७७. एकादा ऋषि नदीच्या काठीं किंवा दुसर्‍या अशाच रम्य ठिकाणीं जाऊन राहिला तर तो आपलें साधें अग्निहोत्र सुरू करी. पुढें त्याची प्रसिद्धि होत गेली तर एकामागून एक असे निरनिराळे याग करण्यास तो सुरुवात करी. एकादा राजा यजमान सांपडला तर त्या यागांना नुसता ऊत येत असे. पुरुषमेधाच्या रूपानें नरबली देण्यालाहि हे ब्राम्हण लोक कमी करीत नसत ! याशिवाय भुताखेतांच्या परिहाराला देखील या यज्ञाचा उपयोग होत असे. याप्रमाणें हळू हळू लग्नाकार्यांत, जातसंस्कार व मृतसंस्कार इत्यादि सर्व संस्कारांत यज्ञाचा प्रवेश झाला, व त्याबरोबर धार्मिक कृत्यांत ब्राम्हणाचा दर्जाहि वाढत गेला.

७८. सप्तसिंधु प्रदेशांत गाई मारून यज्ञ करण्याचा प्रघात दास लोकांत होता कीं नाहीं हें सांगतां येणें शक्य नाहीं. मात्र गंगा यमुनेच्या बाजूला गोहत्येला बराच विरोध होता, असें वर दिलेल्या कृष्णाच्या गोष्टीवरून दिसून येतें.१  ह्याच देवकीपुत्र कृष्णाला घोर आंगिरस ऋषीनें यज्ञाची एक साधी पद्धति शिकवली. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हणजे तपश्चर्या, दान, सरळपणा (आर्जव), अहिंसा आणि सत्य वचन ह्या होत.२  ह्यांत कृष्णाला सांगितलेली अहिंसा म्हणजे केवळ गोहत्या न करण्या पुरती असावी; आणि याचसाठीं इन्द्राबरोबर त्यानें युद्ध केलें असावें. इन्द्राचें स्वामित्व पतकरून त्याच्या नांवें यज्ञयाग सुरु केले असते, तर दिवोदासाप्रमाणें कृष्णहि ऋग्वेदांतील एक नामांकित व्यक्ति होऊन राहिली असती. गाई मारून यज्ञ करणें त्याला पसंत नसल्यामुळें तो इन्द्राचा शत्रु बनला, व त्याची गणना असुर-राक्षसांत करण्यांत आली. तथापि मध्य हिंदुस्थानांत कृष्णाची पूजा अव्याहत चालू राहिली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. वि० १।४८-५४ पहा.)
(२ अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणाः छां० उ० अ० ३।१७।४-६. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७९. कृष्णाचा गुरू नेमिनाथ नांवाचा जैन तीर्थंकर होता असा उल्लेख जैन ग्रंथांत अनेक ठिकाणीं सांपडतो. तेव्हां तो व घोर आंगिरस हे एकच होते कीं काय, अशी शंका येते.

८०. कृष्ण पांडवसमकालीन समजला जातो. परंतु ही समजूत चुकीची आहे. कुरु देशांत कौरवांचें किंवा पांडवांचें साम्राज्य व त्याचाच शेजारीं एकाच काळीं कंसाचें साम्राज्य असणें शक्य नाहीं. महाभारतांत कंसाचा आणि कौरवांचा कांहीं एक संबंध दाखवलेला नाहीं. पौराणिक काळीं कृष्णाच्या व पांडवांच्या कथांची भेसळ करण्यांत आली. पण ती विश्वसनीय मानण्याला कोणताहि आधार नाहीं.

८१. दास व आर्य यांच्या संघर्षापासून उत्पन्न झालेल्या बलिदानपूर्वक यज्ञाला विरोध करणारी एतद्देशीय व्यक्ति म्हटली म्हणजे देवकीपुत्र कृष्ण ही समजली पाहिजे. परंतु केवळ गोपूजेनें संस्कृतीची अभिवृद्धि होणें शक्य नव्हतें. भपकेदार यज्ञयागांसमोर अशी ही साधी संस्कृति टिकली नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to हिन्दी संस्कृति आणि अहिंसा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
श्यामची आई
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी