Bookstruck

भाग ३ रा 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भगवंतानें सांगितलेल्या नियमानें, ‘हें स्वच्छ करतों, हें स्वच्छ करतों, असें म्हणत म्हणत व हातानें तें चोळीत चोळीत चूळपंथक त्यावर ध्यान करू लागला. तें अधिकाधिक सुरकुतलेलें व मलीन झालेलें दिसूं लागलें. तेव्हां चूळपंथकाला आपोआप आत्मबोध झाला. ‘माझें अंतःकरण अत्यंत परिशुद्ध असून तें ह्या शरीराच्या तडाक्यांत सांपडल्यामुळें या वस्त्रखंडाप्रमाणें अधिकाधिक मलीन होत चाललें आहे,’ असें तो आपणाशींच म्हणाला; आणि तेथल्यातेथेंच त्यानें अर्हतपदाचा लाभ करून घेतला. विशेषतः ‘मनोमयकाय’ १
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- मनोमयकाय म्हणजे सिद्धीच्या बळानें आपणासारखे हजारों देह उत्पन्न करणें.) उत्पन्न करण्यांत तो अत्यंत कुशल झाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------
दुसर्‍या दिवशीं प्रसिद्ध जीवक वैद्याचे घरीं भगवंताला आणि भिक्षुसंघाला आमंत्रण होतें. परंतु भावानें हांकून लावलें असल्यामुळें चूळपंथकाला तेथें जातां येईना. भगवान् आणि भिक्षु आपापल्या आसनावर बसल्यावर जीवक स्वतः वाढावयास आला. भगवंतानें पात्रावर हात ठेवला. ‘असे कां करतां’ असा प्रश्न केला असतां भगवान् म्हणाला, “विहारांत एक भिक्षु अद्यापि शिल्लक राहिला आहे.”

त्याला बोलावण्यासाठीं जीवकानें ताबडतोब मनुष्य पाठविला. इकडे तरुण चूळपंथक आपणाला मिळालेल्या नवीन सिद्धीचा प्रयोग करीत बसला होता. त्यानें आपणासारखे हजार भिक्षु निर्माण केले होते. जीवकाच्या मनुष्यानें त्यांना पाहिलें, व तेथें एकसारखेच पुष्कळ भिक्षु असल्याचें जीवकाला वर्तमान कळविलें. ह्यावर भगवंतानें अशी तोड सांगितलीं कीं, जो कोणी पहिला भिक्षु दिसेल, त्याच्या चीवराला पकडून, ‘तुला भगवान् बोलावीत आहेत,’ असें सांगावें. त्याप्रमाणें जीवकाच्या मनुष्यानें केलें; तेव्हां खर्‍या चूळपंथकाशिवाय बाकी सर्व मनोमयकायधारी भिक्षु गुप्त झाले, व चूळपंथक त्या मनुष्याबरोबर येऊन भिक्षुसंघांत सामील झाला.
« PreviousChapter ListNext »