हणतात. (३) सिंहशय्या, उजव्या पायावर डावा पाय जरा कलता ठेवून आणि मनात मी अमूक वेळी उठणार असे स्मरण करुन मोठय़ा सावधपणे उजव्या कुशीवर झोपणे, याला सिंहशय्या म्हणतात. (४) तथागतशय्या, म्हणजे चार ध्यानाची समाधि.

यापैकी शेवटच्या दोन शय्या बुद्ध भगवंताला पसंत असत. म्हणजे तो रात्रीच्या प्रहरी एक तर ध्यान करी, किंवा मध्यम यामात ही सिंहशय्या पत्करी. पुन्हा रात्रीच्या शेवटच्या यामात तो चंक्रमण किंवा ध्यान करीत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel