हर्षकाळ

१९९. फाहियनच्या नंतर म्हणजे गुप्तांच्या माध्यान्हकालानंतर पुराणांचा आणि पाशुपतादिक संप्रदायांचा कस-कसा विकास होत गेला, हें सध्या उपलब्ध असलेल्या सामग्रीवरून सांगतां येणें बरेंच कठिण आहे. सगळ्या पुराणांचा नीट अभ्यास केला, तर त्यांतून बरीच माहिती गोळा करतां येईल. परंतु त्या कामीं जी सवड पाहिजे आहे ती आमच्यापाशीं नाहीं. तेव्हां फाहियनपासून हर्षवर्धनापर्यंतच्या काळाची ही माहिती मिळवण्याचें काम कोणा तरी होतकरू इतिहासकारावर सोंपवून आम्ही आतां हर्षकाळच्या विचारास लागतों.

२००. ह्युएन् त्संग सातव्या शतकाच्या प्रथम पादांत हिंदुस्थानांत आला. त्या वेळीं सर्व देश बौद्धांच्या विहारांनी गजबजलेला होता. तरी पण काश्मिरांतील लोकांनी बौद्ध विहारांविरुद्ध बंडें केल्याचें वर्तमान त्याच्या ऐकण्यांत आलें होतेंच. त्याशिवाय शशांक राजाच्या छळाची कथा त्यानें दिली आहे. बंगालचा राजा शशांक यानें बुद्धगयेच्या विहारांचा विध्वंस केला, व बोधिवृक्ष समूळ उपटून जाळून टाकला. त्यामुळें मगध देशांतील बौद्ध संघावर मोठेंच संकट गुदरलें. हा राजा गुप्त वंशांतील असावा असें विन्सेन्ट स्मिथ यांनी अनुमान केलें आहे. परंतु मञ्जुश्रीमूलकल्पावरून (श्लोक ७३०) तो ब्राह्मण होता असें दिसतें; व तेंच बरोबर असावें. हर्षवर्धनाचा वडील भाऊ राज्यवर्धन माळव्यावर स्वारीस गेला असतां शशांकानें कट करून त्याचा खून करविला. ह्यावरून असें दिसून येतें कीं, मालव देशाच्या राजाचा व शशांकाचा कांहीं तरी गुप्त तह झाला होता; व त्यामुळें शशांकानें राज्यवर्धनाचा खून करविला.

२०१. राज्यवर्धनानंतर श्रीहर्ष गादीवर आला, व त्यानें सहा सात वर्षांत चारी बाजूंचीं बंडें मोडून टाकून आपल्या राज्याचा पाया मजबूत केला. बौद्ध संघाविषयीं श्रीहर्षाचा पक्षपात प्रसिद्धच आहे. तो दर पांच वर्षांनी प्रयागास एक मोठा मोक्ष नांवाचा दरबार भरवीत असे, व आपल्या खजिन्यांतील सर्वस्व दान करून स्वत: भिक्षूचीं वस्त्रें धारण करी. ह्याशिवाय तो मधून मधून मोठमोठाले दरबार भरवून शीलवान् व विद्वान् श्रमण-ब्राह्मणांचा सत्कार करीत असे.

२०२. एकदां श्रीहर्षानें आपल्या राजधानीजवळ एका संघारामांत असा एक मोठा दरबार भरवला. त्या दरबाराला आसामचा कुमार राजा व शिलादित्याच्या राज्यांतील सर्व मांडलिक राजे हजर होते. ह्या उत्सवासाठीं एक शंभर फूट उंचीचा भव्य मनोरा बांधण्यांत आला होता; आणि त्याच्यांत राजाच्या उंचीची एक बुद्धाची स्वर्णमूर्ति ठेवण्यांत आली होती. ह्या प्रसंगीं एकवीस दिवसपर्यंत श्रमण-ब्राह्मणांना अन्नवस्त्रांदिकांचा दानधर्म करण्यांत आला. पण शेवटल्या दिवशीं एकाएकीं त्या भव्य मनोर्‍याला आग लागली. तेव्हां शीलादित्याला अतिशय वाईट वाटलें; आणि तो एकदम आपल्या निवासस्थानांतून संघारामाच्या फाटकाकडे धांवत गेला. आश्चर्याची गोष्ट ही कीं, ती आग न फैलावतां तेथेंच विझली. त्यानंतर राजा सगळ्या मांडलिकांसह आजूबाजूचा देखावा पहाण्यासाठीं जवळच्या स्तूपावर चढला. तेथून खालीं येतांना एका पाखंड्यानें सुरा घेऊन त्याच्यावर एकाएकीं हल्ला केला. शीलादित्यानें खालीं वाकून आपला बचाव केला, आणि त्या पाखंड्याला पकडून खालीं आणलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel