Bookstruck

भाग ३ रा 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
राष्ट्र० :- ह्यालाच उद्देशून भगवंतानें म्हटलें आहे कीं, जीवलोकाचें रक्षण करणारा कोणी नाहीं, त्याला सुरक्षित जागा नाहीं.

राजा :- किती उत्तम! भो राष्ट्रपाल, हें त्या भगवंताचें म्हणणें अगदीं सत्य आहे.

राष्ट्र० :- महाराज, सध्या आपण सर्व संपत्तीचा उपभोग घेत आहां. पण अंतकाळीं तिचा त्याग करून तुमच्या कर्माप्रमाणें तुम्हांला एकाकीं जावें लागणार नाहीं काय?

राजा :- ह्यांत काय शंका?

राष्ट्र० :- ह्यालाच उद्देशून, महाराज, भगवंतानें म्हटलें आहे कीं, जीवलोकांचे स्वकीय असें कांही नाहीं, सर्व सोडून त्याला गेलें पाहिजे.

राजा :- किती उत्तम! भो राष्ट्रपाल, हें त्या भगवंताचें म्हणणें अगदीं सत्य आहे.

राष्ट्र० :- महाराज, अत्यंत भरभराटींत असलेल्या ह्या कुरूंच्या राष्ट्राचे तुम्ही अधिपति आहां; आणि समजा, एकादा मनुष्य येऊन तुम्हांला म्हणाला कीं, पूर्वेच्या बाजूला दुसरें असेंच एक समृद्ध राज्य आहे. तेथें धन धान्य, हत्ती घोडे वगैरे पुष्कळ आहेत. जर शक्य असेल तर तें राष्ट्र तुम्ही जिंकणार नाहीं काय?

राजास :- ह्यांत काय शंका?

राष्ट्र० :-  ह्यालाच उद्देशून, महाराज, भगवंतानें म्हटलें आहे कीं, जीवलोकाची तृप्ती नाहीं, तृष्णेचा तो दास आहें.

राजा :- किती उत्तम! भो राष्ट्रपाल हें त्या भगवंताचें म्हणणे अगदी सत्य आहे.”                                          
« PreviousChapter ListNext »