सिंहशय्या

बुध्दाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात. अंगुत्तरनिकायातील चतुक्कनिपातांत (सुत्त २४४) चार प्रकारच्या शय्या वर्णिल्या आहेत. (१) प्रेतशय्या, ही उताणा निजणार्‍या माणसांची (२) कामभोगिशय्या कामोपभोगांत सुख मानणारे लोक बहुधा डाव्या कुशीवर झोपतात, म्हणून अशा शय्येला कामोपभोगिशय्या म्हणतात. (३) सिंहशय्या. उजव्या पायावर डावा पाय जरा कलता ठेवून आणि मनांत मी अमुक वेळीं उठणार असें स्मरण करून मोठया सावधानपणें उजव्या कुशीवर झोपणें, याला सिंहशय्या म्हणतात.
(४) तथागतशय्या, म्हणजे चार ध्यानाची समाधि.

यांपैकी शेवटच्या दोन शय्या बुध्द भगवंताला पसंत असत. म्हणजे तो रात्रीच्या प्रहरीं एक तर ध्यान करी, किंवा मध्यम यामांत ही सिंहशय्या पतकरी. पुन्हा रात्रीच्या शेवटच्या यामांत चंक्रमण किंवा ध्यान करीत असे.

मिताहार

बुध्द भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यांत त्याने अतिरेक केला नाही. आणि हा उपदेश तो पुन:पुन: भिक्षूंना करी. भगवान आरंभी रात्रीं जेवीत असे, असें मज्झिमनिकायांतील (नं.७०) कीटागिरिसुत्तावरून दिसून येतें. त्यांत भगवान म्हणतो,''भिक्षुहो, मी रात्रीचें जेवण सोडलें आहे, आणि त्यामुळे माझ्या शरीरांत व्याधि कमी झाली आहे, जाडय कमी झालें आहे, अंगीं बळ आलें आहे आणि चित्ताला स्वास्थ मिळत आहे. भिक्षुहो, तुम्ही देखील याप्रमाणें वागा. तुम्ही जर रात्रींचे जेवण सोडलें, तर तुमच्या शरीरांत व्याधि कमी होईल, जाडय कमी होईल, अंगी शक्ति येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ मिळेल.''

तेव्हापासून भिक्षूंची दुपारचे बारा वाजण्यापूर्वी जेवण्याची वहिवाट सुरू झाली. आणि बारा वाजल्यानंतर जेवणें निषिध्द मानण्यांत येऊ लागलें.

चारिका

चारिका म्हणजे प्रवास. ती दोन प्रकारची, शीघ्र चारिका आणि सावकाश चारिका. यांसबंधाने अंगुत्तरनिकायाच्या पंचक निपातांत तिसर्‍या वग्गाच्या आरंभी सुत्त आहे तें असें-

भगवान म्हणतो,'' भिक्षुहो, शीघ्र चारिकेमध्ये हे पांच दोष आहेत. ते कोणते ? पूर्वी जे धर्मवाक्य ऐकलें नसेल, तें ऐकूं शकत नाही; जें ऐकलें असेल, त्यांचें संशोधन होत नाही; कांही गोष्टीचें पूर्ण ज्ञान मिळत नाही; त्याला कधी कधी भयंकर रोग जडतो; आणि मित्र मिळत नाहीत. भिक्षुहो, शीघ्र चारिकेंत हे पांच दोष आहेत.

''भिक्षुहो, सावकाश चारिकेंत हे पांच गुण आहेत. ते कोणते? पूर्वी जें धर्मवाक्य ऐकलें नसेल, तें ऐकूं शकतो; जें ऐकले असेल, त्याचें संशोधन होतें; कांही गोष्टींचे पूर्ण ज्ञान मिळतें; त्याला भयंकर रोग होत नाहीत ; आणि मित्र मिळतात. भिक्षुहो, सावकाश चारिकेत हें पाचं गुण आहेत....''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel