आर्य आणि बाबिलोनियन लोकांचे देवादेव

२०. वर निर्दिष्ट केलेल्या लो. टिळकांच्या लेखांत ‘ असितस्य तैमातस्य बभ्रोरपोदकस्य च ’ अथर्व० ५।१३।६ या ऋचेंतील तैमात शब्दाचा संबंध त्यांनी तिअमात् (Tiamat) या शब्दाशीं लावलेला आहे. तिअमात् ही एक राक्षसी असून तिची पाताळ लोकीं सत्ता चालत असे, अशी बाबिलोनियन लोकांची समजूत होती. तीच ही राक्षसी अथर्व वेदांत तैमात शब्दानें उल्लेखलेली आहे, असें लोकमान्यांचें म्हणणें. पण तिअमात् शब्द स्त्रिल्लिंगी व तैमात पुल्लिंगी आहे; व तिअमात् राक्षसीचें संतान
( अपत्य ) तैमात असा अर्थ घेतला तर तो चांगला जुळतो. तिअमात् शब्दाचें रूपांतर दुर्मति शब्दांत झालें असावें. उदाहरणार्थ ‘ जहि यो नो अघायति...यामन्नप भूतु दुर्मतिर्विश्वाप भूतु दुर्मतिः’ ऋ० १।१३१।७, ‘ अपामीवामप स्त्रिधमप सेधत दुर्मतिम् ’ ऋ० ८।१८।१०, इत्यादि ऋचा पहाव्या.

२१. तिअमात् राक्षसीचा नवरा अप्सु. त्याचा उल्लेख ‘अप्सुजित्’ ऋ० ८।१३।२, ऋ० ९।१०६।३, ‘अप्सुक्षित्’ ऋ० १।१३९।११, इत्यादि ठिकाणीं सांपडतो, हे लोकमान्यांनी आपल्या लेखांत दाखवून दिलेंच आहे. तरी पण कित्येक ठिकाणीं अप्सूचें रूपांतर ‘ अभ्व ’ शब्दांत झालें असावें. ‘ बाधते कृष्णमभ्वम् ’ ऋ० १।९२।५, ‘द्यावा रक्षतं पृथिवी नो अभ्वात् ’ ऋ० १।१८५।२-८, ‘ गूहन्तीरभ्वमसितं रुशद्भिः’ ऋ० ४।५१।९, इत्यादि ऋचांतून याचा उल्लेख सांपडतो.

२२. यहृ शब्दाचा संबंध लोकमान्य बायबलमधील जेहोवा ( Jehovah ) शब्दाशीं लावतात. पण मला वाटतें कीं, त्याचा संबंध सुमेरियन ‘ एअ ’ किंवा ‘ य ’ ( Ea ) शब्दाशीं असावा. हा सुमेरियांतील प्राचीनतम देव. त्याचा संबंध ऋग्वेदांत अनेक ठिकाणीं अग्नीशीं आला आहे. ‘ त्वं देवानामसि यहृ होता ’ ऋ० १०।११०।३, या ऋचेंत ‘ तूं यहृ नांवाचा देव ’ असा अर्थ दिसतो; व इतर पुष्कळ ठिकाणीं यहृ आणि यही हीं विशेषणें दिसतात. य देवाच्या बाजूचे किंवा य देवापासून उत्पन्न झालेले असा त्यांचा अर्थ करतां येण्यासारखा आहे. ‘ पावकया यश्चितयन्त्या कृपा क्षामन्रुरुच उषसो न भानुना ’ ऋ० ६।१५।५ या ऋचेंत तर खास य देवाचाच उल्लेख आहे अशी शंका येते.

२३. उर्वशी या शब्दाचा अर्थ लोकमान्य जलदेवता (Watery Nymph) असा करतात. परंतु उर्वशी हा शब्द उरु + अस् याला ई प्रत्यय लागून साधलेला आहे. सुमेरियन भाषेंत अस् याचा अर्थ मनुष्य असा होतो. तेव्हां या शब्दाचा अर्थ उरु मधील स्त्री असा असला पाहिजे. ही स्त्री पुरूरवस् ऐल याच्या बरोबर एलाममध्यें आली. पण पुरूरवस् याचें जंगली वर्तन तिला आवडलें नाहीं, व ती तेथून निघून गेली. ती जातेवेळीं तिचा व पुरूरव्याचा झालेला संवाद ऋ० १०।९५ मध्यें आहे. त्यावरून उरूमधील स्त्रियांची व एलाममधील पुरुषांची विचारसरणी कशी असेल याचें थोडेसें अनुमान करतां येतें.

२४. येथपर्यंत लोकमान्यांच्या लेखांतील शब्दांचा विचार झाला. आतां दुसर्‍या बाबिलोनियन देवतांचीं जीं नांवें ऋग्वेदांत सांपडतात त्यांचें थोडक्यांत दिग्दर्शन करतों. बाबिलोनियन अंशन
( Anshan ) हा ऋग्वेदांतील अंश आहे. ‘त्वमंशो विदथे देव भाजयुः’ ऋ० २।१।४, येर्थ सायणाचार्य ‘अंश’ याचा ‘ एतन्नामको देवोऽसि ’ असा स्पष्ट अर्थ करतात. एतन (Etana) याचा संबंध एतश याच्याशीं असावा. ‘ स एतशो रजांसि देवः सविता महित्वना ’ ऋ० ५।८१।३ इत्यादि ऋचांतून त्याचा उल्लेख पहावा.

२५. परंतु बाबिलोनियांतील मुख्य देवता म्हणजे इश्तर (Ishtar) व तम्मूज् (Tammuz) किंवा दमुत्सि (Damuzi) या होत.१  त्यांचा संबंध उषः आणि दमूनः यांच्याशीं आहे. ‘ पुनः पुनर्जायमान पुराणी ’ ऋ० १।९२।१० ‘ उषा याति स्वसरस्य पत्‍नी ’ ऋ० ३।६१।४, ‘यां त्वा जज्ञुर्वृषभस्या रवेन ’ ऋ० ७।७९।४. इत्यादि ठिकाणीं उषादेवीचीं जीं वर्णनें आहेत त्यांचा इश्तरच्या दंतकथांशीं अत्यंत निकट संबंध दिसतो. इश्तर सहा महिने पाताळांत जाते व पुन्हा पृथ्वीवर येते ह्या कथेचा व उषोदेवीच्या कथेचा संबंध आहे असें गृहीत धरलें, तर आर्य उत्तर ध्रुवाकडून आले असें समजण्याचें मुळींच कारण रहात नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ See Myths of Babylonia p : 93 )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel