बाळपणीं हे दोघे दुसर्‍या मुलांबरोबर खेळत असतां कोणी मुलगे, आपला आजा, आपली आजी, आपला चुलता, असें म्हणत. तें ऐकून महापंथक आईला म्हणे कीं, ‘आमचे असे कोणी नातलग नाहींत काय?’ ती म्हणे, “बाळ, तुमचे पुष्कळ नातलग राजगृहातं आहेत.”

“मग तूं आम्हाला तेथें कां घेऊन जात नाहींस?”

‘तेथें जाणें योग्य नाहीं,’ अशी त्या मुलाची समजूत घालण्याची ती खटपट करी;  पण तो एकसारखा हट्ट धरून बसे. शेवटीं ती नवर्‍याला म्हणाली, “हे मुलगे मला फार त्रास देतात, व स्वतःहि त्रास करून घेतात! काय माझे वडील माझें मांस थोडेंच खाणार आहेत!  चला, आपण ह्या मुलांना घेऊन तिकडे जाऊं.”

तोः- त्यांच्या समोर जाणें मला अगदीं अशक्य आहे. पण तुला मी राजगृहापर्यंत पोहोंचवितों.

ही गोष्ट तिला पसंत पडली, व मुलांला घेऊन तीं दोघें प्रवास करीत राजगृहाच्या नगरद्वाराजवळ असलेल्या एका धर्मशाळेंत येऊन उतरलीं. ‘आपण मुलांना घेऊन आलें आहें,’ असा आपल्या आईबापांला तिनें निरोप पाठविला. त्यांनीं कांहीं द्रव्य देऊन आपल्या एका मनुष्याकडून उलटा निरोप पाठविला कीं, ‘तुझें तोंड आम्ही पाहूं इच्छित नाहीं. पण हें द्रव्य घेऊन जर मुलांना देत असशील, तर त्यांना ह्याच माणसाच्या स्वाधीन कर. हें द्रव्य तुमच्या दोघांच्या उपजीविकेला पुरे आहे. तुम्हाला जेथें बरें वाटेल तेथें जाऊन रहा.’ मुलांचें कल्याण होत असल्यास होऊं द्या, असा विचार करून व आईबापांनीं पाठविलेलें द्रव्य घेऊन तिनें त्या दोघां मुलांना आलेल्या माणसांच्या हवालीं केलें.

ते दोघेहि आजोबाच्या घरीं उत्तम रितीनें वृद्धिंगत होत होते. महापंथक आज्याबरोबर वारंवार भगवंताचा धर्मोपदेश ऐकण्यास जात असे, व त्यामुळें गृहत्याग करून भिक्षु होण्याची त्याला उत्कट इच्छा उद्‍भवली; आणि हा आपला विचार त्यानें आजोबाला कळविला. आजोबा भगवंताचा भक्तच होता. त्याला नातवाच्या बोलण्यानें दुःख न होतां उलटा आनंद झाला, व त्या मुलाला बुद्ध भगवंतापाशीं घेऊन जाऊन त्याला प्रव्रज्या देण्याची त्यानें विनंति केली. एका पिंडपातिक भिक्षूकडून भगवंतानें त्या मुलाला प्रव्रज्या देवविली. पुढें हा महापंथक बुद्धशासनांत व आकाशानंत्यादिक चार अरूपावचर आयतनांत पारंगत झाला.

आपल्या भावालाहि बुद्धधर्मामृत पाजण्याची उत्कट इच्छा झाल्यामुळें आजोबाच्या परवानगीनें महापंथकानें चूळपंथकालाहि प्रव्रज्या दिली व त्याला

पदुमं यथा कोकनदं सुगन्धं ।
पातो सिया फुल्लमवीतगन्धं ।।
अंगीरसं पस्स विरोचमानं ।
तपन्तमादिच्चमिवन्तळिक्खे १ ।।
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- कोसल संयुत्तांत बुद्धाचें गुणवर्णन करण्याच्या उद्देशानें चंदनंगलिक उपासकानें, व अंगुत्तरनिकायाच्या पंचक निपातांत पिंगियानी ब्राह्मणानें ही गाथा म्हटल्याचा उल्लेख आहे. कांहीं असो, बुद्धाच्या स्तुतिपर गाथांत ही फार प्राचीन असावी, असें वरील गोष्टीवरूनहि दिसून येतें. तिचा अर्थ असा :- ज्याप्रमाणें कोकनद नांवाचें सुगंधी पद्म प्रातःकाळीं प्रफुल्लित होऊन सुगंधदायक होतें, त्याप्रमाणें शोभणार्‍या व अंतरिक्षांत प्रकाशणार्‍या सूर्यासारख्या अंगीरसाला (बुद्धाला) पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------
ही गाथा शिकविण्यास आरंभ केला. परंतु पूर्वकर्मविपाकामुळें चार महिने खटपट करूनहि चूळपंथकाच्या डोक्यांत ती शिरेना. तेव्हां महापंथक म्हणाला, “ह्या शासनांत तुझी अभिवृद्धि होणें शक्य नाहीं. चार महिन्यांत तुला जर एक गाथा शिकतां येत नाहीं तर भिक्षुकृत्यांत प्राविण्य तूं कसें संपादन करशील?”

बिचारा चूळपंथक वडील भावानें विहारांतून घालवून दिल्यामुळें विहाराबाहेर रडत उभा होता. त्याला बुद्ध भगवंतानें पाहिलें, व त्याच्या रडण्याचें कारण विचारलें. घडलेलें वर्तमान समजलें, तेव्हां भगवान् म्हणाला, “तूं रडूं नकोस. मी तुला हें निर्मळ वस्त्रखंड देत आहें. त्याच्यावर, ‘हें स्वच्छ करतों, हें स्वच्छ करतों,’ असें म्हणून ध्यान कर.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel