(ही गोष्ट काल्पनिक आहे नाव स्थळ इत्यादीमध्ये साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
पोलिस आले आणि त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला .हेमांगीचा चेहरा रडवेला झाला होता .तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात होते .नवऱ्याच्या मृत्यूचा तिला जबर धक्का बसलेला दिसत होता. शेजारच्या एक प्रौढ बाई तिला धीर देत होत्या.त्या बाईंचे हेमांगी इथे आल्यापासून हेमांगीजवळ चांगलेच सख्ख्य होते.
पोलिसानी तिला कुणी खून केला असे विचारले .रडत रडत, हुंदके देत देत, रडण्याचा आवेग आवरत तिने बोलायला सुरुवात केली .
आम्ही नुकताच चहा घेतला होता .रविवार असल्यामुळे यांना कामावर जायचे नव्हते .सुटी होती .रंगोली पाहात पाहात आम्ही चहा घेत होतो. एवढ्यात बेल वाजली .मी जाऊन दरवाजा उघडताच दोन तीन धटिंगण घरात घुसले.कोण पाहिजे असे मी विचारताच त्यांनी मला ढकलून दिले .मी जोरात जावून भिंतीवर आपटले . एवढे बोलून तिने तिच्या डोक्याला आलेले टेंगूळ दाखवले.
आलेले धटिंगण माझ्या ओळखीचे नव्हते .आतापर्यंत ते आमच्याकडे कधीच आले नव्हते .त्यांचे व नवऱ्याचे कांही देण्याघेण्याचे व्यवहार असावेत.त्यांची बरीच बोलाचाली चालली होती .बघता बघता त्यानी एक बरोबर आणलेला सोटा यांच्या डोक्यात घातला.हे रक्ताच्या थारोळ्यात तिथेच आडवे झाले.ते खाली पडलेले पाहताच ते धटिंगण घाई घाईने आमच्या घरातून निघून गेले.भिंतीवर आपटल्यामुळे मला चक्कर आल्यासारखे झाले होते. मला उठवत नव्हते. मला ओरडवत नव्हते. शेजाऱ्यापाजाऱ्यांना हाका मारता येत नव्हत्या .त्या धटिंगणना अडवता येत नव्हते. ते निघून गेल्यावर मी कशीबशी उठले आणि तुम्हाला फोन केला .शेजाऱ्याना हाका मारल्या. एवढे बोलून ती थांबली .तिचे हुंदके चालूच होते .मधून मधून ती गळा काढीत होती .
पोलिसांनाही तिला खुनी कोण ते माहित असेल,ती त्यांची नावे सांगेल,असे वाटत होते .तिला खुनी कोण ते माहीत नाही हे ऐकल्यावर पोलीस थोडे नाराजच झाले .त्यांना ही ओपन अँड शट केस असेल असे वाटत होते .
पोलिस आले. एवढी गडबड झाली. असे म्हटल्यावर शेजारपाजारची बरीच मंडळी जमली होती.त्यांना विचारता कुणीही दामोदरकडे आलेले गेलेले त्यांनी सकाळी पाहिले नव्हते.अर्थात सकाळची वेळ, दरवाजे बंद, घराघरात रंगोली चालू, त्यामुळे कुणाचे लक्ष नव्हते हा भाग वेगळा .तूतू मीमीचे उच्च स्वरातील आवाजही कुणीही ऐकले नव्हते.अर्थातच रंगोलीचे कारण होतेच .
दामोदरच्या डोक्यावर कपाळाच्या वरच्या बाजूला मोठा घाव पडला होता .त्यातून झालेल्या रक्तस्रावामुळे त्याचा चेहरा रक्ताने भरला होता .पडताना तो भिंतीवर मागे पडला होता .डोक्याच्या मागच्या बाजूनेही रक्तस्राव झाला होता .जमिनीवरही रक्ताचे थारोळे जमले होते .टीव्ही पाहात असताना हा सर्व प्रकार झाला होता.
पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन अहवालासाठी अम्ब्युलन्समधून पाठविण्यात आले .एखादा जाडजूड सोटा किंवा दगड डोक्यात मारला असावा असे वाटत होते . कवटी बहुधा फुटली असावी असे वाटत होते . रक्ताने भरलेले हत्यार घेऊन मारेकरी जाणे कठीण जवळजवळ अशक्य वाटत होते.
सोसायटीसमोर नळ फुटल्यामुळे चिखल झाला होता .त्यामध्ये कुठेही मोटारीचे किंवा कुठल्याही वाहनांचे ठसे दिसत नव्हते.मारेकरी वाहनातून आले व गेले असे सकृतदर्शनीतरी दिसत नव्हते .
त्यामुळेच पोलीस घरात, घराबाहेर, सोसायटीच्या प्रांगणात,सर्वत्र आसपास खुनी हत्याराचा कसोशीने शोध घेत होते .कुठेही खुनी हत्यार सापडले नाही.
पोलिसांना आता हेमांगीचा संशय येऊ लागला होता .ती रडण्याचे नाटक करीत आहे असे त्यांना वाटू लागले होते . पोलीस तिच्याकडे संशयाने पाहात होते.तसे पोलीस सर्वांकडेच संशयाने पाहतात.घरात सर्वत्र कसोशीने ते खुनी हत्याराचा शोध घेत होते.घरात खुनी हत्यार सापडलेच पाहिजे असे त्यांना वाटत होते.खुनी हत्यार कुठेही सापडत नसल्यामुळे हेमांगीवर आरोप करणे अशक्य होते .
या सर्व गडबडीने तिचा मुलगा केव्हांच जागा झाला होता.तो कावराबावरा होऊन कोपऱ्यात रडत बसला होता .
शेवटी पोलीस निघून गेले .बोलावताच पोलिस स्टेशनला तुम्हाला यावे लागेल असे सांगून ते गेले .
प्रेत पुढील संस्कारांसाठी केव्हा मिळेल असे एका शेजाऱ्याने विचारले .त्यावर साधारण चौवीस तास लागतील. पोस्टमार्टेम झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू असे पोलिसांनी सांगितले.
जो तो आपल्या कामाला निघून गेला .खुनी हत्यार सापडणे अशक्य होते हे फक्त हेमांगीलाच माहीत होते.
दामोदरजवळ कोणतीही तडजोड अशक्य आहे असे लक्षात आल्यावर हेमांगीने कठोर निश्चय केला होता. दामोदर तिला दुसरी जागा घेण्यासाठी पैसे देत नव्हता .तो तिला गॅस भांडीकुंडी काहीही नेऊ देत नव्हता. ब्लॉकमध्ये तिने गुंतवलेले पैसेही द्यायला तो तयार नव्हता .त्या बाईला सोडायलाही तो तयार नव्हता .आठ दिवसांत घरातून निघून जा असा अल्टिमेटम त्याने दिला होता .तिला आधार द्यायला तिचे जवळचे कुणी नातेवाईकही नव्हते .
तिच्यासमोर दामोदरला संपविण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता.
तिने एका पातेल्यात पाणी भरून ते फ्रिजमध्ये ठेवले होते .दुसऱ्या दिवशी त्याचा बर्फ तयार झाला .तो बर्फ बाहेर काढून तिने एका पंच्यात बांधला.तो पंचा बर्फा सकट पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवून दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने नेहमीप्रमाणे चहा केला .दामोदरने तिला तू घर केव्हां सोडणार असे विचारले. त्यावर तिने चार सहा दिवसांतच असे सांगितले .याशिवाय दुसरा काही उपाय नाही काय असे तिने निर्वाणीचे विचारले .त्यावर त्याने निश्चयाने कठोरपणे नाही म्हणून सांगितले.
ती शांतपणे किचनमध्ये गेली.मानसिक व शारीरिक बळ एकवटून तिने फ्रिजरमध्ये बर्फ बांधलेला पंचा काढला.
ते अनोखे हत्यार घेवून ती दामोदरच्या पुढ्यात उभी राहिली . दामोदर खुर्चीत बसून रंगोली पाहण्यात मग्न झाला होता . त्याचे हेमांगीकडे लक्ष नव्हते.तिने सर्व जोर एकवटून एकच घाव त्याच्या डोक्यात घातला.
* नंतर बर्फ बंबातील पाण्यात सोडला .*
*पंचा जळण्यासाठी बंबात टाकला.*
*बर्फाचे पाणी झाले.*
*पंचा जळून भस्मसात झाला.*
* खुनी हत्याराचा मागमूसही नव्हता*
*बंब आता तिचा जवळचा सखा झाला होता.*
*दामोदराच्या अाठवणीने तिला एक हुंदका आला. तो तिने तसाच दाबला.*
(समाप्त)
२/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन