( आणि महाभारतांत भगवान् व्यासानें म्हटलें आहे, - हे पृथ्वीपालांमध्यें श्रेष्ठ युधिष्ठिर, स्वत: दिलेली असो, किंवा परक्यानें दिलेली असो, अशा जमिनीचें तूं प्रयत्‍नानें रक्षण कर. भूमिदानापेक्षां दान दिलेल्या भूमीचें अनुपालन करणें श्रेयस्कर होय. ही भूमि सगरादिक पुष्कळ राजांनी उपभोगली. पण ज्या ज्या वेळीं ज्या ज्या राजाची भूमि असते त्या त्या वेळीं त्या त्या राजाला त्या भूमिदानाचें फळ मिळतें. कारण बुहधा राजांना अशुभगति प्राप्त होत नाहीं; भूमिदान केल्यानें ते सदोदित शुद्ध होत जातात. भूमिदान करणारा साठ हजार वर्षें स्वर्गलोकीं आनन्द करतो. की हिरावून घेणारा आणि हिरावून घेण्यास अनुमति देणारा तितकींच वर्षें नरकांत पडतो. दान देणार्‍याचे पितर टाळ्या वाजवतात व पितामह बढाया मारतात कीं, आमच्या कुलांत भूमिदान देणारा उत्पन्न झाला. तो आम्हाला तारील. सर्व धान्यांनी समृद्ध अशी भूमि जो हरण करील, तो आपल्या पितरांसह आपल्याच विष्टेंत किडा होऊन बुडून जाईल. )

१९८. हा ताम्रपट उच्छकल्पाच्या महाराज जयनाथाचा (इ.स. ४९३-९४ सालचा) आहे. त्याच्या पूर्वीच्या महाराजा हस्ती वगैरेच्या लेखांत व त्यानंतर महाराजा जयनाथ याचा मुलगा महाराजा सर्वनाथ यानें दिलेल्या ताम्रपटांतहि ह्यांपैकीं बरेच श्लोक आहेत. पण त्यांच्या क्रमांत व कांहीं शब्दांत थोडासा फेरफार आढळतो. परंतु नमुन्यासाठीं वरील उतारा पुरे आहे. त्यावरून ब्राह्मण लोक आपल्या इनामांना कशा रीतीनें संरक्षण घालून घेत असत, याची बरोबर कल्पना करतां येते; व सर स्याम्युअल होअर यांच्या सेफ-गार्डांना हांसण्याचें कांही कारण रहात नाहीं. या सेफ-गार्डांना निदान ब्रिटिश सेनेचा पाठिंबा आहे. परंतु ब्राह्मणांच्या सेफ-गार्डांना पाठिंबा म्हटला म्हणजे व्यासाचा, स्वर्गाचा व नरकाचा!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel