६०. ह्या अभिनव दासवासनेंतून एक रशिया तेवढा मोकळा झाला आहे. समरकन्द, बुखारा इत्यादि ठिकाणच्या मागासलेल्या लोकांवर झारशाहींत जे अत्याचार होत असत, ते सध्याच्या कम्युनिस्ट कारकीर्दींत अजीबात बंद झाले आहेत. एवढेंच नव्हे, तर ह्या लोकांना समानत्मतेच्या पायरीवर चढवण्याचे बोल्शेव्हिकांचे आटोकाट प्रयत्‍न चालू आहेत. या मुसलमानी देशांतील बायका पडद्यांत खितपत पडल्या होत्या. त्यांना बोल्शेव्हिकांनी एकदम पडद्यांतून बाहेर काढलें; आणि त्यांच्या शिक्षणाची सर्वतोपरि जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. या संबंधानें ज्या वाचकांना शक्य असेल त्यांनी Anna L. Strong  या अमेरिकन विदुषीचें ‘The Red Star in Samarkand’ हें पुस्तक अवश्य वाचावें, आणि त्याची व मिस् मेयोच्या ‘Mother India’  ह्या पुस्तकाची तुलना करावी.

६१. परंतु मिस् मेयोची तारीफ करणार्‍या भांडवलवाल्यांना हें बोल्शेव्हिकांचें कृत्य आवडावें कसें ? बोल्शेव्हिक आपले तांबडे साम्राज्य (Red Empire) सर्वत्र फैलावूं पहातात, अशी त्यांनी सारखी ओरड चालविली आहे. आधुनिक दासांना मुक्त करणें ही जर तांबडी साम्राज्यशाही, तर निग्रोंना मुक्त करणार्‍या लिंकनला काळ्या साम्राज्यशाहीचा संस्थापक कां म्हणूं नये ? तात्पर्य ह्या अभिनव दास्याचे दुष्परिणाम अद्यापि युरोपांतील भांडवलवाल्यांना जाणवलेले नाहींत. जोंपर्यंत आपल्या देशांतील बेकार लोकांना थोडेंबहुत वेतन देऊन स्वस्थ ठेवतां येतें, तोंपर्यंत त्यांना हें दास्य चालू ठेवतां येणें शक्य आहे. पण त्यांचा आपसांतील कलह कसा बंद पडावा ?  इंग्लंडला आणि फ्रान्सला यथास्थित दास आहेत;  मग इटलीला कां असूं नयेत ? आणि जर्मनीच्या ताब्यांतून सुटून जे इंग्लंडच्या व फ्रान्सच्या ताब्यांत गेले, ते जर्मनीला परत कां मिळूं नयेत ?

६२. ह्या अभिनव दास्याचे दुष्परिणाम इतक्या लवकर जाणल्याबद्दल रशियन पुढार्‍यांचें खरोखरच अभिनंदन केलें पाहिजे. सगळ्या जगाला ह्या दास्यांतून मुक्त करण्यास ते असमर्थ आहेत. तथापि आपल्या साम्राज्यांतून त्याचें त्यांनी उच्चाटन केलें आहे;  आणि चीन देशाची त्यांतून सुटका व्हावी यासाठीं ते उत्कंठित दिसतात. यांत त्यांचा स्वार्थ असूं शकेल. दक्षिण अमेरिकेंतील लहान मोठ्या राज्यांना युरोपीय राजांपासून मुक्त करण्यांत संयुक्त संस्थानांतील पुढार्‍यांचा स्वार्थ होताच. पण तो उच्च दर्जाचा होता. आपल्या आजूबाजूला राजसत्ता बळावत गेली, तर आपल्या प्रजासत्ताक पद्धतीचा लोप होईल, हें त्यांना भय होतें; व याचसाठीं दक्षिण अमेरिकेंतील राष्ट्रांना युरोपीय राजांपासून स्वतंत्र होण्यास त्यांनी मदत केली. बोल्शेव्हिकांचा स्वार्थहि अशाच तर्‍हेचा आहे. चीन देश त्यांच्या सीमेला भिडलेला आहे. तेथें जपानी भांडवलशाहीची सत्ता स्थिर झाली, तर त्यापासून आपल्या समाजसत्तेला बाध येईल, असें त्यांना भय वाटत आहे;  आणि केवळ आपल्या समाजसत्तेच्या रक्षणासाठीं चीनमध्येंहि ते समाजसत्ता स्थापन करूं पहात आहेत. अशा स्वार्थाला उच्च दर्जाचा स्वार्थ कोण न म्हणेल ?

६३. वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, स्त्रीला काय किंवा दासदासींना काय, परिग्रहांत दाखल केल्यानें मनुष्यजातीवर अनेक संकटें ओढवतात. त्यांना सर्वथैव स्वतंत्रता देऊन समतेनें वागवणें हें मनुष्यजीवनाच्या विकासाला अत्यन्त आवश्यक आहे. बौद्धांच्या किंवा जैनांच्या समजुतीप्रमाणें बायकामुलांना आणि दासदासींना सोडून संन्यास घेण्यानें ह्या दोन परिग्रहांपासून मनुष्यजातीची मुक्तता होणार नाहीं, हा इतिहासाचा अनुभव आहे. सर्व मनुष्यजात राहूंद्याच, पण हे श्रमण देखील ह्या परिग्रहांतून मुक्त होऊं शकत नाहींत. आरामिकांच्या आणि विहारसेवकांच्या रूपानें ते दासपरिग्रह स्वीकारतात, व त्यासाठीं खोटींनाटीं पुराणें रचून अतिपरिग्रही राजे लोकांची हांजी हांजी करण्याची त्यांच्यावर पाळी येते, हें दुसर्‍या विभागांत दर्शविण्यांत आलेंच आहे.१  तेव्हां कार्ल मार्क्स आणि त्याचे अनुयायी समाजवादी जो मार्ग दाखवतात, तोच या बाबतींत योग्य वाटतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. वि० २।१०२-११९ पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel