(१२) भिक्षुहो, बोधिसत्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हां जमिनीवर पडण्यापूर्वी चार देवपुत्र त्याला घेतात व मातेच्या पुढे ठेवून म्हणतात,''देवी आनंद मान, महानुभाव पुत्र तुला झाला आहे.'' असा हा स्वभावनियम आहे.

(१३) भिक्षुहो, बोधिसत्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो, तेव्हां उदरोदक, श्लेष्मा, रूधिर अथवा इतर घाणीने लडबडलेला नसतो; शुध्द आणि स्वच्छ असा बाहेर निघतो. भिक्षुहो, रेशमी वस्त्रावर बहुमूल्य मणि ठेवला तर तो तें वस्त्र घाण करीत नाही, किंवा तें वस्त्र त्या मण्याला मलिन करीत नाही, कां तर दोन्ही शुध्द असतो. त्याचप्रमाणें बोधिसत्व बाहेर निघतो तेव्हा शुध्द असतो. असा हा स्वभावनियम आहे.

(१४) भिक्षुहो, बोधिसत्व मातेच्या कुक्षींतून बाहेर निघतो, तेव्हा अंतरिक्षांतून एक शीतल व दुसरी उष्ण अशा उदकधारा खाली येतात व बोधिसत्वाला व त्याच्या मातेला धुवून काढतात. असा हा स्वभावनियम आहे.

(१५) भिक्षुहो, जन्मल्याबरोबर बोधिसत्व पायावर सरळ उभा राहून उत्तरेकडे सात पावलें चालतो-त्या वेळीं त्याच्यावर श्वेतछत्र धरण्यांत येते- आणि सर्व दिशांकडे पाहून गर्जतो,''मी जगांत अग्रगामी आहें; जेष्ठ आहें, श्रेष्ठ आहे; हा शेवटचा जन्म; आता पुनर्जन्म नाही.''असा हा स्वभावनियम आहे.

(१६) भिक्षुहो, बोधिसत्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो तेव्हा देव, मार, ब्रह्मा (पुढील मजकूर कलम २ प्रमाणे)......

भिक्षुहो, विपस्सी कुमार जन्मल्याबरोबर बंधुमा राजास कळविण्यात आलें की, ''महाराज, आपणाला पुत्र झाला आहे, त्याला महाराजांनी पाहावें.'' भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सी कुमाराला पाहिलें आणि ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून त्याचीं लक्षणें पाहावयास सांगितली.

ज्योतिषी म्हणाले,'' महाराज, आनंदित व्हा; आपणाला महानुभाव पुत्र झाला आहे. आपल्या कुळात असा पुत्र झाला हें आपलें मोठें भाग्य होय. हा कुमार बत्तीस महापुरूषलक्षणांनी युक्त आहे. अशा महापुरूषाच्या दोनच गति होतात, तिसरी होत नाही. तो जर गृहस्थाश्रमांत राहिला तर धार्मिक धर्मराजा, चारीसमुद्रापर्येंत पृथ्वीचा मालक, राज्यांत शांतता स्थापन करणारा, सात रत्नांनी समन्वित असा चक्रवर्ती राजा होतो. त्याचीं सात रत्नें ही - चक्ररत्न, हस्तिरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहपतिरत्न व सातवें परिणायकरत्न.* त्याला हजाराच्या वर शूरवीर, शत्रूसेनेचें मर्दन करणारे असे पुत्र होतात. तो समुद्रापर्यंत ही पृथ्वी दण्डावांचून आणि शस्त्रावाचून धर्माने जिंकून राज्य करतो. परंतु जर त्याने प्रव्रज्या घेतली तर तो या जगामध्ये अर्हन् सम्यक् संबुध्द व अविद्यावरण दूर करणारा होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel