८८. पुन्हा अशोक आपल्या बाराव्या शिलालेखांत म्हणतो, “देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा सर्व प्रकारच्या श्रमणांची (पाषंडांची), परिव्राजकांची व गृहस्थांची दानधर्मानें व दुसर्‍या अनेक प्रकारानें पूजा करतो. परंतु दान व पूजा यांना देवांचा प्रिय एवढें महत्त्व देत नाहीं, जेवढें तो सर्व पाषण्डांच्या सारवृद्धीला महत्त्व देतो. सारवृद्धि अनेक प्रकारची आहे. तिचें मूळ म्हटलें म्हणजे वाचागुप्ति. उदाहरणार्थ आत्मपाषंडांचें स्तोम माजवूं नये, किंवा परपाषण्डनिंदा होऊं देऊं नये. तसाच कांही प्रकार घडून आला तर त्याला महत्त्व देऊं नये. अनेक प्रकारांनी परपाषण्डांचा मान ठेवणें योग्य आहे. असें केल्यानें आत्मपाषण्डाची खात्रीनें अभिवृद्धि करतो, व परपाषण्डावरहि उपकार करतो... परस्परांचा धर्म परस्परांनी ऐकावा, व परस्परांची शुश्रूषा करावी, एवढ्यासाठीं एकी उत्तम. सर्व पाषण्ड बहुश्रुत आणि कल्याणागम १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ ज्यांचे धर्मग्रंथ कल्याणकारक आहेत ते.) व्हावेत, हीच देवांच्या प्रियाची इच्छा... ह्यासाठीं धर्ममहामात्रांचीं ( व इतरांची) योजना केली आहे...”
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८९. ह्या शिलालेखावरून असें दिसून येतें कीं, अहिंसात्मक म्हणून जेवढे पंथ होते, तेवढ्यांना अशोक समानतेंनें वागवीत होता, एवढेंच नव्हे, तर त्यांच्यामध्यें कलह न माजतां ऐक्याची अभिवृद्धि व्हावी, व लोकांना संयमाचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग त्यांनी दाखवून द्यावा, यासाठीं त्यानें आटोकाट प्रयत्‍न केले. वैदिक संस्कृतीचा पाया म्हटला म्हणजे यज्ञयाग. त्यांचा अशोकानें पहिल्याच शिलालेखांत निषेध केला आहे; २ ( इध न किंचि जीवं आरभित्वा पजुहितब्बं ।) आणि त्यानें जो सामान्य लोकांना धर्म उपदेशिला त्यांत अहिंसेला अग्रस्थान दिलें आहे. अर्थात् अशोकाच्या साम्राज्यांतच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांतहि श्रमणसंस्कृतीचा – त्यांतल्या-त्यांत बौद्ध पंथाचा – प्रसार अत्यंत जोरानें झाला, यांत मुळीच आश्चर्य नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel