ब्रह्मदत्ताच्या शिपायांनीं त्याला आपल्या राजाजवळ नेलें. त्याची सर्व हकीगत ऐकून घेतल्यावर ब्रह्मदत्त मोठ्या आनंदानें म्हणाला "महौषधानें तुझी अशी फजिती केल्याबद्दल वाईट वाटूं देऊं नकोस. मी तुला माझ्या राज्यांत मोठ्या पदवीला चढवीन. तूं माझ्याजवळ रहा."

ब्रह्मदत्तराजाचा अनुकेवट्टावर हळूहळू पूर्ण विश्वास बसला.

इकडे बोधिसत्वानें राजाच्या कोठारांतील निवडक वस्त्रें आणि अलंकार काढून त्यावर आपला शिक्का मारला, व तीं ब्रह्मदत्ताच्या सैन्यांत विकावयाला पाठविलीं. तीं पाहून ब्रह्मदत्ताच्या सरदारांनां व मानकर्‍यांनां अत्यंत लोभ सुटला. ते बोधिसत्वानें पाठविलेल्या व्यापार्‍यांनां म्हणाले "तुम्हीं हे जिन्नस येथें विकण्यासाठी कां आणिले आहेत?"

व्यापारी म्हणाले "मिथिलेमध्यें सध्या उपासमार चालली आहे. तेथें यांतील एकादें वस्त्र किंवा एकादा दागिना दिला, तरी एका दिवसाला एकट्या माणसाला पुरेल एवढी अन्नसामग्री मिळावयाची नाहीं. तुम्ही तुमच्या राजाला नकळत थोडेंसें धान्य मिथिलेमध्यें नेण्यास परवानगी द्याल, तर आम्ही हे सर्व जिन्नस तुम्हांला देऊन टाकूं."

ब्रह्मदत्ताच्या मानकर्‍यांनीं आणि सरदारांनीं असा विचार केला, कीं, "एवढे अमोलिक जिन्नस आम्हांला देऊन यांनीं दोन दिवसांला पुरेल एवढी बेगमी शहरांत नेली असतां आमच्या राजाचें त्यापासून कांहींच अहित होण्यासारखें नाहीं. फार झालें, तर आम्हांला दोन दिवस जास्त लागतील. आणखी दोन दिवस वेढा देऊन बसलों, म्हणजे हे लोक आपोआपच शरण येतील." तेव्हां थोडेंसें धान्य मोबदला देऊन त्या व्यापार्‍यांपासून त्यांनीं ते जिन्नस खरेदी केले, व सर्वांनीं आपापसांत वांटून घेतले.

ब्रह्मदत्तराजा एके दिवशीं एकांतांत अनुकेवट्टाला म्हणाला "मिथिलेमध्यें अन्न मिळण्याची पंचाईत पडली आहे, असें तुम्ही म्हणता, परंतु तुमचा तो शेतकर्‍याचा पोर अद्यापि कां शरण येत नाहीं?"

अनुकेवट्ट म्हणाला "माझ्या कानावर एक अत्यंत उद्वेगजनक बातमी आली आहे. मिथिलेंतील लोक अद्यापि शरण येत नाहींत, हें पाहून ती बातमी खरी असावी, अशी मला बळकट शंका येते. आपण ज्या सरदारांचा एवढा गौरव करीत आहां, तेच सरदार महौषधाकडून अमोलिक वस्त्रें आणि अलंकार बक्षिसादाखल घेऊन मिथिला शहरांत आपणाला न कळत धान्य जाऊं देत आहेत! आपल्या या सैन्यांत महौषधाकडून लांच खाल्ला नाहीं, असा एकदेखील अधिकारी नसावा. नाहींतर मिथिलेंतील लोकांनां बाहेरची अन्नसामग्री कशी मिळाली, हें आपणाला कधींच समजलें असतें."

ब्रह्मदत्त म्हणाला "हे अनुकेवट्ट! तूच काय तो माझा हितकर्ता आहेस, असें दिसतें. आतां माझे सरदार व मानकरी फितूर झाले आहेत, याची परीक्षा कशी करतां येईल हें सांग."

अनुकेवट्ट म्हणाला "हें काम फार सोपें आहे. आपण उद्यां एक दरबार भरवा, व तेथें सर्व मानकर्‍यांनां व सरदारांनां बोलावून आणा. त्यांपैकीं कित्येकांच्या अंगावर महौषधानें दिलेलीं वस्त्रें व अलंकार दिसून आले, तर खात्रीनें समजा, कीं, हे लोक महौषधाला वश झाले आहेत."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel