को नु अञ्ञत्रमरियेहि पदं संबुद्धुमरहति।
यं पदं सम्मदञ्ञाय परिनिब्बन्ति अनासवा।। (७०५)

ह्या आनन्दमय स्थितीप्रत मुनि पोहोंचतो.

निर्वाण :- सर्व दु:खांचा नाश ज्या स्थितींत होतो त्या स्थितीला निर्वाण असें म्हणतात. परंतु ती स्थिती कशी प्राप्त होते? बौद्धधर्माच्या उत्तर कालीन इतिहासावरून असें आढळून येतें कीं निर्वाण या ध्येयाच्या बौद्धांच्या कल्पनेमध्यें अनेक फेरफार झालेले आहेत. या संबंधाची सुत्तनिपातांतील कल्पना आरंभींच्या कालाची दिसते. निर्वाण हें याच जन्मीं तृष्णेच्या नाशामुळें व रागद्वेषमोहादि क्लेशांच्या उच्छेदामुळें प्राप्त होतें.

नन्ही-संयोजनो लोको वितक्कस्स विचारणा ।
तण्हाय विप्पहानेन निब्बाणमिति वुच्चति।। (११०९)

दुसर्‍या एका गाथेंत विमोक्षाबद्दल असें म्हटलें आहे—

यस्मिं कामा न वसन्ति तण्हा यस्स न विज्जति।
कथंकथा च यो तिण्णो विमोक्खो तस्स नापरो।। (१०८९)

“ज्याच्या ठिकाणीं लोभ, तृष्णा, किंवा शंका-कुशंका राहिल्या नाहींत त्याला विमोक्ष म्हणजे कांहीं दुसरी वस्तु नव्हे” अशी स्थिति प्राप्त झालेला गरीब निष्कांचन मुनि कुठल्याही गोष्टीबद्दल लोभ न धरतां, सांप्रदायिक दृष्टि (दिट्ठि), शील-व्रत यांच्या जंजाळांत न गुरफटतां, तात्त्विक विचारानें चित्ताची समतोलता बाळगीत, मरणाचा (परिनिर्वाणाचा) दिवस येईपर्यंत सन्मार्गानें आयुष्य घालवीत राहतो.

परिनिर्वाणानंतरची स्थिति :- मृत्यूनंतर मुनीची काय अवस्था होते याबद्दल बुद्ध स्पष्ट कांहींच सांगत नाहीं. जगाची उत्पत्ति, हेतु, किंवा शेवट यांसारख्या प्रश्नांप्रमाणेंच हा प्रश्न अज्ञेय आहे. बुद्ध म्हणतो- ज्याप्रमाणें दिव्याची ज्योत विझल्यानंतर तिचें काय होतें हें आपण जाणत नाहीं, त्याप्रमाणेंच मुनि नामकायापासून मुक्त झाल्यावर नाहींसा होतो; त्यांचें काय होतें हें सांगतां येत नाहीं.

अच्चि यथा वातवेगेन खित्तो । अत्थं पलेति न उपेति संखं ।
एवं मुनि नामकाया विनुत्तो । अत्थं पलेति न उपेति संखं । (१०७४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel