Bookstruck

*परिशिष्ट 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्व एकांतात विचार करीत असतां त्याच्या मनांत विचार आला की, लोकांची अत्यंत वाईट स्थिती आहे. ते जन्माला येतात, म्हातारे होतात आणि मरतात; च्युत होतात आणि उत्पन्न होतात; तरी या दु:खापासून सुटका कशी करून घ्यावी हें जाणत नाहीत. ते हें कधी जाणतील?

आणि भिक्षुहो, जरामरण कशाने उत्पन्न होतें याचा विपस्सी बोधिसत्व विचार करूं लागला. तेव्हा त्याने प्रज्ञालाभाने जाणलें की, जन्म आला म्हणजे जरामरण येतें. आणि जन्म कशामुळे येतो? भवामुळे. भव कशामुळे ? उपादानामुळे. उपादान तृष्णेमुळे, तृष्णा वेदनेमुळे, वेदना स्पर्शामुळे, स्पर्श षडायतनामुळे, षडायतन नामरूपामुळे, नामरूप विज्ञानामुळे उत्पन्न होतें. ही कारणपंरपंरा विपस्सी बोधिसत्वाने अनुक्रमाने जाणली. त्याचप्रमाणें जन्म नसला तर जरामरण येत नाही. भव नसला तर जन्म होत नाही......विज्ञान नसलें तर नामरूप होत नाही, हें देखील त्याने जाणले. आणि तेणेंकरून त्यांच्या मनात धर्मचक्षु, धर्मज्ञान, प्रज्ञा, विद्या आणि आलोक उत्पन्न झाला.

आणि भिक्षुहो, अर्हन्, सम्यक् संबुध्द विपस्सी भगवंताच्या मनांत धर्मोपदेश करण्याचा विचार आला. पण त्याला वाटलें, हा गंभीर, दुर्दर्श, समजण्यास कठिण, शांत, प्रणीत, तर्काने न कळण्यासारखा, निपुण, पंडितांनीच जाणण्याला योग्य असा धर्म मी प्राप्त करून घेतला आहे. पण हे लोक चैनींत गढलेले, चैनीत रमणारे, अशांना कारणपरंपरा, प्रतीत्यसमुत्पाद समजणें कठीण आहे. सर्व संस्कारांचें शमन, सर्व उपाधींचा भाग त्याग, तृष्णेचा क्षय, विराग, निरोध, निर्वाण देखील त्यांना दुर्गम आहे. मी धर्मोपदेश केला आणि तो त्यांना समजला नाही, तर मलाच त्रास, मलाच उपद्रव होईल.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताला पूर्वी कधी न ऐकलेल्या पुढील गाथा अकस्मात सुचल्या -

जे मी प्रयासाने मिळविलें आहे, तें इतरांस सांगणें नको
रागद्वेषाने भरलेल्यांना या धर्माचा बोध सहज होण्याजोगा नाही॥
प्रवाहाच्या उलट जाणारा, निपुण,गंभीर,दुर्दश आणि अणुरूप
असा हा धर्म अंधकाराने वेढलेल्या कामासक्तांना दिसणार नाही॥
भिक्षुहो, अर्हन्त सम्यक्संबुध्द विपस्सी भगवंताचें ह्या विचाराने धर्मोपदेशाकडे चित्त न वळतां एकाकी राहण्याकडे वळलें. महाब्रह्मा तो विचार जाणून आपल्याच मनात उग्दारला,''अरेरे! जगाचा नाश होत आहे! विनाश होत आहे !! कां की, अर्हन् सम्यक् संबुध्द विपस्सी भगवंताचें मन धर्मोपदेश करण्याकडे न वळता एकाकी राहण्याकडे वळतें!”

तेव्हा भिक्षुहो, जसा एखादा बलवान् पुरूष आखडलेला हात पसरतो, किंवा पसरलेला आखडतो, इतक्या त्वरेने तो महाब्रह्मा ब्रह्मलोकांत अंतर्धान पावून विपस्सी भगवंतापुढे प्रकट झाला आणि आपलें उपवस्त्र एका खांदयावर करून उजवा गुढगा जमिनीला टेकून हात जोडून भगवंताला म्हणाला,''भगवन्, धर्मदेशना कर ! सुगत, धर्मदेशना कर! कांही प्राणी असे आहेत की, त्यांचे डोळे धुळीने भरले नाहीत. ते धर्म ऐकण्यास न मिळाल्यामुळे नाश पावत आहेत. असे धर्म जाणणारे लोक मिळतील.''
« PreviousChapter ListNext »