प्रस्तावना (धर्मानंद कोसंबी)

पालिवाङ्मयातील त्रिपिटक या मुख्य ग्रंथाचे सुत्त, विनय आणि अभिभस्म असे तीन भाग आहेत. सुत्तपिटकांत बुद्धाचा आणि त्याच्या प्रमुख शिष्यांचा उपदेश व धर्मपर संवाद संग्रहित केला आहे; विनयपिटकांत भिक्षूंच्या आचारविचारांचा व तत्संबंधी कथांचा विस्ताराने उल्लेख आहे; आणि अभिधम्मपिटकांत बौद्धधर्माच्या मुख्य तत्त्वांचा त्या कालच्या तात्त्विकपद्धतीने विचार केला आहे. अभिधम्म पिटकांत प्रत्यक्ष बुद्धाने उपदेशिलेला भाग मुळीच नाही असे म्हटले असता चालेल, व सुत्त आणि विनय पिटक यातून देखील बुद्धाच्या शिष्यांनी रचलेले बरेच भाग आहेत; तथापि प्राधान्येकरून बुद्धाचा उपदेश किंवा आज्ञा यांचाच या ग्रंथांत संग्रह झाला असल्यामुळे यातील मजकुराला कात्यायनासारख्या पालिव्याकरणकारांनी ‘बुद्धवचन’असेच म्हटले आहे. अर्थात, ज्याला बुद्धासंबंधाने विस्तृत माहिती मिळवावयाची असेल, त्याने जवळजवळ सगळ्या त्रिपिटकाचे अवलोकन करणे योग्य आणि आवश्यक आहे.

याशिवाय पालिवाङमयात बुद्धघोषासारख्या आचार्यांनी लिहिलेल्या अट्ठकथा त्रिपिटकाच्या खालोखाल महत्त्वाच्या आहेत. त्रिपिटकाच्या अर्थासहित कथा म्हणून यांना अट्ठकथा असे म्हणतात. एखाद्या वाक्याचे किंवा श्लोकाचे विशेष महत्त्व असल्यास त्याचा अर्थ देऊन शिवाय त्यासंबंधाने प्रचलित असलेली एखादी कथा दिलेली या अट्ठकथांतून आढळते. यापैकी पुष्कळशा कथा अर्थातच दन्तकथा आहेत. तथापि काहींचे महत्त्व फार असल्यामुळे बुद्धाच्या चरित्राला पोषक अशा पुष्कळ गोष्टी या अट्ठकथांवरून घेता येण्यासारख्या आहेत.

पण या सर्व वाङमयाचे मराठीत रूपांतर करण्याचा अवाढव्य प्रयत्न आरंभिणे सांप्रतच्या परिस्थितीत शक्य नसल्यामुळे, त्रिपिटक आणि त्याच्या अट्ठकथा यापैकी जो मजकूर मला बुद्धाच्या चरित्रासंबंधाने विशेष महत्त्वाचा वाटला, तो संग्रहित करून ‘बुद्धलीलासारसंग्रह’या नावाने महाराष्ट्रीय वाचकांसमोर मांडण्याचा हा मी अल्प प्रयत्न केला आहे. यात माझ्या पदरचे विशेष काही नाही. केवळ ‘त्रिपिटक’आणि ‘अट्ठकथा’यातील उपयुक्त कथानकाचे सार काढून ते यथामति योग्य ठिकाणी घातले आहे. मघाच्या गोष्टीचा मात्र थोडासा विस्तार केला आहे.

पहिल्या भागातील आठ गोष्टी जातकअट्ठकथेवरून घेतल्या आहेत. दुसर्‍या भागातील पंधरा गोष्टींपैकी १-४ जातक अट्ठकथेवरून घेतल्या असून १०, १२, १३ आणि १५ या धम्मपदअट्ठकथेवरून घेतल्या आहेत. बाकीच्या सर्व विनयग्रंथांवरून (महावग्ग आणि चुल्लवग्ग यांवरून) घेतल्या आहेत. तेरावी गोष्ट सुत्तपिटकातील उदानवग्ग या प्रकरणांतहि सापडते. पहिली चार प्रकरणे जरी जातकअट्ठकथेवरून घेतली आहेत, तरी मधूनमधून सुत्तपिटकांतील काही सुत्तांच्या आधाराने त्यात फेरफार करण्यात आला आहे. १२९-१३० पानांवरील पाच मानसिक शक्तीसंबंधाने जे विवेचन आले आहे, ते विशुद्धिमार्गाच्या आधाराने केले आहे. शेवटला उपसंहार तेवढा मात्र मी स्वतंत्रपणे लिहिला आहे. तिसर्‍या भागांतील सर्व मजकूर सुत्तपिटकावरून घेतला आहे. या प्रस्तावनेच्या शेवटी दिलेल्या यादीवरून कोणता मजकूर कोणत्या सुत्ताच्या आधाराने घेतला आहे, ते स्पष्ट कळून येईल.

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन करण्याचा उद्देश असल्यामुळे या ग्रंथांतील गोष्टींची मी ऐतिहासिकदृष्ट्या छाननी केली नाही. डॉ. ओल्डेनबर्ग यांच्या ‘बुद्धचरित्रा’च्या किंवा प्रसिद्ध फ्रेंच ग्रंथकार रेनाँ यांच्या ‘ख्रिस्तचरित्रा’च्या धर्तीवर हा ग्रंथ लिहिला नाही, आणि म्हणूनच याला ‘बुद्धचरित्र’हे नाव न देता ‘बुद्धलीलासारसंग्रह’असे पौराणिक पद्धतीचे नाव दिले आहे. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.

या पुस्तकातील टीपांतून ज्या काही पालिगाथा छापण्यात आल्या आहेत, त्यात क्वचित अशुद्धे राहिली आहेत. पालिविद्यार्थ्यांना हे दोष सहज कळून येण्यासारखे असून मराठी वाचकांना त्यांच्या शुद्धिकरणापासून विशेष फायदा होईलसे वाटत नसल्यामुळे शुद्धिपत्र देण्याचा प्रयत्न केला नाही, याबद्दल सुज्ञ वाचक क्षमा करतील अशी आशा आहे.

आरण्यक कुटी,
पुणे, ता. १० मार्च, १९१४
ध. कोसंबी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ सरकारने नेमलेल्या व्हर्न्याक्युलर टेक्स्ट बुक रिव्हिजनसारख्या विद्वन्मंडलामध्ये देखील बौद्धधर्मासंबंधाने किती भ्रामक समजूत आहे, हे पहावयाचे असल्यास मराठी सातव्या पुस्तकातील ‘बौद्ध धर्म व त्याचे पुरस्कर्ते’हा धडा वाचावा. त्यावरून असा भास होतो, की ‘सद्धर्म पुंडरीक’हाच काय तो बौद्धांचा पवित्र ग्रंथ असावा, परंतु ‘सद्धर्म-पुंडरीक’हा मूल ग्रंथ नसून महायान पंथाच्या लोकांनीं लिहिलेला एक ग्रंथ आहे. प्रो. मॅक्स-मुल्लर यांचे गुरु प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ (Burnouf) यांनीं ‘सद्धर्मपुंडरीका’चें बर्‍याच वर्षांपूर्वी फ्रेंच भाषेंत भाषांतर केलें असल्यामुळें तोच ग्रंथ बौद्धांचा पवित्र ग्रंथ असावा, अशी बुकटेक्स्ट कमिटीची चुकीची समजूत झाली असावी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel