भगवंताने खालील कथा सांगितली-

प्राचीन काळीं महाविजित नांवाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. एके दिवशीं एकान्तामध्ये बसला असतां त्या राजाच्या मनांत असा विचार आला की, आपणापाशीं पुष्कळ संपत्ति आहे; तिचा महायज्ञांत व्यय केला, तर तें कृत्य आपणास चिरकाल हितावह आणि सुखावह होईल. हा विचार त्याने आपल्या पुरोहिताला सांगितला, आणि तो म्हणाला, 'हे ब्राह्मणा, मी महायज्ञ करूं इच्छितों. तो कोणत्या प्रकारें केला असता मला हितावह आणि सुखावह होईल तें सांग.''

पुरोहित म्हणाला, 'सध्या आपल्या राज्यांत शांतता नाही; गावें आणि शहरे लुटलीं जात आहेंत, वाटमारी होत आहे. अशा स्थितींत जर आपण लोंकावर कर बसविला, तर कर्तव्यापासून विमुख व्हाल. आपणाला असें वाटेंल की, शिरच्छेद करून, तुरूंगांत घालून, दण्ड करून किंवा आपल्या राज्यांतून हाकून देऊंन चोरांचा बंदोबस्त करतां येईल. परंतु ह्या उपायांनी बंडाळीचा पूर्णपणे बंदोबस्त होणार नाही. कां की, जे शिल्लक राहतील, ते चोर पुन्हा बंडे उपस्थित करतील. ती साफ नाहीशी करण्याचा खरा उपाय आहे तो असा- जे आपल्या राज्यांत शेती करू इच्छितात, त्यांना बीबियाणें भरपूर मिळेल अशी व्यवस्था करा. जे व्यापार करूं इच्छितात, त्यांना भांडवल कमी पडूं देऊं नका. जे सरकारी नोकरी करूं इच्छितात, त्यांना योग्य वेतन देऊंन, यथायोग्य कार्याला लावा. अशा रीतीने सर्व माणसें आपापल्या कामांत दक्ष राहिल्यामुळे राज्यांत बंडाळी उत्पन्न होण्याचा संभव राहणार नाही; वेळोवेळी कर वसूल होऊन तिजोरीची अभिवृध्दि होईल. बंडवाल्यांचा उपद्रव नष्ट झाल्यामुळे लोक निर्भयपणें आपले दरवाजे उघडे टाकून मुलांबाळांसकट मोठया आंनदाने कालक्रमणा करतील.”

पुरोहित ब्राह्मणाने सांगितलेला बंडाळीचा नाश करण्याचा उपाय महाविजित राजाला पसंत पडला. आपल्या राज्यांत शेती करण्याला समर्थ लोकांना बीबियाणें पुरवून त्याने शेती करावयास लावलें; जे व्यापार करण्याला समर्थ होत, त्यांना भांडवल पुरवून व्यापाराची अभिवृध्दि केली, आणि जे सरकारी नोकरीला योग्य होते त्यांची सरकारी कामावर यथायोग्य स्थळीं योजना केली. हा उपाय अमंलात आणल्याने महाविजिताचें राष्ट्र अल्पावकाशामतच समृध्द झालें. दरोडे आणि चोर्‍या नामशेष झाल्यामुळे कर वसूल होऊन तिजोरी वाढली, आणि लोक निर्भयपणे दरवाजे उघडे टाकून आपल्या मुलांना खेळवीत काळ कंठूं लागले.

एके दिवशीं महाविजित राजा पुरोहिताला म्हणाला, '' भो ब्राह्मणा, तुम्ही सांगितलेल्या उपायाने माझ्या राज्यांतील बंडाळी नष्ट झाली आहे. माझ्या तिजोरीची सांपत्तिक स्थिति फार चांगली असून राष्ट्रांतील सर्व लोक निर्भयपणें आणि आनंदाने राहतात. आता मी महायज्ञ करूं इच्छितो. त्याचें विधान मला सांगा.''

पुरोहित म्हणाला,'आपणाला महायज्ञ करावयाचा असेल, तर त्या कामीं प्रजेची अनुमति घेतली पाहिजे. यास्तव प्रथमत: राज्यांतील सर्व लोकांना जाहीर रीतीने आपली इच्छा दर्शवून त्या कामी त्यांची सम्मति मिळवा.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel