प्रस्तावना (लक्ष्मण शास्त्री)

बोधिसत्त्व धर्मानंद कोसंबी यांची जन्मशताब्दी गतवर्षी (१९७६) पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने धर्मानंदांची, मराठीतील एखादे वगळून, सर्व पुस्तके पुन्हा प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाप्रमाणे‘बुद्धलीलासारसंग्रह’हे पुस्तक प्रसिद्ध करण्यास आम्हांस आनंद व धन्यता वाटते.

ज्ञानमय तपश्चर्या धर्मानंदांनी अखंडपणे केली. या तपश्चर्येतून जी ग्रंथसंपदा निर्माण झाली, त्यातील हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सांगण्यावरून बडोदे येथे बौद्ध धर्मावर धर्मानंद कोसंबी यांनी जी व्याख्याने दिली, त्यांचे पुस्तक लगेच‘बुद्ध, धर्म आणि संघ’या नावाने प्रसिद्ध झाले. कोसंबी गुजरात विद्यापीठात अध्यापन करीत होते, तेव्हा ‘समाधिमार्ग’(१९२५) व‘बौद्ध संघाचा परिचय’(१९२६) ही पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यानंतर वाराणशी येथील काशी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत असता त्यांचे ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’(१९३५) या पुस्तकाचे प्रकाशन झाले.‘विसुद्धिमग्ग’या पाली भाषेतील पुस्तकाचे संशोधनपूर्वक पाठ निश्चित करून त्याचे संस्करण‘भारतीय विद्याभवन’(मुंबई) या संस्थेने नागरी लिपीत प्रसिद्ध केले. त्यानंतर धर्मानंदांनी संस्कृत व पाली भाषेतील आणि त्याचप्रमाणे मागधी अथवा अर्धमागधी भाषेतील बौद्ध व जैन साहित्याचे मंथन करून‘भगवान बुद्ध’हा ग्रंथ (१९४०) नागपूर येथील नवभारत ग्रंथमालेत प्रसिद्ध केला. धर्मानंदांनी वरील ग्रंथसंपत्ती निर्माण करीत असता १९२४ साली १८७६ पासून १९२३ पर्यंतचा म्हणजे पूर्वायुष्याचा वृत्तांत‘निवेदन’या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. आपल्या उत्तरायुष्याचा वृत्तांतही त्यांनी मुंबईच्या‘प्रकाश’या नियतकालिकात ‘खुलासा’या सदराखाली लिहून क्रमश: प्रसिद्ध केला. गतवर्षी त्यांचे‘निवेदन’हे आत्मचरित्र आणि त्यांचे समग्र चरित्र, श्री. ज. स. सुखठणकर यांनी लिहिलेले, मुंबई येथील‘धि गोवा हिंदु असोसिएशन’या संस्थेने प्रसिद्ध केले आहे.

बुद्धावर व बौद्ध धर्मावर धर्मानंदांची नितांत श्रद्धा होती; परंतु ही श्रद्धा डोळस होती. या श्रद्धेमुळेच अगणित हालअपेष्टा सोसून परदेशात राहून त्यांनी बौद्ध धर्माचे व साहित्याचे अध्ययन केले. भगवान बुद्ध व बुद्ध धर्म २,६०० वर्षांपूर्वी भारतात अवतरला. इ.स.च्या आठव्या शतकापर्यंत हा धर्म भारतात नांदत होता आणि पहिल्या दीड हजार वर्षांत या धर्माने अर्ध्या जगावर प्रभाव गाजविला. नवव्या शतकापासून भारतातून या धर्माची पिछेहाट होत गेली आणि भारताच्या ईशान्य कोपर्‍यात व काही हिमालयीन प्रदेशातच तो मुमुर्षू स्थितीत अवनत अवशेषांच्या स्वरूपात शिल्लक राहिला होता. १८९० पर्यंत भारतात या धर्माचा एकही विद्वान नव्हता. धर्मानंदांनी बौद्ध धर्माच्या अध्ययनार्थ निष्कांचन स्थितीत गृहत्याग केला; भारताच्या कानाकोपर्‍यात व सर्वत्र पर्यटन केले आणि अखेरीस श्रीलंकेत त्यांना या धर्माचे पंडित भेटले. कोलंबो शहराजवळ असलेल्या‘विद्योदय विद्यालय’नावाच्या विहारात भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमंगलाचार्य यांच्या हाताखाली पाली ग्रंथाचा अभ्यास केला. नंतर ते ब्रह्मदेशात गेले. तेथील विहारात राहून ध्यानमार्गाचा अभ्यास केला. तेथील पंडितांच्या चरणापाशी बसून बौद्ध साहित्याचे पाठ घेऊन अध्ययन केले. परिनिष्ठित पंडित बनून परत आले व भारतातून परागंदा झालेल्या बौद्ध धर्माच्या महाविद्येची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर, भारतामध्ये बौद्ध विद्येच्या अध्ययनाला व संशोधनाला उजाळा मिळाला. धर्मानंदांच्या अध्यापकत्वाच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे पुष्कळ विद्वान तयार झाले. कै. चिं. वै. राजवाडे, डॉ. पु. वि. बापट, कै. चिंतामणराव जोशी, प्रा. ना. के. भागवत इत्यादी मंडळी त्यांच्या शिष्यमालिकेतील चमकदार रत्ने होत. धर्मानंदांनी कलकत्ता विद्यापीठात प्रथम अध्यापकाची जागा पतकरली. तेथे ते फार वेळ राहिले नाहीत. महाराष्ट्रात बौद्ध विद्येचा प्रसार करण्याची उत्कट इच्छा झाल्यामुळे त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेऊन लहानशी शिष्यवृत्ती मिळविली व महाराष्ट्रात अध्यापन सुरू केले. मुंबई विद्यापीठात पाली भाषेचा प्रवेश करविला. अमेरिका, रशिया इत्यादी देशांतील विद्वानांची आणि विद्यापीठांची आमंत्रणे तरीही सारखी येत होती व त्याप्रमाणे ते तिकडे जाऊन काही महिने वा एखादे वर्ष राहून पुन्हा स्वदेशी परत येत असत. महाराष्ट्रात व गुजरातमध्ये ते दीर्घकाल राहिले. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी सहा वर्षे प्राध्यापकाचे काम केले. परदेशात असताना विशेषत: अमेरिकेत असताना समाजसत्तावादाचे अध्ययन केले. समाजसत्तावादाची उद्दिष्टे मान्य केली. मार्क्सवाद हा समाजसत्तावादाचा एक श्रेष्ठ आधार होय; परंतु मार्क्सवादातील हिंसात्मक क्रांतिवाद त्यांना मान्य झाला नाही. मार्क्सवादाचा मानवतावाद मात्र त्यांनी आत्मसात केला. त्यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की,‘जगातील श्रमजीवी वर्गाने प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही; परंतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा?’भगवान बुद्ध व जैन तीर्थंकर आणि त्याचप्रमाणे गांधीवाद यांच्या योगाने त्यांचे चित्त पूर्ण भारावून गेले होते. त्यामुळे ते असे म्हणत की,‘राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याला याच्याशिवया दुसरा मार्ग कोणताही असू शकत नाही.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel