५०
भद्दा कुण्डलकेसा

“तत्काळ बोध प्राप्त झालेल्या भिक्षुणीश्राविकांत भद्दा कुण्डलकेसा श्रेष्ठ आहे.”

ही राजगृहांत एका श्रेष्ठिकुळांत जन्मली. भद्दा हें तिचें नांव होतें. त्याच दिवशीं राजपुरोहिताला एक मुलगा झाला. त्याच्या जन्माच्या वेळीं नगरांतील आयुधें प्रज्वलित झालीं. त्यामुळें राजा घाबरून गेला, व दुसर्‍या दिवशीं पुरोहिताला म्हणाला, “रात्रीं आयुधें प्रज्वलित झाल्यामुळें माझे लोक भिऊन गेले.” पुरोहित म्हणाला, “हें आपल्याच महालांत घडलें असें नाहीं; सर्व नगरांत असाच प्रकार घडला. माझ्या घरीं जो मुलगा जन्मला तो सर्वांचा शत्रु होणार. त्याचें हें पूर्वचिन्ह आहे. पण त्यामुळें तुमच्या जिवाला कांहीं धोका नाहीं. जर तुमची इच्छा असेल, तर त्या मुलाला येथून मी बाहेर पाठवून देतों.”

आपणाला कांहीं बाधा नाहीं, असें पाहून राजानें त्या मुलाला पुरोहिताच्याच घरीं राहूं दिलें. पुरोहितानें त्याचें नांव शत्रुक हेंच ठेंविलें. तो इकडे तिकडे धावण्यापळण्यास समर्थ झाल्याबरोबर चोर्‍या करूं लागला. बापानें त्याचें नियमन करण्याची हद्द करून पाहिली! पण कांहीं उपाय चालेना! तेव्हां वयांत आल्याबरोबर काळीं वस्त्रें नेसावयास देऊन, व चोरीला लागणारीं आउतें त्याच्या हवालीं करून बापानें त्याला घरांतून हांकून दिलें. त्या दिवसापासून चोर्‍यांवर तो निर्वाह करूं लागला.

राजा नगरसंचाराला निघाला असतां, ज्या त्या घराच्या भिंतीला पडलेलीं भोकें पाहून, आपल्या सारथ्याला म्हणाला, “भिंतीला भोकें का पाडण्यांत आलीं असावीं?” सारथी म्हणाला, “महाराज, शत्रुक नांवाचा एक चोर अशीं भोकें पाडून चोर्‍या करीत असतो.” तें ऐकून राजानें कोतवालाला बोलावून आणलें, आणि तो म्हणाला, “आमच्या शहरांत जो चोर चोर्‍या करीत आहे, त्याला तूं का पकडीत नाहीस?”

को० :- महाराज, चोरी करतांना तो दिसत नाहीं, म्हणून त्याला आम्ही पकडूं शकत नाहीं.

राजा :- आजच्या आज जर तूं त्या चोराला पकडशील, तरच जगशील, नाहीं तर तुला योग्य शिक्षा करण्यांत येईल.

हा राजाचा प्रयोग लागू पडला. त्याच रात्रीं कोतवालानें जिकडे तिकडे गुप्त हेर ठेवून शत्रुकाला चोरीच्या मालासह पकडलें व दुसर्‍या दिवशी राजाजवळ नेलें. त्याला दक्षिणद्वारांतून शहराबाहेर नेऊन ठार करावें, असा राजानें हुकूम केला. शहराच्या प्रत्येक चौकांत चौकांतून त्याची धिंड काढून त्याला घेऊन जात असतां भद्देनें पाहिलें व ती त्याच्यावर इतकी आसक्त झाली कीं, जर शत्रुक नवरा मिळाला नाहीं तर प्राण देणार, असें तिनें आपल्या आईबापांना स्पष्ट सांगितलें. एकुलती एक मुलगी, तिची पुष्कळ समजूत घालण्यांत आली; परंतु कांहीं इलाज चालेना. तेव्हां बाप धांवत कोतवालापाशीं गेला आणि एक हजार कार्षापणलांच देऊन म्हणाला, ‘कसेंहि करून ह्या चोराला माझ्या हवालीं करा.’ कोतवालानें शत्रुकाला संध्याकाळ होईपर्यंत इकडे तिकडे फिरविलें, व संध्याकाळीं फांशीची शिक्षा झालेल्या दुसर्‍याच एका चोराला त्याच्या ऐवजीं ठार मारून शत्रुकाला श्रेष्ठीच्या दासांच्या हवालीं करण्यांत आलें. त्यांनीं त्याला घरीं आणलें; तेव्हां श्रेष्ठीनें त्याला गंधोदकानें स्नान घालावयास लावून व सर्व आभरणांनीं मंडीत करून भद्देच्या महालांत पाठविलें. तिनें अत्यंत प्रमुदित होऊन त्याचें आगतस्वागत केलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel