त्यांतील एकजण म्हणाला "महाराज, या सैन्याबरोबर युद्ध करून आमच्या मूठभर लोकांचा निभाव कधींहि लागावयाचा नाहीं. तेव्हां आपण हीं घरें पेटवून त्यांत जळून मरावें, हें बरें. जर का आम्ही ब्रह्मदत्ताच्या हातीं सांपडलों, तर तो आम्हांला हाल हाल करून ठार मारील!"

दुसरा म्हणाला "महाराज, आगींत जळून मरण्यापेक्षां आपण एकामेकांला मारून मरूं."

तिसरा म्हणाला "महाराज, आपण सर्व एकदम विष पिऊं."

चौथा म्हणाला "महाराज, या प्रसंगीं आमच्यासारख्यांनां संकटांतून पार पडण्याची कोणतीच युक्ति सुचावयाची नाहीं. आम्ही सर्वजण महौषधाला शरण जाऊं. कांहीं उपाय असल्यास तो त्यालाच सुचेल."

राजा आपल्या चारहि अमात्यांसहवर्तमान महौषध होता त्या ठिकाणीं गेला, व त्याला म्हणाला "महौषध! तू मोठा बुद्धिमान् आहेस. कितीहि बिकट प्रसंग आला तरी तुझें धैर्य खचत नाहीं. आमच्यावर हा अचानक घाला आला आहे. यांतून पार पाडण्यास तुझ्यावांचून दुसरा कोणी समर्थ नाहीं."

महौषध म्हणाला "मी पडलों नांगर्‍याचा पोर! असल्या मोठमोठाल्या गोष्टी मला कसच्या समजतात! माझ्यासारख्या मूर्खाला तुम्ही गचांडी देऊन घालवून न देतां आपल्या सेवेंत ठेविलें हेंच मोठें आश्चर्य!"

वैदेह म्हणाला "महौषध! झालेली गोष्ट होऊन गेली. शहाणे लोक मागील कर्मे स्मरून वाद करीत बसत नाहींत. मी तुला कांहीं बोललों असेन, तुझा उपमर्द केला असेल, परंतु त्याचा सूड उगविण्याची ही वेळ नव्हे! सकाळ होण्याच्या आधीं ब्रह्मदत्त आम्हां सर्वांचा नाश करणार आहे! तेव्हां प्रथमत: आम्हांला या संकटांतून पार पाड, व मग तुला तोडून बोलल्याबद्दल जी काय आमची छि:थू करावयाचा असेल, ती कर."

महौषध म्हणाला "महाराज, आपला सूड उगविण्याची किंवा छि:थू करण्याची माझी इच्छा नाहीं; परंतु मनुष्याचीं मागील कर्में इतकीं बिकट असतात, कीं, स्मरण करा किंवा न करा, त्याचें फळ हें यावयाचेंच! आपण जे या ब्रह्मदत्ताच्या मुलीवर लुब्ध झालां, त्याचें फळ भोगल्याशिवाय यांतून मुक्त कसे व्हाल?"

राजा व त्याचे चारहि प्रधान विचारमूढ होऊन पोरांसारखे रडूं लागले. महौषधाला आपल्या धन्याची कींव आली. तो म्हणाला "महाराज, संकटसमयीं असा शोक करणें आपल्यासारख्या राजकुलांत उत्पन्न झालेल्या क्षत्रियांनां उचित नाहीं. आपण जर धीर धराल, तर सर्वांनां थोडक्याच वेळांत मी या संकटांतून पार पाडितों."

महौषधानें आपल्या नोकरांनां जमिनीखालून तयार केलेल्या बोगद्यांचें दार उघडण्यास हुकूम केला. त्यानें ब्रह्मदत्तराजाची आपल्या धन्याला फसविण्याची युक्ति जाणून या निवासस्थानापासून दोन बोगदे तयार केले होते. मोठा बोगदा गंगेच्या कांठापर्यंत नेला होता, व लहान बोगदा ब्रह्मदत्ताच्या राजवाड्याच्या आंत नेऊन माडीवर जाणार्‍या जिन्याखालीं सोडला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel