राहुलमाता देवी

राहुलाच्या आईला महावग्गांत आणि जातिकट्ठकथेंत सर्वत्र 'राहुलमाता देवी' म्हटलें आहे.  यसोधरा (यशोधरा) हें तिचें नांव फक्त अपदान ग्रंथांत सापडतें.  जातकाच्या निदानकथेंत म्हटलें आहे की, ''ज्या वेळीं आमचा बोधिसत्त्व लुम्बिनी वनांत जन्मला, त्याच वेळीं राहुलमाता देवी, छन्न अमात्य, काळुदायि (काळा उदायि) अमात्य, कंथक अश्वराजा, (बुद्धगयेचा) महाबोधिवृक्ष आणि चार निधिकुंभी (द्रव्याने भरलेले रांजण) उत्पन्न झाले.''  यांत बोधिवृक्ष आणि ठेव्याचे रांजण त्याच वेळीं उत्पन्न झाले, ही शुद्ध दन्तकथा समजली पाहिजे.  पण बोधिसत्त्व, राहुलमाता, छन्न आणि काळा उदायि हीं एकाच वेळीं जन्मलीं नसलीं तरी समवयस्क होतीं असें मानण्याला हरकत नाही.  राहुलमातेचें देहावसान ७८ व्या वर्षी म्हणजे बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी दोन वर्षे झालें असावें.  अपदानांत (५८४) ती म्हणते,

अट्ठसत्ततिवस्साहं पच्छिमो वत्तत्ति भवो ।
......................................
पहाय वो गमिस्सामि कतम्मे सरणमत्तनो ॥

'मी आज ७८ वर्षांची आहें.  हा माझा शेवटचा जन्म.  तुम्हांला मी सोडून जाणार.  माझी मुक्ति मी संपादिली आहे.'

या शेवटल्या जन्मीं आपण शाक्य कुलांत जन्मलें असेंही ती म्हणते.  परंतु त्या कुलाची माहिती कोठेच सापडत नाही.  ती भिक्षुणी होऊन राहिली आणि ७८ व्या वर्षी बुद्धाजवळ जाऊन तिने वर दिल्याप्रमाणें भाषण केलें, असें अपदानकाराचें म्हणणें दिसतें.  पण भिक्षुणी झाल्यावर तिने कोणताही उपदेश केल्याचें किंवा तिचा कशाही प्रकारें बौद्धसंघाशीं संबंध आल्याचे आढळून येत नाही.  तेव्हा ती खरोखरच भिक्षुणी झाली की नाही हें निश्चयाने सांगता येणें कठीण आहे.  अपदान ग्रंथांत तिचें नांव यशोधरा आणि ललितविस्तरांत गोपा असें आलें आहे.  तेव्हा यांपैकी खरें नांव कोणतें, किंवा ही दोन्ही तिचीं नांवें होतीं हें समजत नाही.

गृहत्यागाचा प्रसंग

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला त्या रात्रीं तो आपल्या प्रासादांत बसला होता.  त्याच्या परिवारांतील स्त्रियांनी वाद्यगीतादिकांनी त्याला रंजविण्याचे पुष्कळ परिश्रम केले.  पण बोधिसत्त्व त्यांत रमला नाही.  शेवटीं त्या स्त्रिया कंटाळून झोपीं गेल्या.  कोणी बडबडत होत्या; तर कुणाच्या तोंडांतून लाळ गळत होती.  त्याला त्यांचा भयंकर कंटाळा आला; व खाली जाऊन त्याने छन्न सारथ्याला हाक मारून जागें केलें.  छन्नाने कंथक नांवाच्या घोड्याला सज्ज करून आणलें.  त्यावर बोधिसत्त्व आरूढ झाला व छन्न घोड्याची शेपटी धरून बसला.  देवतांनी त्या दोघांसाठी नगरद्वार खुलें केलें.  त्यांतून बाहेर पडून ते दोघेही अनोमा नांवाच्या नदीतीरावर गेले.  तेथे बोधिसत्त्वाने आपले केस आपल्या तरवारीने कापून टाकले.  आणि दागदागिने छन्नाच्या स्वाधीन करून बोधिसत्त्व राजगृहाला गेला.  बोधिसत्त्वाच्या वियोगामुळे कंथकाने अनोमा नदीवरच देहविसर्जन केलें.  आणि छन्न सारथि दागदागिने घेऊन कपिलवस्तूला गेला.

हा निदानकथेंतील गोष्टीचा सारांश आहे.  निदानकथेंत, ललितविस्तारांत आणि बुद्धचरित्र काव्यांत या प्रसंगाचीं रसभरित वर्णनें आढळतात; आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम झाला आहे.  परंतु त्यांच्यांत तथ्य मुळीच नाही, किंवा फारच थाडें असावें, असें वाटतें.  कां की, प्राचीनतर सुत्तांतून ह्या असंभाव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.

अरियपरियेसनसुत्तांत स्वतः भगवान् बुद्धाने आपल्या गृहत्यागसमयाची हकीगत दिली आहे, ती अशी :--

सो खो अहं भिक्खवे अपरेन समयेन दहरो व समानो सुसु काळकेसो भद्रेन योब्बनेन समन्नागतो पठमेन वयसा अकाकमानं मातापितुन्नं अस्सुमुखानं रुदन्तानं केसमस्सुं ओहारेत्वा कासावानि वत्थानि अच्छादेत्वा अगारस्मा अनगारियं पब्बजिं ।

'भिक्षुहो, असा विचार करीत असतां कांही काळाने, जरी मी त्या वेळीं तरुण होतों, माझा एकही केस पिकला नव्हता, मी भरज्वानींत होतों आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यांतून निघणार्‍या अश्रुप्रवाहाने त्यांचीं मुखें भिजलीं होतीं, ते सारखे रडत होते, तरी मी (त्या सगळ्यांची पर्वा न करतां) शिरोमुंडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून, घरांतून बाहेर पडलों (मी संन्यासी झालों).''

हाच उतारा जशाचा तसाच महासच्चकसुत्तांत सापडतो.  यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळूं न देता छन्नासह कंथकावर स्वार होऊन पळून गेला हें म्हणणें साफ चुकीचें आहे असें दिसतें.  बोधिसत्त्वाची खुद्द आई मायादेवी सातव्या दिवशीं जरी निवर्तली असली तरी त्याचें पालन महाप्रजापती गोतमीने स्वतःच्या मुलाप्रमाणेंच केलें.  अर्थात वरील उतार्‍यांत तिलाच बुद्ध भगवंताने आई म्हटलें असलें पाहिजे.  शुद्धोदनाला व गोतमीला तो परिव्राजक होणार, हें पुष्कळ दिवसांपासून माहीत होतें, आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्यांच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हें या उतार्‍यावरून स्पष्ट होतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel