सोळा राज्यांचा ललितविस्तारांत उल्लेख
या सोळा राज्यांचा उल्लेख ललितविस्तरांत सापडतो, असें वर म्हटलेंच आहे. प्रसंग असा आहे की, बोधिसत्त्व तुषितदेवभवनांत असतां कोणत्या राज्यांत जन्म घेऊन लोकोद्धार करावा याचा विचार करतो. त्याला निरनिराळे देवपुत्र भिन्नभिन्न राजकुलांचे गुण सांगतात व दुसरे कांही देवपुत्र त्या कुलांचे दोष दाखवितात.

मगधराजकुल
(१) कोणी देवपुत्र म्हणाले, ''मगध देशामध्ये हें वैदेहिकुल फार संपन्न असून बोधिसत्त्वाला जन्मण्याला तें स्थान योग्य आहे.'' यावर दुसरे देवपुत्र म्हणाले, ''हें कुल योग्य नाही. कारण, तें मातृशुद्ध आणि पितृशुद्ध नसून चंचल आहे; विपुल पुण्याने अभिषिक्त झालेलें नाही. उद्यान, तडाग इत्यादिकांनी त्यांची राजधानी सुशोभित नसून जंगली लोकांना शोभेल अशी आहे.''

कोसलराजकुल
(२) दुसरे देवपुत्र म्हणाले, ''हें कोसलकुल सेना वाहन व धन यांनी संपन्न असल्यामुळे बोधिसत्त्वाला प्रतिरूप आहे.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''तें मातंगच्युतीपासून उत्पन्न झालें असून मातृपितृशुद्ध नाही, आणि हीन धर्मावर श्रद्धा ठेवणारें आहे. म्हणून तें योग्य नव्हे.''

वंशराजकुल
(३) दुसरे म्हणजे, ''हें वंशराजकुल भरभराटीला आलेलें, व सुक्षेम असून त्याच्या देशांत संपन्नता असल्याकारणाने तें बोधिसत्त्वाला योग्य आहे.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''तें प्राकृत आणि चंड आहे. परपुरुषांपासून त्या कुलांतील पुष्कळ राजांचा जन्म झाला आहे. आणि त्या कुलांतील सध्याचा राजा उच्छेदवादी (नास्तिक) असल्याकारणाने तें बोधिसत्त्वाला योग्य नाही.''

वैशालींतील राजे
(४) दुसरे देवपुत्र म्हणाले, ''ही वैशाली महानगरी भरभराटीला चढलेली, क्षेम, सुमिक्ष, रमणीय, मनुष्यांनी गजबजलेली, घरें आणि वाडे यांनी अलंकृत, पुष्पवाटिका आणि उद्यानें यांनी प्रफुल्लित अशी असल्यामुळे जणूं देवांच्या राजधानीचें अनुकरण करीत आहे. म्हणून बोधिसत्त्वाला जन्मण्यास ती योग्य दिसतें.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''तेथल्या राजांचें परस्परांविषयीं न्याय्य वर्तन नाही. ते धर्माचरणी नव्हत. आणि उत्तम, मध्यम, वृद्ध व जेष्ठ इत्यादिकांविषयीं ते आदर बाळगीत नाहीत. प्रत्येक जण आपल्यालाच राजा समजतो. कोणी कोणाचा शिष्य होऊं इच्छीत नाही. कोणी कोणाची चाड ठेवीत नाही. म्हणून ती नगरी बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.''

अवंतिराजकुल

(५) दुसरे देवपुत्र म्हणाले, ''हें प्रद्योताचें कुल अत्यंत बलाढ्य, महावाहनसंपन्न व शत्रुसेनेवर विजय मिळवणारें असल्याकारणाने बोधिसत्त्वाला योग्य आहे.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''त्या कुलांतील राजे चंड, क्रूर, कठोर बोलणारे आणि धाडसी आहेत. कर्मांवर त्यांचा विश्वास नाही. म्हणून तें कुल बोधिसत्त्वाला शोभण्यासारखें नाही.''

मथुराराजकुल

(६) दुसरे म्हणाले, ''ही मथुरा नगरी समृद्ध, क्षेम, सुभिक्ष आणि मनुष्यांनी गजबजलेली आहे. कंसकुलांतील शूरसेनांचा राजा सुबाहु त्याची ही राजधानी आहे. ही बोधिसत्त्वाला योग्य होय.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''हा राजा मिथ्यादृष्टि कुलांत जन्मलेला असून दस्युराजा असल्यामुळे ही नगरी देखील बोधिसत्त्वाला योग्य नाही.''

कुरुराजकुल
(७) दुसरे म्हणाले, ''या हस्तिनापुरामध्ये पांडव कुलांतील शूर आणि सुस्वरूप राजा राज्य करीत आहे. परसैन्याचा पराभव करणारें तें कुल असल्यामुळे बोधिसत्त्वाला योग्य आहे.'' त्यावर दुसरे म्हणाले, ''पांडव कुलांतील राजांनी आपला वंश व्याकूळ करून टाकला आहे. युधिष्ठिराला धर्माचा, भीमसेनाला वायूचा, अर्जुनाला इन्द्राचा आणि नमुल-सहदेवांना अश्विनांचे पुत्र म्हणतात. यास्तव हें देखील कुल बोधिसत्त्वाला योग्य नाही.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel