आत्मवादाचा त्याग

परंतु बुध्द भगवन्ताला चैनीचा आणि तपश्चर्येचा असे दोन्ही मार्ग त्याज्य वाटले. कां की, त्यांपासून मनुष्यजातीचें दु:ख कमी होत नाही. परस्परांशीं भांडणार्‍या जनतेला दोन्ही अंतांपासून शांतीचा मार्ग सापडणें शक्य नाही. ह्या अंतांना कारणीभूत आत्मवाद आहे, अशी बोधिसत्वाची खात्री झाली, आणि तो सारा बाजूला सारून त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. आत्मा शाश्वत असो किंवा अशाश्वत असो, या जगांत दु:ख आहेच आहे. आणि तें मनुष्यजातीच्या तृष्णेचें फळ होय. आर्य अष्टांगिक मार्गाच्या द्वारे त्या तृष्णेचा क्षय केला तरच मनुष्याला आणि मनुष्यजातीला शांतिसमाधान मिळेल. हा नवा मार्ग आत्मवाद सोडून दिल्याशिवाय लक्षांत येण्याजोगा नव्हता. म्हणून बुध्द भगवन्ताने पञ्चंवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्यांच्या मागोमाग अनात्मवाद उपदेशिल्याचा दाखला खन्धसंयुत्तांत सापडतो.*
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हेच सुत्त महावग्गांतही आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भगवान् वारणसी येथे ऋषिपत्तनांत मृगदावांत राहत होता. तेथे भगवान् पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला,'' भिक्षुहो, जड शरीर अनात्मा आहे, शरीर जर आत्मा असतें, तर ते उपद्रवकारक झाले नसतें, आणि माझें शरीर असें होऊं द्या, व याप्रमाणें न होऊं द्या, असें म्हणता येत नाही. ''

'' भिक्षु हो, वेदना अनात्मा आहे. ती जर  आत्मा असती तर उपद्रवकारक झाली नसती, आणि म्हणतां आलें असतें की माझी वेदना याप्रमाणें व्हावी, आणि याप्रमाणे होऊं नये. पण ज्या अर्थी वेदना अनात्मा आहे, त्या अर्थी ती उपद्रवकारक होते, आणि ती अशी व्हावी आणि अशी न व्हावी असें म्हणतां येत नाही. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अनात्मा आहे. जर विज्ञान आत्मा असतें तर तें उप्रद्रवकारक झाले नसतें आणि म्हणतां आलें असतें की, माझें विज्ञान याप्रमाणें व्हावें व याप्रमाणें होऊं नये. पण ज्या अर्थी विज्ञान अनात्मा आहे, त्याअर्थीं विज्ञान उपद्रवकारक होतें, आणि म्हणता येत नाही की, माझें विज्ञान असें व्हावें आणि असें होऊं नये .''

'' भिक्षु हो, जड शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान नित्य आहेत की अनित्य आहेत?''

''  भदन्त, ती अनित्य आहेत,'' असें भिक्षूंनी उत्तर दिलें.
भ. - जें अनित्य आहे तें दु:खकारक की सुखकारक?
भि. - भन्ते, ते दु:खकारक आहे.
भ.- आणि जें दु:खकारक, विपरीणाम पावणारें, तें माझें आहे, तें मी आहें, तो माझा आत्मा आहे, असें समजणें योग्य होईल काय?

भि. - नाही, भदन्त.

भि. - म्हणून, भिक्षुहो, जो कांही जड पदार्थ अतीत, अनागत, प्रत्युत्पन्ना, आपल्या शरीरांतील किंवा शरीराबाहेरचा, स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचा किंवा जवळचा तो सर्व माझा नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही, असे यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावें. त्याचप्रमाणें कोणतीही वेदना, कोणतीही संज्ञा, संस्कार, जें कांही विज्ञान, अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरांतील किंवा शरीराबाहेरचें, स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचें किंवा जवळचें तें सर्व माझें नव्हे. तें मी नव्हे, तो माझा आत्मा नव्हे, असें यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावें. भिक्षु हो, याप्रमाणें जाणणारा विद्वान आर्यश्रावक जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, यांविषयी विरक्त होतो, आणि या विरागामुळे विमुक्त होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel