वैदेह राजाच्या अंगीं आपल्या शत्रूचा पराभव करण्याचें सामर्थ्य नव्हतें. त्यानें आपल्या प्रधानांनां बोलावून पुढें काय करावें, यासंबंधानें मसलत विचारली. सर्वांचें म्हणणें असें पडलें, कीं, ब्रह्मदत्तापुढें आपलें कांहीं एक चालावयाचें नाहीं; परंतु बोधिसत्वानें राजाला धीर दिला. तो म्हणाला "महाराज, आपण घाबरूं नये. चूलनिब्रह्मदत्त लवकरच आमच्या राज्यांतून पळून जाईल!"

हें ऐकून राजानें सर्व भार बोधिसत्वावर टाकिला.

बोधिसत्वानें मिथिलेमध्यें कडेकोट बंदोबस्त चालविला. शहरांतील सर्व लोकांनां तीनचार वर्षें पुरेल एवढी सामग्री निरनिराळ्या कोठारांतून सांठविली; मिथिलेभोंवतीं जो तट होता त्याची दुरुस्ती केली; आणि जागोजागीं शहराच्या रक्षणासाठीं निवडक फौज ठेविली.

ब्रह्मदत्तानें विदेहाचीं लहानसान गांवें काबीज करण्याच्या नादाला न लागतां एकदम मिथिलेवर स्वारी केली, व मिथिलेला वेढा दिला. केवट्टाचें असें म्हणणें होतें, कीं, मिथिलेंतील लोकांशीं लढाई करून आपल्या फौजेचा नाश करण्यांत कांहीं अर्थ नाहीं. शहरांतील धान्यसंचय संपल्याबरोबर तो आपोआप आपल्या हातीं येतील. तेव्हां ब्रह्मदत्ताचें सर्व सैन्य मिथिलेच्या आसपास तळ देऊन बसलें. बरेच महिने गेले, परंतु मिथिलेंतील अन्नसामग्री संपण्याचें चिन्ह दिसेना.

ब्रह्मदत्तानें तीन वर्षेपर्यंत वेढा दिला असता, तरी मिथिलेंतील लोकांवर उपाशी मरण्याची पाळी आली नसती; परंतु वैदेह राजाला ब्रह्मदत्ताच्या धास्तीमुळें झोंप येईनाशी झाली. बोधिसत्वाला बोलावून आणून तो म्हणाला "हे पंडित, तूं माझ्या शहराचा चांगला बंदोबस्त केलास, याबद्दल मला फार आनंद होत आहे. परंतु या ब्रह्मदत्ताच्या समुद्रासारख्या सेनेकडे नजर फेंकिली असतां माझ्या छातींत धडकीच भरते. मला आतांशा झोंप कशी ती मुळींच येत नाहीं."

बोधिसत्व म्हणाला "महाराज, ब्रह्मदत्ताला येथून हांकून लावण्याच्याच प्रयत्नांत मी आहें. पण प्रयत्नाला यश येण्यास कांहीं काळ लागतो. झाडाचें बीं पेरून दुसर्‍याच दिवशीं फळाची अपेक्षा करणें योग्य नाहीं. माझ्या प्रयत्नांला लवकरच यश येईल, अशी माझी खात्री आहे. तोंपर्यंत आपण न डगमगतां निश्चिंत असावें."

अनुकेवट्ट नांवाचा महौषधाचा एक मित्र होता. तो नगराच्या प्राकारावरून मेवामिठाई ब्रह्मदत्ताच्या लोकांजवळ फेंकीत असे, व त्यांनां म्हणे, कीं, तुम्ही इतक्यात वेढा उठवूं नका. वैदेह राजा त्या मूर्ख महौषधासहवर्तमान लवकरच तुम्हांला शरण येईल! शहरांतील दाणागोटा संपत आला आहे!"

अनुकेवट्टाचें हें भाषण एके दिवशीं वैदेह राजाच्या शिपायांनीं ऐकिलें. त्यांनीं त्याला धरून महौषधासमोर नेलें. महौषधानें त्याची धिंड काढून त्याला शहरांतून हांकून लावण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणें त्याचे सात पाट काढण्यांत येऊन त्याला शहारांतून हांकून देण्यांत आलें. तो ब्रह्मदत्तराजाच्या शिपायांजवळ जाऊन म्हणाला "तुम्हांला मदत केल्याचें हे फळ आहे. त्या दुष्ट शेतकर्‍याच्या पोरानें- महौषधानें- माझी ही कोण दुर्दशा केली आहे पहा!"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel