औषध

५५. भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं भिक्षूंनां शरद्ऋतूंत प्रकृति नीट न राहिल्यामुळें अजीर्ण होत असे. म्हणून बुद्धानें तूप, लोणी, तेल, मध व काकवी हीं पांच औषधें घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर वेळोवेळीं निरनिराळीं मुळें, पानें व फळें ह्यांचाहि औषधासाठी उपयोग करण्यास परवानगी दिली. परंतु तूप, तेल वगैरे पदार्थ सात दिवसांपलिकडे जास्त दिवस संग्रहाला ठेवूं नये, असा बुद्धानें नियम केला.

५६. एकदां बुद्ध भगवान् मगध देशातील अंधकविंद नांवाच्या गांवी असतां एका ब्राह्मणाच्या मनांतून त्याला व भिक्षुसंघाला दान देण्याची फार हौस होती. परंतु लोकांच्या पाळ्या इतक्या लागल्या होत्या की, दोन महिनेपर्यंत त्याला सवडच मिळेना. शेवटीं, यवागू (तांदुळांची पेज) व मधुगोळक नांवाचा पदार्थ तयार करून दिला असतां बुद्ध तो स्वीकारील कीं काय असें त्यानें आनंदाला विचारलें. तेव्हां आनंदानें बुद्धाच्या परवानगीनें ब्राह्मणाला यवागू तयार करण्यास लाविलें. त्या प्रसंगी बुद्धानें भिक्षूंना सकाळी यवागू पिण्याची परवानगी दिली; व संघाला यवागू दिल्याबद्दल त्या ब्राह्मणाची फार स्तुति केली. तेव्हांपासून सकाळीं यवागू पिण्याचा परिपाठ पडला.

५७. एका काळीं बुद्ध भगवान् भद्दिय नगरांतून निघून अंगुत्तराप प्रदेशांत प्रवास करीत होता. त्याच्या बरोबर १२५० भिक्षू होते. हें वर्तमान भद्दिय येथील मेंडक नांवाच्या सावकाराला समजलें; व त्यानें संघाला लागणारी अन्नसामग्री आपल्या नोकरांकडून गाड्यांवर लादली, व तो भिक्षुसंघामागोमाग चालला. एका जंगलीप्रदेशांत त्यानें बुद्धाला गांठलें, व त्याला संघासह भिक्षा ग्रहण करण्याला आमंत्रण केलें. बुद्धाचें आणि भिक्षूंचे भोजन झाल्यावर मेंडक भगवंताला म्हणाला, “भदंत, पुष्कळ ठिकाणीं रस्ता जंगली प्रदेशांतून जात असतो. तेथें अन्नपाण्याची मोटी पंचाईत पडते. अशा ठिकाणीं अन्नसामग्री बरोबर घेण्यास भिक्षूंला परवानगी द्यावी.” तेव्हां बुद्धानें तांदूळ, मूग, उडीद, मीठ, गूळ, तेल, तूप वगैरे पदार्थ पाथेयासाठी बरोबर घेण्यास भिक्षूंला परवानगी दिली.

५८. क्रमश: प्रवास करीत भगवान् ‘आपण’ नांवाच्या शहरी आला. तेथे केणिय नांवाचा जटिल रहात होता. त्यानें उत्तम पानक तयार करविलें, व तो बुद्धाच्या दर्शनाला आला, आणि म्हणाला, ‘भो गोतम, ह्या पानकाचा आपण स्वीकार करावा, बुद्धानें तें भिक्षुसंघास देण्यास सांगितलें, व जेव्हां भिक्षु तें घेण्यास संकोच करूं लागले, तेव्हां त्यानें तें पिण्याची त्यांना परवानगी दिली, व धान्याच्या रसाशिवाय इतर कोणत्याहि फळाचा रस, तसाच फुलांचा पानांचा आणि उसाचा रस दुपारीं बारा वाजल्यानंतर पिण्यास हरकत नाहीं असा नियम केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel