ब० :- आयुष्मान् काश्यप, तूं भलताच प्रश्न विचारलास. असें न विचारतां, असें विचार कीं, या ऐशीं वर्षांत तुझ्या मनांत किती वेळां कामविकार उत्पन्न झाला.

का० :- बरें ठीक, किती वेळां कामविकार उत्पन्न झाला हें सांग.

ब० :- आयुष्मान् काश्यप, ह्या ऐंशी वर्षांत माझ्या मनांत एकदां सुद्धां कामविकार उत्पन्न झाल्याचें मला आठवत नाहीं. एवढेंच नव्हे, द्वेषबुद्धि किंवा दुसर्‍याला आणि आपणाला त्रास देण्याची बुद्धि मला कधीं उद्‍भवलीं नाहीं. मी गृहस्थानें दिलेलें चीवर कधीं स्वीकारलें नाहीं. कधीं दुसर्‍याकडून  चीवर शिववून घेतलें नाहीं, कधीं गांवांत बसलों नाहीं, किंवा जेवलों नाहीं. कधीं भिक्षुणींच्या उपाश्रयांत गेलों नाहीं... कधीं मला रोग उत्पन्न झाला नाहीं, आणि कधीं औषधासाठीं मीं एक हरडाहि खाल्ला नाहीं. कधीं लोडाला टेंकून बसलों नाहीं, आणि कधीं गांवांत चातुर्मास घालविला नाहीं. प्रव्रज्येनंतर मी सातच दिवस १ पृथग्जन होतों;  सातच दिवस ऋणी होऊन मी राष्ट्रपिंड खाल्ला; आठव्या दिवशीं अर्हत्पद मिळविलें.”  (१- पृथग्जन म्हणजे सामान्य जन, जो आर्यमार्गाला लागला नाहीं तो. असा मनुष्य भिक्षेवर निर्वाह करूं लागला तर तो राष्ट्राचा ऋणी होतो. परंतु अर्हत् अनृण होऊन राष्ट्रीय अन्न खातो.)

हें बक्कुलाचें भाषण ऐकून अचेल काश्यप प्रसन्न होऊन त्याचा शिष्य झाला. नंतर आपण आज परिनिर्वाण पावणार आहें, असें सांगून बक्कुलानें सर्व विहारांत जाऊन भिक्षूंना बोलावून आणलें व भिक्षुसंघामध्यें बसला असतां तो परिनिर्वाण पावला.

३४
सोभित

“पूर्वजन्म आठवणार्‍या भिक्षुश्रावकांत सोभित श्रेष्ठ आहे.”

ह्याचा जन्म ब्राह्मणकुळांत झाला. ह्याचें नांव सोभित. पुढें वयांत आल्यावर तो भिक्षु झाला, व ध्यानसमाधीची भावना करून पूर्वजन्मस्मृतिज्ञानांत निपुण झाला. विनयग्रंथांत चौथ्या पाराजिकेच्या टीकेंत तेवढा ह्याचा उल्लेख आला आहे. इतर ठिकाणीं याची माहिती सांपडत नाहीं.

३५
उपालि

“विनयधर भिक्षुश्रावकांत उपालि श्रेष्ठ आहे.”

हा जातीचा न्हावी. ह्याची गोष्ट अनुरुद्धाच्या गोष्टींत (प्रकरण ५ वें) आलीच आहे. पहिल्या संगीतींत महाकाश्यपानें ह्यालाच विचारून विनयाचा संग्रह केला, असें विनयअट्ठकथेंत म्हटलें आहे. त्यावरून विनयधरपरंपरेचा हा पहिला आचार्य होता, असें दिसून येतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel