हे वर्तमन चंदादेवीला समजलें, तेव्हा तिला अत्यंत शोक झाला! राजाचें मन वळविण्याचा प्रयत्न निष्फल झाल्यावर ती राजाला म्हणाली “मला आपण एक वर दिला हे, तो मी या प्रसंगी मागून घेते.”

काशीराजानें घे असे म्हटल्यावर चंदादेवी म्हणाली, “माझ्या मुलाला राज्य द्या.”

काशीराजा म्हणाला “तसें केल असता माझी प्रजा क्षोभेल. तेव्हां हा वर मला देता येत नाही.”

चंदादेवीने आपल्या मुलाला अनुक्रमे सात वर्षे, सात महिने, एक महिना तरी राज्य द्यावे, अशी प्रार्थना केली. पण राजाला तिचे म्हणणें पसंत पडले नाही. शेवटी चंदादेवीने तेमियाला सात दिवस तरी राज्य द्या, असा हट्ट धरला. राजानें तिच्या आग्रहस्तव एक आठवडा तेमियाला राजा केले आहे, अस जाहीरनामा लाविला.

चंदादेवीने आपल्या मुलाला उचलवून हत्तीच्या अंबारीत बसविले. पण तो बसतो कसचा! तो गोळयासारखा अंबारीमध्ये पडून राहिला. त्याला चंदादेवीने सर्व नगरांतून मोठ्या लवाजम्यानिशी फिरवून आणण्यास सांगितले.

तेमिय सगळे सोहळे अनुभवीत होता. परंतु आपल्या वेडात त्याने अंतर पडू दिले नाही.

सहा दिवस मुलाला राज्यसुखाची लालूच लावून पाहिल्यानंतर चंदादेवी त्याला म्हणाली, “तेमिय, उद्या तुझी माझी ताटातूट होणार आहे. तुला दूर अरण्यांत नेऊन गाडून टाकण्याचा बेत ठरला आहे. आजपर्यंत मला असा भरंवसा होता, की, तुझें वेड खरें नाही. परंतु आता माझी पूर्ण निराशा झाली आहे!”

तिनें इतका विलाप केला, की, तिच्या त्या शोकानें पाषाणाला देखील वाचा फुटली असती. परंतु तेमियाच्या वेडांत काहीच अंतर पडले नाही. तो जशाचा तसाच जडमूढ राहिला!

दुसर्‍या दिवशी काशीराजानें सुनंद सारथ्याला बोलावून तेमियाला अमंगल रथांतून दूरच्या एका अरण्यांत नेऊन गाडून टाकण्याची आज्ञा केली.

त्याप्रमाणें सुनंदानें काळ्या रथाला काळे घोडे बांधून त्यात तेमियाला घालून तो अरण्यांत गेला. तेथें तेमियाला रथांतच ठेवून सुनंद त्याला गाडण्यासाठी एक खड्डा खणू लागला.

ते पाहून तेमिय त्याला म्हणाला “हे सारथी, तूं मोठ्या घाईघाईनें हा खड्डा का खोदीत आहेस?”

सुनंद त्याजकडे वळून न पाहतां त्याला म्हणाला “आमच्या राजाला एक मुका, बहिरा, जडमूढ असा पुत्र झाला आहे. त्याला या खड्डयांत घालून पुरून टाकण्यासाठी राजानें माझ्या स्वाधीन केलें आहे.”

तें ऐकून तेमिय म्हणाला “मी बहिरा नाही, मुका नाही, पांगळा नाही, किंवा जडमूढहि नाही! मला जर तूं या खड्ड्यांत गाडशील, तर तुझ्या हातून मोठा अनर्थ होईल! हातातींल कुदळ खाली ठेवून जरा माझ्याकडे पहा! माझे पाय शाबूत आहेत, आणि माझें भाषण तूं ऐकतोच आहेस! तेव्हां मला या खडड्यांत घालून तूं अधर्माचरण करू नकोस!”

सारथ्याला हें बोधिसत्वाचे भाषण ऐकून फारच अचंबा वाटला! राजाच्या प्रधानमंडळाने, वैद्यांनी आणि ज्योतिष्यांनी ज्याला जन्माचा जडमूढ ठरवून गाडण्यासाठी आपल्या हवाली केले, त्याला एकाएकी वाचा फुटली कशी? हा काहींतरी अमानुष चमत्कार असावा, असे वाटून तो म्हणाला “तूं या अरण्यांत वास करणारी देवता आहेस, किंवा गंधर्व आहेस, शक्र आहेस, की कोण आहेस, हेंच मला समजत नाही!”

बोधिसत्व म्हणाला “मी दुसरा कोणी नसून ज्याच्यासाठी तूं हा खड्डा खोदीत आहेस, तोच मी काशीराजाचा पुत्र आहे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel