७१. ज्या भिक्षूला बहिष्कार घालण्यांत आला होता त्याला आपला दोष दिसून आला, व आपल्याला केलेला दंड योग्य होता असें दिसून आलें. त्याच्या पक्षाच्या भिक्षूंनीं हें वर्तमान भगवंताला कळविलें. तेव्हां त्यानें त्या भिक्षूला आपल्या दोषाचें प्रायश्चित करण्यास सांगितलें. त्याप्रमाणें त्यानें तें केलें. नंतर त्याच्या पक्षाचे भिक्षु बहिष्कार घालणार्‍या भिक्षूंना म्हणाले, “ज्या दोषासाठीं तुम्ही ह्या भिक्षूला बहिष्कार घातला त्याचें त्यानें प्रायश्चित केलें आहे. तेव्हां आतां आपण संघसामग्री करूं.” बुद्धाला ही गोष्ट कळविली तेव्हां तो म्हणाला, “अशा प्रसंगीं संघसामग्री करावी ती अशी:- सर्वांनीं एकत्र जमावें. आजारी भिक्षु असला तरी त्यानें देखील यावें. नंतर समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघ माझ्या बोलण्याकडे लक्ष देवो. ज्या गोष्टीसाठीं संघांत तंटा उपस्थित झाला, ती गोष्ट हा भिक्षु कबूल करतो; व आपल्या दोषाचें त्यानें प्रायश्चित केलें आहे. जसे संघाला योग्य वाटत असेल तर हें प्रकरण मिटवून संघानें संघसामग्री करावी. ही विज्ञाप्ति झाली. त्यानंतर त्रिवार जाहीर करून कोणी हरकत घेतली नाहीं म्हणजे संघसामग्री झाली असें समजावें.”

उपालीनें ‘संघसामग्री किती प्रकारची असते’ असा प्रश्न केला असतां भगवान् म्हणाला, “संघसामग्री अर्थवियुक्त व अर्थवियुक्त व अर्थयुक्त अशी दोन प्रकारची असते. ज्या गोष्टीसाठीं तंटा झालेला असतो त्या गोष्टीचें मूळ कारण शोधून न काढतां जी सामग्री करण्यांत येते ती अर्थवियुक्त होय. पण ज्या गोष्टीसाठीं तंटा झालेला असतो त्या गोष्टीचें मूळ कारण शोधून काढून जी सामग्री करण्यांत येते ती अर्थयुक्त समजावी.”

तर्जनीय कर्म (धाक घालणें)


७२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं पण्डुक व लोहितक हे दोघे भिक्षु स्वत: संघांत तंटा उपस्थित करीत असत; व दुसर्‍या भिक्षूंनाहि तंटा उपस्थित करण्यास मदत करीत. भगवंताला हें वर्तमान समजलें; तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंला बोलावून तो म्हणाला, “भिक्षुहो, पण्डुक आणि लोहितक भिक्षूंला संघानें तर्जनीय कर्म करावें; तें असे:- त्या दोघांलाहि बोलावून आणून त्यांच्या आपत्तींची (दोषांची) त्यांना आठवण द्यावी; आणि आपत्ति लागू करून समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघ, माझ्या बोलण्याकडे लक्ष देवो. पण्डुक व लोहितक हे भिक्षु स्वत: तंटा उपस्थित करणारे असून दुसर्‍याला तंटा उपस्थित करण्यास मदत करतात. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघानें त्यांना तर्जनीय कर्म करावें.’ ही विज्ञाप्ति झाली. नंतर त्रिवार जाहीर करून कोणीं हरकत घेतली नाहीं ह्मणजे संघाकडून तर्जनीय कर्म करण्यांत आलें असें समजावें.

“तर्जनीय कर्म करण्यांत आलेले भिक्षू जर नीट रितीनें वागूं लागले तर संघानें त्या भिक्षूंला माफी करावी; तीहि पद्धतीप्रमाणें पहिल्यानें विज्ञाप्ति करून व नंतर त्रिवार जाहीर करून कोणी हरकत घेतली नाहीं ह्मणजे करावी.”

नियश:कर्म१ [वे़डगळपणा जाहीर करणें]

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- मूळ पाली शब्द ‘नियसकम्म’ असा आहे. पण ओल्डेनबर्ग (Oldenberg) ह्यांनी ‘निस्सयकम्म’ असा पाठ सर्वत्र स्वीकारला आहे. ही त्यांची चूक असावीं असें मला वाटतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७३. त्या काळीं आयुष्यमान् सेय्यसक भिक्षु पुष्कळच आपत्ति करीत असे; गृहस्थाबरोबर फार संघटन ठेवीत असे. त्याला परिवास देण्यांत, पूर्वस्थितीवर आणण्यांत, मानत्त देण्यांत व आब्भान कर्म करण्यांत भिक्षूंचा फार काळ जात असे. हें वर्तमान भगवंताला समजलें, तेव्हां तो म्हणाला, “संघानें अशा भिक्षूला नियश:कर्म करावें, म्हणजे दुसर्‍या कोणत्याहि भिक्षूच्या आश्रयावांचून त्यानें एकाकी राहूं नये. येथेंहि विज्ञाप्ति करणें व त्रिवार जाहीर करणें पूर्वीप्रमाणेंच समजावें.
“तो भिक्षू चांगल्या रितीनें वागूं लागला व चांगल्या भिक्षूंच्या सहवासांत राहूं लागला म्हणजे संघानें त्याला माफी करावी (विज्ञाप्ति व जाहीर करणें पूर्वीप्रमाणेंच).”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel