दुसर्‍या दिवशी सकाळी दोघेहि मित्र शहरात भिक्षेला गेले.  सकाळच्या प्रहरी दोघालाहि थोठीशी पेज (यवागू) मिळाली.  एका धर्मशाळेत बसून त्यांनी ती पिऊन टाकली.  त्या प्रसंगी कनिष्ठाच्या मनात विचार आला की, सकाळी देणारा कोणी दायक नसावा; पण दुपारी खात्रीने चांगले जेवण देणारे कोणी तरी उपासक असतीलच.  परंतु दुपारीहि भिक्षाटनात फारसे स्वादु अन्न मिळाले नाही.  दोघांनीहि शहरातील एका धर्मशाळेत बसून भिक्षा ग्रहण केली; व दोघे पुन्हा स्तूपारानात येण्यास निघाले.

वाटेत कनिष्ठ म्हणाला, भदंत, सर्वकाल अशाच भिक्षेवर निर्वाह करता काय ?  ज्येष्ठ म्हणाला, 'माझा नित्याचा क्रम असाच चालला आहे.'  क.- तर मग तुम्ही प्राचीनखंडराजीला का येत नाही ?  तेथे राहण्याला एकांत आहे; व लोकही फार श्रद्धाळू आहेत.  एवढा संवाद झाल्यावर जेष्ठ भिक्षु अनुराधपुराचा मार्ग सोडून कुभकार प्रामाच्या मार्गाला लागला.  तेव्हा कनिष्ठ म्हणाला, 'आपण अनुराधपुराचा मार्ग सोडून या मार्गाने का जाता ?'  ज्ये. 'तू प्राचीनखंडराजी फार सुखावह आहे असे म्हणालास, तिकडे जाण्याचा हाच रस्ता आहे.'  क.-'भदंत, स्तूपारामांत तुमचे काही सामान-सुमान असेलच की नाही ?'  ज्ये.-'माझी एक खाट तेवढी माझ्या खोलीत आहे; पण ती माझी स्वतःची नसून संघाची आहे.  रोज भिक्षेला निघण्यापूर्वी ती मी व्यवस्थितपणे ठेवीत असतोच.  तेव्हा विहारात जाऊन करण्यासारखे काही राहिले नाही.'  क.-'पण भदंत, माझी हातातील काठी, वहाणाची पिशवी व तेलाची बाटली,* विहारातच राहिली आहे.'  ज्ये.-'वाः तू तर एका रात्रीत एवढे पदार्थ विहारात ठेवलेस !'  कनिष्ठ फारच शरमला; व ज्येष्ठाला नमस्कार करून म्हणाला, 'आपणाला प्राचीनखंडराजीला जाण्याची गरज नाही, स्तूपारामासारख्या ठिकाणीहिआपणाला एकांतच आहे याशिवाय येथे अनेक धर्मोपदेशकांचा धर्मोपदेश ऐकण्यास मिळतो हा विशेष फायदा आहे.'  दुसर्‍या दिवशी आपले पात्रचांवर घेऊन कनिष्ठ भिक्षु तेथून निघून गेला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  ही बहुधा वेळूच्या नळकाड्यांची बनवीत असत.  तिच्यात तेल भरून ते पायाला चोळण्यासाठी भिक्षु बरोबर ठेवीत असत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तात्पर्य वर सांगितलेले निरनिराळे अभास सर्वांनाच बाधक होतात असे नाही.  ज्याने त्याने एकेका ठिकाणी दोन तीन दिवस राहून अनुभव घेऊन पाहावा.  वनप्पत्थसुत्तांत म्हटले आहे की, जेथे चित्ताची समाधी मिळत नाही आणि जेथे खाण्यापिण्याचेही हाल होतात, त्या ठिकाणी योग्याने क्षणमात्रहि राहू नये; जेथे खाण्यापिण्याला यथेच्छ मिळते पण चित्ताला समाधी मिळत नाही तेथेही राहू नये; जेथे खाण्यापिण्याचे हाल होतात पण चित्ताची समाधी यथेच्छ मिळते तेथे शारीरिक कष्टांची पर्वा न करता रहावे; जेथे समाधीही मिळते आणि खाण्यापिण्याचेही हाल होत नाहीत ती जागा योगाभ्यासाला सर्वात उत्कृष्ट समजावी.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  हे सुत्त मज्झिमनिकाया (१७) आहे.  याचा सारांश मात्र येथे दिला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता आपण मूळच्या गाथेकडे वळू.  त्यात कुल हा दुसरा प्रतिबन्ध म्हटला आहे.  कुल म्हणजे गृहस्थाचे आईबाप, भाऊबन्द वगैरे, भिक्षूचे विहारांत आचार्य, उपाध्याय, सहाध्यायी वगैरे व पूर्वाश्रमांतील आईबाप, भाऊ आणि बहिणी यांपैकी कोणी आजारी झाला किंवा कोणाचे काही विशेष काम असले तर त्यामुळे समान सुखदुःखी माणसाला उपद्रव पोचतो व समाधी मिळत नाही.  हाही प्रतिबंध सर्वांनाच होतो असे नाही.  जनक किंवा अशोक यांसारखे पराक्रमी राजेही प्रपंचात राहून मुक्त असत; आणि काही भिक्षू, घर छोडकर मठ बनाया कहता मै बैरागी या कबीराच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या विहारादिक निवासस्थानात बद्ध होऊन राहतात.  एका भिखूच्या निरपेक्षतेची गोष्ट विशुद्धिमार्गात दिली आहे, ती येथे देणे अप्रासंगिक होणार नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel