Bookstruck

भाग ३ रा 66

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
“तिसरी शंका तुला येण्याचा संभव आहे कीं, तुझ्या मरणानंतर भगवंताचें आणि भिक्षुसंघाचें मी दर्शन घेणार नाहीं. पण तूं हें पक्के लक्ष्यांत ठेव कीं, मी तुझ्या पश्चात् भगवंताची आणि भिक्षुसंघाची भेट घेण्यांत विशेष तत्परता दाखवीन. तेव्हां मनांतली ही शंका दूर करून तुला शांतीनें मरण येऊं दे.

“चवथी एक तुला अशी शंका येईल कीं, नकुलमाता आपल्या पश्चात परिपूर्णपणें शील पाळणार नाहीं. पण हें तूं ध्यानांत ठेव कीं, भगवंताच्या ज्या श्वेतवस्त्र धारण करणार्‍या व परिपूर्णपणें शील पाळणार्‍या गृहिणी श्राविका आहेत; त्यांपैकीं मी एक आहें. तेव्हां हीहि शंका सोडून तुझा अंतकाळ शांतीनें होऊं दे.

“पांचवी तुला अशी एक शंका येईल कीं, नकुलमातेला अद्यापि समाधि मिळाली नाहीं. पण तें असें नाहीं. भगवंताच्या गृहिणीश्राविकांत ज्या ध्यानलाभिनी आहेत, त्यांपैकीं मी एक आहें. ह्याविषयीं ज्या कोणाला शंका असेल त्यानें पाहिजे तर भगवंताला विचारावें. तेव्हां हीहि शंका सोडून तुला शांतपणें मरण येऊं दे.”

“आणखी एक तुला शंका येण्याचा संभव आहे, ती ही कीं, नकुलमाता भगवंताच्या धर्मविनयांत अद्यापि स्थिर झाली नाहीं, तिला ह्या धर्माचें तत्त्व समजलें नाहीं. परंतु तूं हें लक्ष्यांत ठेव कीं, ज्या भगवंताच्या तत्त्ववेत्त्या गृहिणीश्राविका आहेत, त्यांपैकी मी एक आहें. ह्याविषयीं कोणाला संशय वाटत असल्यास त्यानें भगवंताला विचारावें. तेव्हां ही शंका सोडून देऊन प्रपंचाच्या तळमळीवांचून तुला शांतपणे मरण येऊं दे.”

या नकुलमातेच्या उपदेशानें नकुलपित्याचा आजार औषधावांचून ताबडतोब बरा झाला. कांहीं काळानें त्याच्या अंगांत थोडें बळ आल्यावर तो भगवान् रहात होता तेथें—भेसकलावनांत—आला; आणि भगवंताला अभिवंदन करून एका बाजूला बसला. तेव्हां भगवान् त्याला म्हणाला, “हे गृहपति, तूं मोठा भाग्यवान् आहेस. नकुलमातेसारखी प्रेम करणारी, अनुकम्पा करणारी, व उपदेश करणारी भांर्या तुला मिळाली आहे. सफेत वस्त्र धारण करणार्‍या माझ्या गृहिणीश्राविकांत ज्या शीलसंपन्न, समाधिसंपन्न आणि तत्त्वज्ञानी श्राविका आहेत, त्यांपैकीं नकुलमाता ही एक आहे. अशी पत्‍नी तुला मिळाली, हें तुझें भाग्य होय.”

नकुलमाता आणि नकुलपिता हीं नांवें त्यांच्या पहिल्या मुलावरून पडलीं असावीं. अशा आणीबाणीच्या प्रसंगीं नवर्‍याचें समाधान करण्यांत जर नकुलमातेनें एवढें कौशल्य दाखविलें, तर तिचा समानशील पतीहि त्या कामीं तसाच कुशल असला पाहिजे. तेव्हां इतरांचें समाधान करणार्‍या उपासकांत त्याला अग्रस्थान मिळालें, ह्यांत नवल नाहीं.
« PreviousChapter ListNext »