श्रमण पंथाचा वेदविरोध

अजितकेसकंबल नास्तिकमतप्रर्वतक असल्यामुळे यज्ञयागांवरच नव्हे, तर वेदांवर देखील टीका करीत असावा असे सर्वदर्शनांतील

चार्वाक मताच्या वर्णनावरून अनुमान करतां येतं. चार्वाकमंतप्रदर्शक जे कांही श्लोक सर्वदर्शनांत आहेत, त्यांपैकी हा दीड श्लोक आहे---

पशुश्चेन्निहत: स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते॥......
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा:।

'अग्निष्टोम यज्ञांत मारलेला पशु जर स्वर्गाला जातो, तर त्या यज्ञांत यजमान आपल्या पित्याचा वध कां करीत नाही? ... वेदांचे कर्ते भण्ड, धूर्त, राक्षस हे तिघे आहेत.'

यावरून असें दिसून येतें की, बहुतेक श्रमण संप्रदाय कमी जास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत, आणि त्यांना वेदनिंदक म्हणण्यास हरकत नव्हती; परंतु बुध्दाने वेदाची निंदा केल्याचा दाखला कोठेचे आढळत नाही. याच्या उलट वेदाभ्यासाचा जिकडे तिकडे गौरव सापडतो. बुध्दाच्या भिक्षुसंघात महाकात्यायनासारखे वेदपांरगत ब्राह्मण होते. तेव्हा बुध्द भगवान् वेदनिंदा करी, हे संभवतच नाही. पण यज्ञयागांत होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती.

यज्ञांचा निषेध

कोसलसंयुत्तांत यज्ञयागांचा निषेध करणारें सुत्त आहे तें असें-''बुध्द भगवान् श्रावस्तीं येथे रहात होता. त्या वेळीं पसेनदि कोसल राजाच्या महायज्ञाला सुरवात झाली. त्यांत पांचशे बैल, पांचशे गोहरे, पांचशें कालवडी, पांचशें बकरे व पाचशें मेंढे बलिदानासाठी यूपांना बांधले होते. राजाचे दास, दूत व कामगार दंडाच्या भयाने भयभीत होऊन आसवें गाळीत, रडत रडत यज्ञाचीं कामें करीत होते.

'' तें सर्व भिक्षूंनी पाहून भगवंताला सांगितलें. तेव्हा भगवान् म्हणाला,
अस्समेधं पुरिसमेधं सम्मापासं वाजपेय।
निरग्गळं महारम्भा न ते होन्ति महप्फला||
अजेळका च गावो च विविधा यत्थ हञ्ञरे।
न तं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो ||
ये च यञ्ञा निरारम्भा यजन्ति अनुकूलं सदा | 
अजेळका च गावो च विविधा नेत्थ हञ्ञरे।
एतं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो।
एतं यजेथ मेधावी एसो यञ्ञो महफ्फलो॥
एतं हि यजमानस्य सेय्यो होति न पापियो।
यञ्ञो च विपुलो होति पसीदन्ति च देवता॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel