भद्रवर्गीय भिक्षु

वाटेंत भद्दवग्गीय नांवाचे तीस तरुण एका उद्यानांत आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी आले होते.  त्यांपैकी एकाची बायको नव्हती, म्हणून त्याच्यासाठी एक वेश्या आणली होती.  ते तीस असामी व एकोणतिसांच्या बायका मौजमजेंत गुंतून बेसावधपणें वागत असतां शक्य तेवढ्या वस्तु घेऊन ती वेश्या पळून गेली !  त्या वेळीं बुद्ध भगवान् या उपवनांत एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला होता.  उपयुक्त वस्तु घेऊन वेश्या पळून गेली, हें जेव्हा त्या तीस तरुणांना समजलें, तेव्हा ते तिचा शोध करीत भगवान् बसला होता तिकडे आले, आणि म्हणाजे, ''भदंत, ह्या बाजूने गेलेली एक तरुण स्त्री तुम्ही पाहिली आहे काय ?''

भगवान् म्हणाला, ''तरुण गृहस्थहो, एखाद्या तरुण स्त्रीच्या शोधांत लागून फिरत राहावें, किंवा आत्मबोध करावा यापैकी तुम्हांला कोणतें बरें वाटतें ?''

तें बुद्धाचें वचन ऐकून ते त्याच्याजवळ बसले; आणि बराच वेळ बुद्धाचा उपदेश करून घेतल्यावर गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला.

काश्यपबन्धु

त्या उपवनांतून भगवान् उरुवेलेला आला.  तेथे उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप व गयाकाश्यप हे तिघे जटिल बन्धु अनुक्रमें पांचशें, तीनशें व दोनशें जटाधारी शिष्यांसह अग्निहोत्र सांभाळून तपश्चर्या करीत होते.  त्यांपैकी वडील बंधूच्या आश्रमांत बुद्ध भगवान् राहिला; आणि अनेक अद्‍भुत चमत्कार दाखवून त्याने उरुवेल काश्यपाला आणि त्याच्या पांचशें शिष्यांना आपल्या भिक्षुसंघांत दाखल करून घेतलें.  उरुवेल काश्यपाच्या मागोमाग त्याचे धाकटे बंधु आणि त्यांचे सर्व अनुयायी बुद्धाचे शिष्य झाले.

मोठ्या भिक्षुसंघासह राजगृहांत प्रवेश

या एकहजार तीन भिक्षूंना बरोबर घेऊन बुद्ध भगवान् राजगृहाला आला.  तेथे एवढ्या मोठ्या भिक्षुसंघाला पाहून नागरिकांत एकच खळबळ उडून गेली.  बिंबिसार राजा आणि त्याचे सर्व सरदार बुद्धाचें अभिनंदन करण्यास आले.  बिंबिसाराने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला दुसर्‍या दिवशीं राजवाड्यांत भिक्षा घेण्याला आमंत्रण दिलें आणि त्यांचें जेवण संपल्यावर वेणुवन उद्यान भिक्षुसंघाला दान दिलें.

सारीपुत्त आणि मोग्गाल्लान

राजगृहाजवळ संजय नांवाचा एक प्रसिद्ध परिव्राजक आपल्या पुष्कळ शिष्यांसहवर्तमान राहत असे.  सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे संजयाचे प्रमुख शिष्य होते.  पण त्या संप्रदायांत त्यांचें मन रमेना.  त्यांनी असा संकेत केला होता की, 'जर दोघांपैकी एकाला सद्धर्ममार्ग दाखविणारा दुसरा कोणी सापडला तर त्याने दुसर्‍याला ही गोष्ट सांगावी आणि दोघांनी मिळून त्या धर्माची कास धरावी.'

एके दिवशीं अस्सजि भिक्षु राजगृहांत भिक्षाटन करीत होता.  त्याची शांत आणि गंभीर मुद्रा पाहून हा कोणी तरी निर्वाण मार्गाला लागलेला परिव्राजक असावा असें सारिपुत्ताला वाटलें; अस्सजीशीं संभाषण करून त्याने जाणलें की, अस्सजि बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाचाच धर्ममार्ग खरा आहे.  ही गोष्ट सारिपुत्ताने मोग्गल्लानाला कळविली; आणि ते दोघेही संजयाच्या पंथांतील दोनशें पन्नास परिव्राजकांसह बुद्धाजवळ येऊन भिक्षुसंघांत प्रविष्ट झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध (पूर्वार्ध)