४२. ही त्रिशीर्षाची कथा महाभारतांतील उद्योग पर्वांत आली आहे. त्रिशीर्षाला मारल्यावर तक्ष इन्द्राला म्हणतो, ‘ ऋषिपुत्रमिमं हत्वा ब्रम्हहत्याभयं न ते ?’ ( ह्या ऋषिपुत्राला मारल्यानें तुला ब्रम्हहत्येचें भय वाटत नाहीं काय ? ) त्यावर इन्द्र उत्तर देतो, ‘ पश्चाद्धर्मं चरिष्यामि पावनार्थं सुदुश्चरम्.’२  ( मी मागाहून सुदुश्चर धर्माचें आचरण करणार आहें.) म्हणजे सध्या झालें आहे तें ठीक आहे; याचें प्रायश्चित्त काय करायचें तें मागाहून पाहून घेऊं ! येथें क्लाइव्ह आणि त्याचा मित्र उमीचंद यांची आठवण होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२ औंध उद्योग प० अ० ९ श्लोक ३४-३५.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४३. शंभर दासाचीं तरी शहरें इन्द्रानें तोडलीं कोणासाठीं ? दिवोदासासाठीं. ‘भिनत्पुरो नवतिमिन्द्र पूरवे दिवोदासाय महि दाशुषे ’ ऋ० १।१३०।७; ‘ शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत् । दिवोदासाय दाशुषे’ ऋ० ४।३०।२०. दिवोदासानन्तर सुदाः हा त्याचा मुलगा राज्यावर आला. त्यालाहि इन्द्रानें मदत केल्याचा उल्लेख ऋ० ७।८३ मध्यें आहे. त्याचप्रमाणें त्रसदस्यु, पुरुकुत्स इत्यादिकांना मदत करून इन्द्रानें सार्वभौम राज्य संपादलें असावें. ऋ० ४।३०।१७-१८ ऋचांत ऋषि म्हणतो कीं, तुर्वश आणि यदु दास असून त्यांना इन्द्रानें बचावलें, व अर्ण आणि चित्ररथ आर्य असून त्यांचा वध केला. यावरून साम्राज्य स्थापन करण्यासाठीं इन्द्र ब्राम्हण आणि अब्राम्हण, यति आणि गृहस्थ, आर्य आणि दास यांच्यामध्यें काहीं भेद मानीत नसे हें स्पष्ट होतें.

सप्तसिंधूचा पहिला सम्राट्

४४. वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, एलाममधील इन्द्रानें आर्यांचा पुढाकार घेऊन सप्तसिंधूमधील दास राजांचा पराजय केला, व आपलें साम्राज्य स्थापित केलें. इन्द्राच्या प्रार्थनेचीं सूक्तें ऋग्वेदांत भरपूर आहेत. परन्तु त्यांत इन्द्राच्या बालपणची किंवा राज्यप्राप्तीची अशी फारशी माहीती मिळत नाहीं. एका ऋचेंत इन्द्राला कौशिक १ ( १ आ तू न इंद्र कौशिक ऋ० १।१०।११ )
म्हटलें आहे. यावरून तो कौशिक कुळांत जन्मला असावा असे वाटतें. पण दुसर्‍या अनेक ऋचांतून त्याला श्येन म्हटलें आहे. वैदिक काळात श्येन आणि कौशिक हा एकच पक्षी समजत होते कीं काय ?

४५. ‘ सद्यो ह जातो वृषभः कनीनः ’ ऋ० ३।४८।१, येथे कनीन शब्दाचा अर्थ सायणाचार्य कमनीय (सुन्दर) असा करतात. तरी कनीन शब्दाचा अर्थ कानीन (कन्यावस्थेंत जन्मलेला) असा असणें शक्य आहे. कारण ‘अवद्यमिव मन्यमाना गुहाकरिंद्रं माता वीर्येणा न्यृष्टम् ’ ऋ० ४।१८।५ ( आपल्या अब्रुला हानिकारक अशा समजुतीनें आईनें त्या सामर्थ्य संपन्न इन्द्राला लपविलें !) ह्या ऋचेंत आईनें इन्द्राला जन्मल्याबरोबर लपवलें असें म्हटलें आहे. याच सूक्ताच्या दहाव्या ऋचेंत गाईनें वासराला जन्म दिला तद्वत् इन्द्राला आईनें दिला असें ऋषि म्हणतो. ह्यावरून ख्रिस्ताप्रमाणें इन्द्रहिं गोठ्यांत जन्मला असावा. कन्यावस्थेंत हें मूल जन्मल्यामुळें गोठ्यांत जन्म देऊन त्याला लपवण्याचा आईवर प्रसंग येणें साहजिक होतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel