बौद्धसंघाचा परिचय

प्रस्तावना


माझे मित्र श्री. काका कालेलकर यांस नवजीवनांत काही लेख लिहिल्याबद्दल व त्या प्रकरणीं जामीन न दिल्याबद्दल ता. २० फेब्रुआरी १९२३ रोजीं एका वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा झाली. साबरमतीच्या तुरुंगांत जाण्यापूर्वी आपणासाठीं कोठून तरी विनयग्रंथाचें इंग्रजी भाषान्तर मिळवून देण्यास त्यांनीं मला सांगितलें. Sacred Books of the East मध्यें छापलेलें हें भाषान्तर सध्या उपलब्ध नाहीं, आणि सार्वजनिक लायब्रर्‍यां खेरीज करून दुसर्‍या कोठेंहि मला तें मिळेना. तेव्हां केवळ श्री. काकांचसाठीं नव्हे तर सर्वसामान्य वाचकांसाठीं विनयग्रंथाचें सार तयार करावें ही कल्पना माझ्या मनांत आली, व गुजराथ पुरातत्त्व मंदिराच्या प्रबंधक समितीला ती पसंत पडल्यामुळें हें काम मीं ताबडतोब हातीं घेतलें. केवळ विनयाचें सार देण्यापेक्षां बुद्धसमकालीन श्रावकसंघांतील व्यक्तींचीं संक्षिप्त चरित्रें दिल्यास हा ग्रंथ विशेष लोकप्रिय होईल असें वाटून त्यांचाहि तिसर्‍या भागांत संग्रह केला; व या ग्रंथाला ‘विनय ग्रंथाचा परिचय’ असें नांव न देतां ‘बौद्धसंघाचा परिचय’ हें नांव दिलें.

विनयग्रंथाचे, पाराजिका, पाचित्तियादि, महावग्ग, चुल्लवग्ग आणि परिवार असे पांच विभाग आहेत. त्यांपैकीं पहिल्या दोन विभागांत या पुस्तकाच्या दुसरर्‍या भागांत दिलेले नियम, त्यांची पूर्वपीठिका, व त्यांवर टीका आहे. महावग्ग आणि चुल्लवग्ग यांत उपसम्पदा कशी द्यावी, आचार्याचीं व शिष्याचीं कर्तव्यें इत्यादिक गोष्टींचें विस्तृत वर्णन असून प्रसंगोपात्त बारीकसारीक नियमहि आले आहेत. परिवारांमध्यें पाराजिकादिक नियमांची संक्षेपानें यादी व विनयाची गुरुपरंपरा यांचें वर्णन आहे. या पांचांतहि पहिल्या दोन विभागांत आलेले भिक्षूंचे आणि भिक्षुणींचे नियम फार प्राचीन असावे असें त्यांच्या  भाषेवरून सिद्ध होतें. त्या नियमांची आणि विनयग्रथांची भाषा भिन्न आहे, किंबहुना विनयग्रंथ हा त्या नियमांवर एक मोठी विस्तृत टीकाच म्हटली असतां अतिशयोक्ति होणार नाहीं.

आतां हे नियम कधीं अस्तित्वांत आले, व त्यांनां सध्याचें स्वरूप कोणत्या काळीं मिळालें याचा नीटं उलगडा होणें कठीण आहे. यांपैकीं कांहीं महत्त्वाचे नियम स्वतः बुद्ध भगवंतानें भिक्षुसंघासाठीं घालून दिले असावेत; आणि मगाहून प्रसंगोपात्त भिक्षुसंघानें त्यांत फरक केला असावा. उदाहरणार्थ दुपारीं बारा वाजल्यानंतर भिक्षूला अन्नग्रहण करण्याची मानाई हा नियम १  घ्या, याची पूर्वपीठिका मज्झिम निकायांतील कीटागिरिसुत्तांत(नं ७०) सांपडते, ती अशीः-
------------------------------------------------------------------------------------------------------------
१. भाग २, क० ८६. पचित्तिय ३७.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एके वेळीं भगवान काशिराष्ट्रांत मोठ्या भिक्षुसंघासहवर्तमान उपदेश करीत फिरत होता. तेथें भगवान् भिक्षूंनां उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, मीं रात्रीचें जेवण सोडलें आहे. यायोगें माझ्या शरीरांत व्याधि कमी झाली आहे, जाड्य कमी झाले आहे, अंगीं बळ आलें आहे, आणि चित्ताला स्वास्थ्य मिळत आहे. भिक्षु हो, तुम्हीहि याप्रमाणें वागा. तुम्हीं जर रात्रीचें जेवण सोडलें, तर तुमच्या शरीरांत व्याधि कमी होईल, जाड्य कमी होईल, अंगीं बळ येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ येईल.”  “ठीक भदन्त,” असें त्या भिक्षूंनीं भगवंताला उत्तर दिलें.

त्यानंतर भगवान् प्रवास करीत करीत कीटागिरि नांवाच्या शहराला आला. तेथें अस्सजि (अश्वजित्) आणि पुनब्बसुक (पुनर्वसुक) नांवाचे दोन भिक्षू रहात होते. कांहीं भिक्षू त्यांजपाशीं जाऊन त्यांनां म्हणाले “भगवान् रात्रीं जेवीत नाहीं व भिक्षुसंघानेंहि रात्रीचें जेवण सोडलें आहे. तुम्हीं याप्रमाणें रात्रीचें जेवण सोडलें तर तुम्हांलाहि बरें वाटेल.’ त्यावर अस्सजि आणि पुनब्बसुक म्हणाले,  “बन्धुहो, आम्हीं संध्याकाळी जेवतों, सकाळी जेवतों, दुपारी जेवतों आणि दोन प्रहर उलटून गेल्यावरहि जेवतों. येणेंकरून आमच्या शरीरांत व्याधि कमी होते, जडता कमी होते, अंगीं बळ येतें आणि  आमच्या चित्ताला स्वास्थ्य वाटतें. तर मग हातचें सोडून पळत्याच्या पाठीमागे आम्हीं कां लागावे?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel