सीवली राजकुमारींनें महाजनकाला दोनतीनदां बोलावणें पाठविलें. परंतु महाजनकानें जरुरीच्या कामांत गुंतल्याचें मिष करून तो तिच्या वाड्यामध्यें गेला नाहीं. शेवटीं तिच्या अत्याग्रहामुळें तो तिला भेटावयाला गेला. त्याचें धीरोदात्त वर्तन पाहून सीवली त्याजवर अतिशय प्रसन्न झाली. कांहीं कालानें सीवलींचे महाजनकाबरोबर लग्न झालें. त्यांनां दीर्घायु नांवाचा एक पुत्र झाला. तो वयांत आल्यावर महाजनकानें त्याला युवराजपद दिलें. जनकराजानें आपल्या प्रधानमंडळाच्या साहाय्यानें राज्यकारभार इतका उत्तम चालविला होता, कीं, आसपासच्या प्रजाहितदक्ष राजेलोकांनां जनकराजा गुरूप्रमाणें होऊन राहिला. जनकाच्या राज्यांतीलच नव्हते, परंतु इतर राज्यांतील देखील अनेक विद्वान् भाविक लोक जनकराजाची कीर्ति ऐकून त्याची भेट घेण्यास मिथिलेला येत असत.

एके दिवशीं जनकराजा उद्यानक्रीडेला चालला असतां त्यानें फलभारानें विनम्र झालेला एक आम्रवृक्ष पाहिला. राजाला त्याचें एक फळ खाण्याची इच्छा झाली, व त्यानें एका सेवकाला एक पिकलेला आंबा तोडून आणण्यास आज्ञा केली. सेवकानें तोडून आणलेला आंबा राजाला फारच आवडला, आणि त्या झाडाला वाखाणून तो पुढें गेला. राजाला या झाडाचें फळ आवडलें असें समजल्याबरोबर लोकांच्या झुंडींच्या झुंडी त्यावर पडल्या, व त्यांनीं तेथें एक देखील फळ राहूं दिलें नाहीं. जनकराजानें उद्यानांतून परत येतांना पुन: त्या वृक्षाकडे पाहिलें. पण त्याला त्यावर एकदेखील फळ आढळलें नाहीं! इतक्यांत असा फरक कां झाला, असें जनकानें आपल्या लोकांनां विचारिलें. तेव्हां त्यांनीं सांगितलें, कीं, महाराजांनीं या झाडाची वाखाणणी केल्यामुळें लोकांनीं त्याचीं कच्चीं फळें देखील तोडून खाल्लीं! राजाला त्या झाडाची स्थिति पाहून उद्वेग उत्पन्न झाला. तो आपणाशींच म्हणाला "अरेरे! काय ही संपत्तीची क्षणभंगुरता! मी जात असतांना हा वृक्ष फलांनीं संपन्न होता; पण आतां पहातों तों त्याजवर एकदेखील फळ दिसत नाहीं! इहलोकींच्या धनदौलतीची ही अशी स्थिति आहे! एकादा मनुष्य मोठ्या श्रमानें शीत, उष्ण, वारा इत्यादिकांनां सहन करून धन मिळवितो; परंतु अल्पकालांतच तें त्याच्यापासून चोर किंवा अन्यायी राजे हरण करतात. बरें, आमची राजसंपत्ति तरी दृढ आहे काय? माझ्या पित्यानें आपल्या भावालादेखील हा राजसंपत्तीला विघ्न करील या भीतीनें कारागृहांत टाकिलें. परंतु तोच माझ्या बापाच्या मरणाला कारण झाला. अशी ही राज्यलक्ष्मी चंचल असतां मी तिला केवळ वश होऊन राहिलों आहें!"

जनकराजा उद्यानांतून आपल्या राजधानीला गेला; परंतु त्याला राजवाड्यांतील सर्व सुखें तुच्छ वाटूं लागलीं. त्यानें दोन नोकरांशिवाय इतरांनां आपल्या महालांत येण्याची मनाई केली, व एकांतामध्यें तो परमार्थाचें चिंतन करू लागला. तीन महिने या रीतीनें घालविल्यावर एके दिवशीं तो आपणाशींच म्हणाला "आपल्या प्रजाजनांच्या उपयोगीं न पडतां त्यांचें अन्न मात्र मी खात आहें. या राजवाड्यांतील कारागृहवासामुळें माझ्या मनाला सुख कसें होईल? हिमालय पर्वतावर जाऊन पुण्यवान् ऋषिमुनींच्या आश्रमामध्यें राहण्याचा सुदिन कधीं उगवेल?"

राजाची अरण्यवासाची उत्कंठा इतकी वृद्धिंगत झाली, कीं, एके दिवशीं काषायवस्त्रे परिधान करून तो राजवाड्यांतून बाहेर पडला, व जवळच्या एका उद्यानांत जाऊन एका झाडाखालीं राहिला.

सीवलीदेवीला राजानें संन्यास घेतला हें ऐकून अत्यंत दु:ख झालें. आपल्या दासीगणासहवर्तमान तो बसला होता तेथें जाऊन तिनें त्याची नाना रीतींनीं विनवणी केली; परंतु ती रतिभर देखील राजाचें मन वळवूं शकली नाहीं. तेव्हां तिनें राजाचें मन वळविण्याची एक युक्ति योजिली. आपल्या नोकरांनां पाठवून मिथिलेंतील मोडक्यातोडक्या घरांनां तिनें आग लावण्यास सांगितलें, आणि तीं घरें जळत असतां ती राजाला म्हणाली म्हणाली "महाराज, आपण ज्या मिथिलेची अभिवृद्धि केली, तिची आपण तेथून निघाल्याबरोबर कशी दुर्दशा चालली आहे ती पहा! तुमची ही आवडती नगरी अराजक झाल्यामुळें तिचा अग्नीनें नाश होत आहे! तुम्ही कमावलेल्या सर्व धनाचा या अग्निप्रलयामध्यें नाश होईल; म्हणून महाराज, लवकर मागें फिरून या नगरीचें रक्षण करा!"

राजा म्हणाला "देवी, आतां पूर्वीचा जनक राहिला नाहीं. माझ्या मनानें पूर्ण वैराग्य धारण केलें आहे. सर्व मिथिला जरी जळून भस्म झाली, तरी माझें हें नवीन धन नष्ट होणार नाहीं!"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel