Bookstruck

भाग २ रा 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
४१. बुद्ध भगवान् शाक्यदेशांत कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. त्या काळीं एका कुंभारानें, भिक्षूंला पात्रें पाहिजे असल्यास आपणांस सांगावें अशी विनंती केली होती. भिक्षु प्रमाणाबाहेर पुष्कळ पात्रें त्याजकडून घेऊं लागले. ज्यांचीं पात्रें लहान होतीं ते मोठीं घेऊं लागले; ज्यांचीं मोठीं होतीं ते लहान घेऊं लागले. त्यायोगें त्या कुंभाराला दुसरीं मातीचीं भांडीं करण्यास सवड मिळेना, व त्याची व त्याच्या मुलांबाळांची उपासमार होऊं लागली. हें पाहून लोक भिक्षूंवर टीका करूं लागले. ही गोष्ट भगवंताला समजली; तेव्हां त्यानें पात्र तयार करवून घेण्याची मनाई केली. तदनंतर एका भिक्षूचे पात्र फुटलें. भगवन्तानें पात्र तयार करवून घेण्याची मनाई केली आहे म्हणून तो भिक्षु आपल्या ओंजळींतच भिक्षा ग्रहण करूं लागला. लोक म्हणूं लागले कीं, हे शाक्यपुत्रीय श्रमण, इतर परिव्रजकांप्रमाणे (तित्थियांप्रमाणें) ओंजळींतच भिक्षा घेतात हें कसें? ही गोष्ट भगवंताला समजली; तेव्हां तो म्हणला, “भिक्षुहो, ज्याचें पात्र फुटलें असेल त्याला नवीन पात्र तयार करवून घेण्यास मी परवानगी देतों.”  त्याकाळीं भगवंतानें पात्र फुटलें असतां दुसरें तयार करवून घेण्यास परवनगी दिली आहे म्हणून षड्वर्गी भिक्षु पात्राला थोडासा धक्का लागला तरी त्या कुंभाराकडून नवीन पात्र तयार करवून घेत असत. त्यामुळें पूर्वींप्रमाणेंच त्याला त्रास होऊं लागला. हें वर्तमान भगवंताला समजले तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु पांच ठिकाणीं पात्र सांधण्याचा प्रसंग आल्यावांचून दुसरें पात्र तयार करून घेईल त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२२।।

त्या भिक्षूनें तें पात्र भिक्षुसंघाला द्यावें; व त्या भिक्षुसंघांत जें शेवटच्या दर्जाचें पात्र असेल तें त्याला देण्यांत येऊन, ‘भिक्षु, हें पात्र तूं फुटेपर्यंत धारण करावें’ असें त्यास सांगण्यांत यावें. हा ह्या बाबतींत शिष्टाचार समजावा.

४२. बुद्धभगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्याकाळीं आयुष्मान् पिलिंदवच्छ राजगृह येथें लेण करविण्याच्या उद्देशानें एकंदरा साफ करवीत होता. बिंबिसार राजानें तें पाहून, तेथें कोणत्या हेतूंने साफसूफ करण्यांत येत आहे. असा पिलिंदवच्छाला प्रश्न केला. तेव्हां पिलिंदवच्छानें लेण करविण्याचा आपला उद्देश त्याला कळविला. बिंबिसार म्हणाला, तुम्हांला एकादा आरामिक१(१- आरामांत काम करणारा मजूर.) पाहिजे काय?” पिलिंदवच्छ म्हणाला, “भगवंत अरामिक ठेवण्याची परवानगी दिली नाहीं.” बिंबिसार म्हणाला, “असे आहे तर भगवंताला विचारून मला कळवा.” पिलिंदवच्छानें हें वर्तमान एका माणसाकडून भगवंताला कळविलें. तेव्हां त्यांनें आरामिक ठेवण्याची भिक्षूंना परवानगी दिली. दुसर्‍या वेळीं जेव्हां बिंबिसार पिलिंदवच्छाजवळ आला तेव्हां हें वर्तमान त्यानें त्याला सांगितलें. बिंबिसारानें त्याला एक आरामिक देण्याचें वचन दिलें. परंतु अनेक कार्यांत व्यग्र असल्यामुळें आरामिक पाठविण्याचा त्याला विसर पडला. कांही कळानें त्याला ह्या गोष्टीची आठवण झाली व आरामिक देण्याचें वजन देऊन किती दिवस झाले ह्याची त्याला चौकशी केली. महामात्रानें गणना करून पांचशे रात्री झाल्याचें राजाला सांगितलें; व राजानें इतके आरामिक पिलिंदवच्छाला एकदम दिले. त्यांचा एक मोठा गांवच वसला. त्याला आरामिकग्राम किंवा पिलिंदग्राम असें म्हणत असत.
« PreviousChapter ListNext »