बोधिसत्त्वाचा जन्म

''मायादेवी दहा महिन्यांची गरोदर होती. तेव्हा तिने माहेरी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली.  शुद्धोदन राजाने तिची इच्छा जाणून कपिलवस्तूपासून देवदह नगरापर्यंश्त सर्व मार्ग साफसूफ करून ध्वजपताकादिकांनी शृंगारला, आणि तिची सोन्याच्या पालखींतून मोठ्या लवाजम्यासह माहेरीं रवानगी केली.  तिकडे जात असतां वाटेंत लुम्बिनीवनांत ती एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली.''  हा जातकाच्या निदानकथेंतील वर्णनाचा सारांश. शुद्धोदन राजा जर एक सामान्य जमीनदार होता तर तो एवढा सगळा मार्ग शृंगारूं शकेल हें संभवनीयच नाही.  दुसरें हें की, दश मास पूर्ण झाल्यावर गरोदर स्त्रीला कोणीही माहेरीं पाठवणार नाहीत.  तेव्हा या गोष्टींत फारच अल्प तथ्य आहे असें दिसतें.

महापदानसुत्तांत बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो तिथपासून जन्मल्यानंतर सात दिवसांचा होईपर्यंत एकंदरींत सोळा लोकोत्तर विशेष (धम्मता) घडून येतात, असें वार्णिलें आहे.  त्यांपैकी (९) बोधिसत्त्वाची आई दहा महिने पूर्ण झाल्यावरच प्रसूत होते, (१०) ती उभी असतांना प्रसूत होते आणि (८) बोधिसत्त्व जन्मल्यावर सात दिवसांनी मरण पावते, हे तीन लोकोत्तर विशेष गोतम बोधिसत्त्वाच्या आयुष्यांतून घेतले असावेत.  बाकीचे सर्व काल्पनिक असून हळूहळू त्यांचाही प्रवेश गोतमाच्या चरित्रांत झाला असें दिसतें.  सारांश, बोधिसत्त्वाची माता उभी असतांना प्रसूत झाली आणि त्याच्या जन्मानंतर सात दिवसांनी निवर्तली असें गृहीत धरून चालण्यास हरकत नाही.  जातकाच्या निदानकथेंत ती शालवृक्षाखाली प्रसूत झाली, आणि ललितविस्तरांत प्लक्ष वृक्षाखाली झाली असें वर्णन आहे.  लुम्बिनी गावांत शुद्धोदनाच्या घरीं बाहेर बगीच्यांत फिरत असतां ती प्रसूत झाली, मग ती शालवृक्षाखाली असो किंवा प्लक्षवृक्षाखाली असो.  मात्र उभी असतांना प्रसूत झाली, एवढेंच ह्या वर्णनांत तथ्य आहे, असें समजावें.

बोधिसत्त्वाचें भविष्य

''बोधिसत्त्व जन्मल्यानंतर त्याला मातेसह घरीं आणून शुद्धोदनाने मोठमोठ्या पंडित ब्राह्मणांकडून त्याचें भविष्य वर्तविलें.  पंडितांनी त्याची बत्तीस लक्षणें पाहून हा एकतर चक्रवर्ती राजा होणार, किंवा सम्यक् संबुद्ध होणार असें भविष्य सांगितलें.''  अशा अर्थाचीं विस्तृत वर्णनें जातकाच्या निदानकथेंत, ललितविस्तरांत आणि बुद्धचरितकाव्यांत आलीं आहेत.  त्या कालीं या लक्षणांवर लोकांचा फार भरवसा होता यांत शंका नाही.  त्रिपिटक वाङ्‌मयांत त्यांचा अनेक ठिकाणीं सविस्तर उल्लेख झाला आहे.  पोक्खरसाति ब्राह्मणाने तरुण अम्बष्ठाला बुद्धाच्या शरीरावर हीं लक्षणें आहेत की नाहीत हें पाहण्यासाठी पाठविलें.  त्याने तीस लक्षणें स्पष्ट पाहिली; पण त्याला दोन दिसेनात.   बुद्धाने अद्‍भुत चमत्कार करून तीं त्याला दाखाविलीं.१  अशा रीतीने बुद्धचरित्राशीं या लक्षणांचा जिकडे तिकडे संबंध दाखविला आहे.  बुद्धाची थोरवी गाण्याचा हा भक्तजनांचा प्रयत्‍न असल्यामुळे त्यांत विशेष तथ्य आहे असें समजण्याची आवश्यकता नाही.  तथापि बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असित ॠषीने येऊन त्याचें भविष्य वर्तविलें, ही कथा फार प्राचीन दिसते.  तिचें वर्णन सुत्तनिपातांतील नालकसुत्ताच्या प्रस्तावनेंत सापडतें.  त्याचा गोषवारा येथे देतों.

''चांगलीं वस्त्रें नेसून व इंद्राचा सत्कार करून देव आपलीं उपवस्त्रें आकाशांत फेंकून उत्सव करीत होते.  त्यांना असित ॠषीने पाहिलें आणि हा उत्सव कशासाठी आहे असें विचारलें.  लुम्बिनीग्रामांत शाक्यकुलांत बोधिसत्त्वाचा जन्म झाला आहे व त्यामुळे आपण उत्सव करीत आहोंत, असें त्या देवांनी असिताला सांगितलें. तें ऐकून असित ॠषि नम्रपणें शुद्धोदनाच्या घरीं आला; आणि त्याने कुमाराला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली.  शाक्यांनी बोधिसत्त्वाला असितासमोर आणलें, तेव्हा त्याची लक्षणसंपन्नता पाहून 'हा मनुष्यप्राण्यांत सर्वश्रेष्ठ आहे', असे उद्गार असिताच्या तोंडून निघाले.  पण आपलें आयुष्य थोडें राहिलें आहे, हें लक्षांत आल्याने असितॠषीच्या डोळ्यांतून आसवें गळूं लागलीं.  तें पाहून, कुमाराच्या जिलवाला कांही धोका आहे की काय, असा शाक्यांनी प्रश्न केला.  तेव्हा असिताने, 'हा कुमार पुढे संबुद्ध होणार आहे, परंतु माझे आयुष्य थोडेंच अवशिष्ट राहिलें असल्यामुळे मला त्याचा धर्म श्रवण करण्याची संधि मिळणार नाही, म्हणून वाईट वाटतें, असें सांगून शाक्यांचें समाधान केलें.  आणि त्यांना आनंदित करून असित ॠषि तेथून निघून गेला.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel