ब्रह्मदत्तानें आपल्या वसतिस्थानाला वेढा दिला, हें जेव्हां महौषधाला समजलें, तेव्हां त्यानें आपले गुप्त हेर ताबडतोब राजवाड्यांत पाठविले. ते धाकट्या बोगद्यांतून राजवाड्यांत शिरले, व महौषधानें शिकवून ठेविल्याप्रमाणें त्यांनीं एकच गडबड सुरू केली. ब्रह्मदत्ताची आई, बायको, वैदेह राजाला देऊं केलेली मुलगी व एकुलता एक मुलगा एवढीं माणसें राजवाड्यांत होतीं. महौषधाच्या हेरांनीं केलेल्या गडबडीनें जागीं होऊन तीं एकत्र जमलीं. तेव्हां ते हेर ब्रह्मदत्ताच्या आईला म्हणाले "महाराणीसाहेब, तुम्ही तुमच्या सुनेला आणि नातवंडांनां घेऊन आतांच्या आतां येथून निघालें पाहिजे. आमच्या राजाला (ब्रह्मदत्ताला) वैदेहराजानें पकडलें आहे. आमचे लोक जरी पुष्कळ होते, तथापि महौषधाच्या शूर शिपायांनीं एकाएकीं घाला घालून राजाला पकडून नेलें. आतां त्यानें तुम्हा सर्वांनां पकडण्यासाठीं आपले शिपायी इकडे पाठविले आहेत. तेव्हां आतां पळाचाहि विलंब न लावतां आमच्याबरोबर चला. आम्ही तुम्हांला गुप्त मार्गानें दुसर्‍या ठिकाणीं घेऊन जातों."

महौषधाचे हेर ब्रह्मदत्ताचे नोकर आहेत, असें वाटून ब्रह्मदत्ताची आई आपल्या सुनेला व नातवंडांनां घेऊन त्यांजबरोबर निघाली. त्यांनीं त्या सर्वांनां लहान बोगद्यांतून मोठ्या बोगद्यांत आणून तेथून महौषधाच्या हुकमाप्रमाणें गंगेच्या कांठीं बोगद्याच्या आंतच ठेविलें.

इकडे महौषधानें आपल्या धन्याला व त्याच्या चारहि जुन्या प्रधानांला बोगद्यांत उतरविलें व तो त्यांनां म्हणाला "मी जो चार-पांच महिने येथें येऊन बसलों होतों, तो गमतीखातर बसलों होतों, असें तुम्हांला वाटतें काय? मिथिलेस असतांनाच मला ब्रह्मदत्ताची युक्ति समजली होती. तुम्हां सर्वांनां तो सांपळ्यांत धरणार, हें मी जाणून होतों, आणि म्हणूनच गेल्या चार महिन्यांत येथें येऊन मी ही अविश्रांत मेहनत केली. ही पळून जाण्याची चोरवाट आहे, असें समजून वांकतवांकत जाऊं नका. या बोगद्यांतून घोड्यावर बसून देखील तुम्हांला सहज जातां येण्यासारखें आहे."

बोधिसत्वाच्या चातुर्याचें त्या सर्वांनां अत्यंत आश्चर्य वाटलें. महौषध केवळ राजनीतींतच निपुण होता, असें नव्हे; तर तो कला कलाकौशल्यांतहि अत्यंत निपुण होता. या उन्मार्गाची (बोगद्याची) त्यानें जी रचना केली होती, ती शिल्पकलानिष्णात मनुष्यांनांदेखील करतां आली असती कीं नाहीं, याची शंकाच आहे. या बोगद्याला आंतून चुन्याचा गिलावा करून दोन्ही बाजूंला सुंदर चित्रें काढिलीं होतीं; अंतराअंतरावर सुगंधि तेलाचे दिवे लावण्यांत आले होते; जमिनीला काश्मीरी पाषाणांची फरसबंदी केली होती व तीवर सुंदर गालीचे पसरले होते; मधूनमधून फळें वगैरे जिन्नस मांडून ठेवण्यांत आले होते; आणि सुवासिक पुष्पमालांनीं त्या बोगद्याचा वरचा भाग अलंकृत केला होता.

राजा आणि त्याचे प्रधान ही शोभा पहाण्यांतच गर्क होऊन गेले. तेव्हां बोधिसत्व त्यांनां म्हणाला "आतां बोगद्यांत आपणांला फार वेळ घालवितां यावयाचा नाही. आपणांला येथून लवकर निघालें पाहिजे."

त्या सर्व मंडळींला घेऊन गंगेच्या काठी आला, व तेथे ठेविलेल्या ब्रह्मदत्तराजाच्या कुटुंबाला आपल्या राजाच्या हवाली करून तो म्हणाला “महाराज, ही ब्रह्मदत्तराजाची आई, ही आपल्या आजीसमान होय. ही ब्रह्मदत्तराजाची पत्नी, ही आपली भावी सासू होय. हिचें आपण मातृवत पालन करावें, ही ब्रह्मदत्ताची एकुलती एक कन्या व आपली भावी पत्नी होय; इच्याशी आपण सुमुहुर्तावर विवाह करा. हा तिचा भाऊ, यांचें आपण आपल्या भावाप्रमाणें रक्षण करा. या होड्या आपल्यासाठी तयार ठेवण्यांत आल्या आहेत. माझे शूर होडीवाले आपल्याला याच रात्री विदेहदेशाला घेऊन जातील. तेथून पुढें मिथिलेपर्यंत प्रत्येक योजनावर चौक्या स्थापून घोडे आणि हत्ती ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या साहाय्यानें आपल्याला अत्यंत त्वरेनें मिथिलेला जाता येईल. आपण मिथिलेला पोहोचल्याचें वर्तमान माझे दूत मला ताबडतोब कळवितील.”

वैदेह म्हणाला, “परंतु ज्या तूं आम्हांला संकटांतून सोडविलेस, त्या तुला आम्ही येथे सोडून जावे कसे? तेव्हा तूंहि आमच्याबरोबर चल.”

महौषध म्हणाला, “असें करणें मला योग्य नाही. आमच्या सैन्याला मागें टाकून मी एकटा जाऊं इच्छीत नाही. आपण माझी काळजी करूं नका. ब्रह्मदत्ताच्या सैन्यापासून आमच्या सर्व मनुष्यांची मोकळीक करून त्यांना बरोबर घेऊन लवकरच मी आपल्या दर्शनाला येईल.”

असें म्हणून महौषधाने आपल्या धन्याचा निरोप घेतला, आणि तो माघारा फिरला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel