'' (६) आणखी तो स्मशानभूमीत एक, दोन किंवा तीन दिवस पडलेले सुजलेले प्रेत, किंवा नीलवर्ण झालेले प्रेत, किंवा पूं उत्पन्न झालेले प्रेत... कांवळे, गिधाड, कोल्हे किंवा असेच अन्य प्राणी ज्याचे लचके तोडून खात आहेत असे प्रेत... हाडांचा सांगाडा मांसाने आणि रक्ताने माखलेला, किंवा नीव्वळ हाडांचा सांगाडा, किंवा हाडे इतस्ततः पसरलेली... किंवा एक वर्ष होऊन गेलेली चूर्णविचूर्ण झालेली हाडे पाहतो, आणि असा विचार करतो की, हे जे शरीराचे भिन्न भिन्न विकार यांपासून माझे शरीर मुक्त नाही.  त्याचीहि हीच गत होणार आहे.  या प्रमाणे सावधपणे आणि लक्षपूर्वक वागत असता त्याचे प्रपंचाकडे धावणारे संकल्प नष्ट होतात व चित्त एकाग्र होते.''

येथे एकंदर सहा कलमे आहेत, पैकी शेवटच्या कलमात सर्व अशुभाचा समावेश केला आहे; त्यासाठी निराळी कलमे केली नाहीत.  पहिल्या कलमात आनापानास्मृति सांगितली आहे.  ती एवढ्याचसाठी की, तेवढी एकाग्रता तरी कायगतास्मृतीला जरूर आहे.  बाहेरच्या पदार्थाकडे धावणार्‍या ज्ञानेन्द्रियांना आवरून जर अंतर्मुख करावयाचे असेल, तर प्रथमतः आश्वासप्रश्वासाचे आकलन केले पाहिजे, हाच त्या कलमांचा अर्थ आहे.  जाता येताना, उभा असता, बसला असता, किंवा बिछान्यावर पडला असता शरीराचे प्रत्यवेक्षण करणे आणि सर्व शारीरिक क्रियांत सावधपणे वागणे हा दुसर्‍या आणि तिसर्‍या कलमाचा सारांश आहे.  अशा रीतीने वागल्याने कायगतास्मृतीलाच नव्हे तर इतर सर्व कमस्थानाला फारच मदत होते.  रस्त्यांतून जात असताना काही लोक आपणाशीच बोलत असतात, काही हातचाळे करतात, व काही भ्रांत मृगाप्रमाणे इतस्ततः पहात राहतात.  या सर्वांचे चित्त समाधीपासून फारफार दूर आहे असे समजावे; आणि अशा अव्यापारेषु व्यापारांपासून आपण मुक्त होऊन आपल्या शारीरिक क्रियांवर आपणाला पूर्ण ताबा मिळवता यावा यासाठी नेहमी काळजी घ्यावी.

कायगतास्मृतीचे खरे विधान चवथ्या कलमात आहे.  केशलोमादिक एकतीस पदार्थांत डोक्यांतील मेंदूची भर घातली म्हणजे ते बत्तीस होतात.  ते पृथक करून आपल्या डोळ्यांसमोर आणता येऊ लागले म्हणजे कायगतास्मृति साध्य होत चालली असे समजावे.  हे सर्व पदार्थ डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्‍न केल्याने ज्यांचे चित्त विक्षिप्‍त होत असेल, त्याने तसे न करता जो भाग डोळ्यांसमोर येईल त्यावरच आपले चित्त स्थिर करावे.  एखाद्याला केशांपासून त्वचेपर्यंत पाच पदार्थांचा भाग शरीरापासून भिन्न होऊन उकिरड्यावर पडलेला स्पष्ट दिसत असला तर त्याने त्याच भागावर चित्त स्थिर करावे, दुसर्‍याला मांसाचा भाग, आतड्यांचा भाग, किंवा निव्वळ हाडांचा सांगाडा दिसत असला, तर त्याने त्याच भागावर ध्यान करावे, बाकी विभागांचा विचार करू नये.

पाचव्या कलमांत सांगितलेले शरीराचे चार विभाग चतुधातुवत्थान या कर्मस्थानाखाली येतात.  ते कायगतास्मृतीला साधक आहेत एवढ्याचसाठी येथे दिले आहेत.  सहाव्या कलमांत दहा अशुभांचा समावेश झाला आहे.  त्यांचा उपयोग असा होतो की, मेलेल्या प्रेताचा तो तो भाग पाहून तोच आपल्या शरीरात आहे अशा रीतीने ध्यान करणे सुलभ जाते.  यासाठी स्मशानातच जावयास पाहिजे असे नाही.  सध्याच्या काळी हॉस्पिटलसारख्या ठिकाणी जेथे प्रेते चिरण्यात येतात तेथे जाऊन, जो भाग पाहिला असता आपणाला विशेष वैराग्य उत्पन्न होईल, त्या भागाचे नीट अवलोकन करून परत आपल्या निवासस्थानात येऊन, तोच भाग आपल्या शरीरात आहे, याचे अंतर्दृष्टीने अवलोकन करावे.  यात एवढीच खबरदारी घेतली पाहिजे की, कायगतास्मृतीला आरंभ करणार्‍या व्यक्तीने विसदृश प्रेत पाहू नये स्त्रीला पुरुषांचे व पुरुषाला स्त्रीचे प्रेत विसदृश होय.  तेव्हा पुरुषाने पुरुषाचेच प्रेत पहावे, आणि स्त्रीने स्त्रीचेच प्रेत पहावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel