८०. “दधीचि म्हणाला, ‘तुम्ही सर्वांनी कट करून ह्याला निमंत्रण दिलें नाहीं. पण ज्या अर्थीं मी शंकराशिवाय दुसरें थोर दैवत पहात नाहीं, त्या अर्थीं हा यज्ञ उत्तम होणार नाहीं, असें मी समजतों.’ दक्ष म्हणाला, विधि व मंत्रानें पवित्र असें हें हवि मी विष्णूला अर्पण करतों. तो प्रभु विभु हवनीय आहे.’ ही गोष्ट पार्वतीला आवडली नाहीं. तेव्हां महादेवानें आपल्या मुखांतून एक भयानक पुरुष उत्पन्न केला; व त्या पुरुषानें दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला.”

८१. ही पौराणिक भाषा आहे. खरा प्रकार असा असणें संभवनीय आहे कीं, ब्राह्मणांनी आरंभलेल्या कोणत्या तरी एका मोठ्या महायज्ञाचा एकाद्या शक राजानें विध्वंस केला. येथें आम्हाला झेंघिश खानाची गोष्ट आठवते. तो जेव्हां समरकंदमध्यें शिरला तेव्हां तेथील मुख्य मशीदींत नमाज पढणारे मौलवी लोक त्यानें पाहिले; व त्यांना विचारलें कीं, येथें हें काय करीत अहां ? ‘आपण परमेश्वराची प्रार्थना करीत आहोंत’ असें त्यांनी सांगितल्यावर तो क्षुब्ध झाला; व मौलवींचें कुराण घेऊन त्यानें तें आपल्या घोड्याच्या पायाखालीं तुडविलें. महादेवानें उत्पन्न केलेल्या पुरुषानें दक्ष यज्ञाचा केलेला विध्वंस जवळ जवळ अशाच प्रकारचा दिसतो.

८२. महेश्वराच्या प्रभावानें क्षत्रियांचा नाश होणार या कल्पनेचाहि महाभारतांत समावेश केला आहे. नारदमुनीनें धर्मराजाला तीन प्रकारचे उत्पात सांगितले. ते सर्व चैद्याच्या (शिशुपालाच्या) मरणानंतर घडले. त्यावर धर्मराजानें व्यासाला प्रश्न केला कीं, त्या उत्पातांचें फळ काय होणार आहे ? त्यांचें फळ म्हटलें म्हणजे तेरा वर्षांनंतर सर्व क्षत्रियांचा संहार होणार आहे, असें सांगून व्यास म्हणाला – 

स्वप्ने द्रक्षसि राजेन्द्र क्षपान्ते त्वं वृषध्वजम् |
नीलकण्ठं भवं स्थाणुं कपालिं त्रिपुरान्तकम् ||
उग्रं रुद्रं पशुपतिं महादेवमुमापतिम् |
हरं शर्वं वृषं शूलं पिनाकिं कृत्तिवाससम् ||
कैलासकूटप्रतिमे वृषभेSवस्थितं शिवम् ||
निरीक्षमाणं सततं पितृराजाश्रितां दिशम् ||
एवमीदृशकं स्वप्नं द्रक्षसि त्वं विशाम्पते |
मा तत्कृते ह्यनुध्याहि कालो हि दुरतिक्रम: ||१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ औंध सभापर्व, अ० ४६।१३-१६; कुंभकोण, अ० ७३।१६-१९.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( हे राजेन्द्र ! आज रात्रीं स्वप्नांत वृषध्वज, नीलकंठ, भव, स्थाणु, कपाली, त्रिपुरान्तक, उग्र, रुद्र, पशुपति, महादेव, उमापति, हर व शर्व, त्याचा वृषभ, शूल, पिनाकधारण व चर्मवसन तूं पहाशील, कैलासकूटासमान बैलावर बसलेल्या व यमदिशेकडे (दक्षिण दिशेकडे) सतत पहाणार्‍या शिवाला तूं पहाशील. हे लोकपति, अशा प्रकारचें स्वप्न तुला दिसेल. पण त्याची तूं काळजी करूं नकोस. कारण काळ दुरतिक्रम आहे.)

८३. ह्यांत नुसता पांडवांचा व कौरवांचा क्षय नाहीं, पण सर्व क्षत्रियांचा क्षय होणार, असें भविष्य वर्तविलें आहे; आणि तें शकांचा जिकडे तिकडे विजय झाल्यावर व्यासाच्या तोंडीं घालण्यांत आलें, याजबद्दल शंका बाळगण्याचें कारण नाहीं. सतत दक्षिण दिशेकडे पहाणारा महादेव दिसेल म्हणजे शकांचा दक्षिणेकडे सारखा विजय होत जाईल, असा याचा अर्थ समजावयास पाहिजे.

८४. ह्या महाभारतांतील वर्णनावरून असें अनुमान करतां येतें कीं, ब्राह्मणांना शक राजे फारसे प्रिय नव्हते. तथापि दुसरा कांहीं मार्ग राहिला नसल्यामुळें या महादेवाची पूजा त्यांनी उचलली, व ती त्यांना फायदेशीर झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel