शेवटचा आजार

बुद्ध भगवंताच्या शेवटच्या आजाराचे वर्णन महापरिनिब्बानसुत्तात आले आहे. त्या पावसाळ्यापूर्वी भगवान राजगृहाला होता. तेथून मोठय़ा भिक्षूसंघासह प्रवास केरीत वैशालीला आला आणि जवळच्या बेलवु न  गावाच्या गावात स्वत: वर्षावासाठी राहिला. भिक्षूंना सोयीप्रमाणे वैशालीच्या आसपास राहण्यास त्याने परवानगी दिली. त्या पावसाळ्यात भगवान भयंकर आजारी झाला. परंतु त्याने आपली जागृति ढळू दिली नाही. भिक्षूसंघाला पाहिल्याशिवाय परिनिर्वाण पावणे त्याला योग्य वाटले नाही; आणि त्याप्रमाणे त्याने ते दुखणे सहन करून आपल्या आयुष्याचे काही दिवस वाढविले. ह्या दुखण्यातून भगवान बरा झाला, तेव्हा आनंद त्याला म्हणाला, ‘‘भदन्त, आपण दुखण्यातून उठलो हे पाहून मला समाधान वाटते. आपल्या या दुखण्यामुळे माझा जीव दुर्बळ झाला, मला काही सुचेनासे झाले आणि धार्मिक उपदेशाची देखील विस्मृति पडू लागली . तथापि भगवान भिक्षूसंधाला अखेरच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे निर्वाणाप्रत जाणार नाही, अशी मला आशा वाटत होती.’’

भगवान— आनांदा, भिक्षुसंघ मजपासून कोणत्या गोष्टी समजून घेण्याची इच्छा करतो? माझा धर्म मी उघड करून सांगितला आहे. त्यात गुरूकिल्ली ठेवली नाही. ज्याला आपण भिक्षुसंघाचा नायक राहावे व भिक्षूसंघ आपल्यावर अवलंबून असावा असे वाटते, तोच भिक्षूसंघाला अखेरच्या काही गोष्टी सांगेल.  पण हे आनंद, तथागताची भिक्षूसंघाचा नायक होण्याची किंवा भिक्षूसंघ आपणावरच अवलंबून राहावा अशी इच्छा नाही. तेव्हा तथागत शेवटी भिक्षूसंघाला कोणती गोष्ट सांगणार? हे आनंदा, मी आता जीर्ण आणि बृद्ध झालो आहे. मला ऐशी वर्षे झाली. मोडका खटारा जसे बांबूचे तुकडे बांधून कसा तरी चालतो, तसा माझा काय कसाबसा चालला आहे. ज्यावेळी मी विरोध समाधीची भावना करतो, त्यावेळी काय ते माझ्या देहाला बरे वाटते. म्हणून आनंदा, आता तुम्ही स्वत:वरच अवलंबून राहा. आत्म्यालाच द्वीप बनवा. धर्मालाच द्वीप बनवा. आत्म्यालाच शरण जा, आणि धर्मोलाच शरण जा.

अशी स्थिति होती तरी भगवान बेलुव गावाहून परत वैशालीली आला. तेथे आनंदाला पाठवून त्यांने भिक्षूसंघाला महावनातील कुटागार शाळेत गोळा केले व बराच उपदेश केला. त्यानंतर भगवान भिक्षूसंघासह भांडग्रांम, हस्तिग्राम, आम्रग्राम, जंबुग्राम, भोगनगर, इत्यादि ठिकाणी प्रवास करीत पावा नावाच्या नगराला येऊन चुन्द लोहाराच्या आम्रवनात उतरला. चुंदाच्या घरी भगवंताला आणि भिक्षूसंघाला आमंत्रण होते. चुंदाने जी पक्वाने केली होती, त्यांत ‘सूकरमद्दब’ नावाचा एक पदार्थ होता. तो भगवंताने खाल्ल्याबरोबर भगवान अतिसाराच्या विकाराने आजारी झाला. तथापि त्या वेदना सहन करून भगवंताने ककुत्या आणि हिरण्यवती या दोन नद्या ओलांडल्या आणि कुसिनारेपर्यंत प्रवास केला. तेथील मल्लांच्या शालवनात त्या रात्रीच्या पश्चिम यामात बुद्ध भगवान परिनिर्वाण पावला.

येणेप्रमाणे भगवंताच्या अत्यंत बोधप्रद आणि कल्याणप्रद जीवनाचा अन्त झाला. तथापि त्याचे सुपरिणाम भिन्नभिन्न रुपाने आजतागायत घडत आले आहेत आणि तसेच ते पुढेही मानवजातीच्या इतिहासात घडत राहतील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel