९९. ह्या जातकांतील गोष्टीवरून कृष्ण जातिभेदाला मुळींच मानीत नव्हता हें सिद्ध होतें. पुढें जेव्हां हा वासुदेव गुप्त राजांचा कुलदेव बनला, व जेव्हां त्याची पूजा करून उदरनिर्वाह करण्याचा ब्राह्मणांवर प्रसंग आला, तेव्हां असा प्रश्न उपस्थित झाली कीं, हजारों वर्षें चालत आलेल्या ह्या गोष्टीचें काय करावें ? जांबवती कृष्णाची बायको नव्हती असें म्हणणें शक्य नव्हतें. यास्तव त्यांनी जांबवतीच्या बापाला अस्वल बनविलें, व तिला चांडाल जातींतून काढून अस्वलाच्या जातींत घातलें. जणूं काय पशूशीं संबंध ठेवणें चांडलिकेच्या संबंधापेक्षां चांगलें होतें ! परंतु जातिभेदानें अंध झालेल्यांना हें दिसावें कसें?

१००. जातकानंतर वासुदेवाचा उल्लेख चूळनिद्देसांतील खालील उतार्‍यात सांपडतो –
देवतानं ति । आजीवकसावकानं आजीवका देवता | निगण्ठसावकानं निगण्ठा १  देवता | जटिलसावकानं जटिला देवता | परिब्बाजकसावकानं परिब्बाजका देवता | अवरुद्धकसावकानं अवरुद्धका देवता | हत्थिवतिकानं हत्थी देवता | अस्सवतिकानं अस्सा देवता | गोवतिकानं गावो देवता | कुक्कुरवतिकानं कुक्कुरा देवता | काकवतिकानं काका देवता | वासुदेववतिकानं वासुदेवो देवता | बालदेववतिकानं बलदेवो देवता | पुण्णभद्दवतिकानं पुण्णभद्दो देवता | मणिभद्दवतिकानं मणिभद्दो देवता | अग्निवतिकानं अग्गि देवता | नागवतिकानं नागा देवता | सुपण्णवतिकानं सुपप्पा देवता | यक्खवतिकानं थक्खा देवता | असुरवतिकानं असुरा देवता | गंधब्बवतिकानं गंधब्बा देवता | महाराजवतिकानं महाराजा देवता | चन्दवतिकानं चन्दो देवता |सुरियवतिकानं सुरियो देवता | इन्दवतिकानं इन्दो देवता | ब्रह्मवतिकानं ब्रह्मा देवता | देववतिकानं देवा देवता | दिसावतिकानं दिसा देवता | ये येसं दक्खिणेय्या ते तेसं देवता ति |
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ सयाम संस्करणः – निगन्थसावकानं निगन्था
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०१. येथें ह्या उतार्‍याचें भाषांतर करणें जरूर वाटत नाहीं. अर्थ सर्वांना समजण्यासारखा आहे. आजीवक नांवाचे परिव्राजक बुद्धाच्या वेळीं होते. त्यांच्या संघाचा पुढारी मक्खलि गोसाल याचा उल्लेख वर आलाच आहे.१  अशोकानें आणि त्याच्या नातवानें ह्या आजीवकांना रहाण्यास कांही गुहा करून दिल्याचा उल्लेख शिलालेखांत सांपडतो. निद्देसाच्या वेळींहि आजीवकांचा पंथ अस्तित्वांत होता हें स्पष्टच आहे. निगण्ठ म्हणजे जैन. त्यांचा संप्रदाय आजलाहि अस्तित्वांत आहे. तेव्हां त्यासंबंधीं विशेष सांगणें नलगे. जटिलांची माहिती वर आलीच आहे.२  परिव्राजकांचा संप्रदाय बुद्धाच्या वेळीं फार जोरांत होता. सारिपुत्त व मोग्गलान हे बुद्धाचे प्रमुख शिष्य त्याच संप्रदायांतून आलेले होते.३  त्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची विशेष माहिती सांपडत नाहीं. आतां अवरुद्धक कोण होते हें मात्र सांगतां येत नाहीं. त्यांची माहिती तर ठिकाणीं अद्यापि मिळाली नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि० २।२५.
२ वि० ३।८६-८८.
३ विनय, महावग्ग, महाक्खन्धक.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०२. निद्देसाच्या वेळीं बौद्ध संघाशिवाय हे पांच श्रमणसमूह अस्तित्वांत होते असें दिसतें त्यांपैकी फक्त अवरुद्धकांचा पंथ बुद्धाच्या वेळीं अस्तित्वांत नव्हता. केसकंबली, पूरण कस्सप, संजय बेलट्ठपुत्त व पकुध कात्यायन ह्या चार पुढार्‍यांचे संप्रदाय निद्देसाच्या काळांत नष्टप्राय झाले होते. तेव्हां निद्देसाचा काळ अशोकानंतर गणावा लागेल. त्या काळीं ही घडामोड झाली असावी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel