प्रसन्न डॉ.जोशी यांच्या कॅबीन मध्ये टकटक करून आत शिरला.
“येस येस, प्रसन्न..प्लीज कम” डॉक्टर फोनवर बोलता बोलता प्रसन्नला म्हणाले.
आज प्रसन्न त्याच्या ऑफिसमधून १ तास अगोदर निघाला होता. तशी परमिशन मिळत नसे पण आज बॉसच्या खूपच हातपाय पडून तो डॉ. जोशींना भेटायला आला होता.
“मी करतो तुम्हाला फोन १० मिनिटांनी.. ओके...” डॉक्टर प्रसन्न आला म्हणून डॉक्टरांनी फोन ठेवला आता डॉक्टर गंभीर दिसत होते. त्यांनी त्यांच्या डेस्कच्या ड्रोवर मधून A4 साईजचा एक एन्व्हलप बाहेर काढला आणि टेबलवर ठेवला.
"प्रसन्न, तुमच्या पत्नीचे रिपोर्ट्स आले आहेत. माझा डाऊट खरा निघाला त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, त्यामुळेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि इतर समस्या आहेत. आता हि पहिलीच स्टेज आहे. मेडिकेशन आणि प्रीकोशन घेऊन कॅन्सर कंट्रोल मध्ये ठेवता येईल. पण तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल.
प्रसन्न हे ऐकून जागेवरच थिजल्यासारखा झाला. त्याचे नंदिनीवर खूपच प्रेम होतं. त्यांनी लग्न झाल्यावर ५ वर्ष प्लानिंग केलं होतं. या वर्षी त्यांचा स्वत:चा ब्लॉक डोंबिवलीत झाला होता. त्यामुळे आता त्यांना चान्स घ्यायचा होता. पण हे रिपोर्टबद्दल ऐकून जणू काही त्याची वाचाच गेली होती. मोठ्या कष्टाने त्याची जीभ बोलण्यासाठी उचलली.
"असं कसं होऊ शकतं डॉक्टर? नंदिनीने कधी सिगारेट किंवा दारूला हातसुद्धा लावला नाही."
"पण तुम्ही लावता, नाही का? जेव्हा सिगारेटचा धूर हवेत पसरतो, तेव्हा तो धूर आजूबाजूला श्वास घेत असलेल्या व्यक्तीवर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीइतकाच परिणाम होतो. किंबहुना दुष्परिणाम जास्त होतात. कारण त्यांची स्मोकिंग करायची इच्छाच नसते. आज जगभरात अनेक निष्पाप लोकं पॅसीव्ह स्मोकिंग मुळे आजारी पडतात. तुम्ही आता वेळ न गमावता उपचार सुरू केले पाहिजेत आणि हो, सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्ही धूम्रपान पूर्णपणे सोडा."
रिपोर्ट घेऊन प्रसन्न घरी निघाला. घरी जाताना लोकल ट्रेनच्या दारात उभा राहून तो प्रवास करत होता. दारात नेहमी भंकस करणारा प्रसन्न आज शून्यात लक्ष ठेवून होता. इतक्यात त्यांच्या बाजूने एक डीझेल इंजिनची मेल एक्स्प्रेस पास झाली तिच्या हॉर्नच्या आवाजाने तो भानावर आला. इंजीनने सोडलेल्या धुराच्या लोळामुळे त्याचा श्वास गुदमरला. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. नंदिनीचा निरागस चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर तरळत होता. त्याला आठवत होतं की तो जेव्हा जेव्हा कधी सिगरेट ओढायचा तेव्हा तेव्हा नंदिनीला ठसका लागायचा खोकला यायचा. कधी कधी ती नाराज होत असे तर कधी प्रेमाने त्याला सिगरेट पिण्यास मनाई करत असे पण तो कधीच तिचं ऐकत नसे.
प्रवासाच्या थकव्यापेक्षा आता अपराधी भावनेने अधिक खिन्न झाला होता. थकून, भागून पश्चातापाच्या अग्नीत होरपळून गेलेला प्रसन्न घरी पोहोचला तेव्हा नंदिनीने दार उघडलं. खोकून खोकून वेदनेने तिचा निरागस चेहरा कोमेजून गेला होता. प्रचंड त्रास होत असल्यामुळे तिने तिची नोकरी ३ महिन्यांपूर्वीच सोडली होती. दोघे आत गेले.
"आज इतका उशीर कसा काय झाला?"
प्रसन्न रडवेला झाला होता तो काहीच बोलला नाही. त्याने हलकेच तिचा हात धरला आणि तीला सोफ्यावर बसवले. तो तिच्या समोर खाली जमिनीवर बसला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागला.
"प्रसन्न? अरे काय झालं? रडतोस काय लहान मुलासारखा..."
नंदिनी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करून लागली. पण तिलाही रडू आवरेना. काही वेळानंतर प्रसन्न कसाबसा रडायचा थांबला.
"नंदिनी, तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी तुला वचन देतो.आजपासून मी स्मोकिंग पूर्णपणे सोडलं आहे...."
"खरंच....?.." नंदिनीच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हसू उमललं आणि गालावर आनंदाश्रू ओघळू लागले.
प्रसन्नने नंदिनीच्या कमरेला घट्ट मिठी मारली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मनातल्या मनात तो म्हणत होता...
"नंदिनी, तुला मी काहीही होऊ देणार नाही, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस."